निलेश सांबरे
पाड्यावर गेलो होतो. एक वृद्ध महिला भेटली, “मला जे दिसतंय ना ते तुमच्या जिजाऊमुळे. तुझ्या लोकांनी माझं ऑपरेशन केलं. मला चष्माही तुम्हीच दिलात.” एक नाही अनेक, अशी माणसं भेटतात. कृतज्ञता व्यक्त करतात. खरंतर मी काहीच करत नाही. करतात ते आईचे संस्कार. आईनं ते संस्कार शिवबांच्या गोष्टींमधून केले. आईनं ते संस्कार आपल्या वागण्यातून केले. आईनं माझ्यावर केलेले संस्कार हेच आज आपल्या ‘जिजाऊ’चे विचार झाले आहेत.
आई न कळत्या वयातही सांगायची, अरे आपलं काहीच नसतं. आपल्याकडे जे आहे, ते सर्वांचंच. देत राहावं. आज ‘जिजाऊ’च्या माध्यमातून समाजोपयी जेही काम चालतं ते स्वकमाईतून समाजसेवेच्या सिद्धांतानुसार. त्यामागे आईचे तेच संस्कार, तेच विचार आहेत. मला आठवतं. माझे बाबा भगवान सांबरे हे एसटीत कंडक्टरचं काम करत असत. त्यांच्यासाठी आई डबा पाठवयाची. पण तो डबा फक्त बाबांसाठी नसायचा. तो त्यांच्यासोबतच्या ड्रायव्हरसाठीही असायचा. त्याकाळात अनेक एसटी ड्रायव्हर हे घाटावरचे असत. त्यांच्या जेवणाची सोय नसे. त्यामुळे आई ते भुके राहू नयेत, यासाठी काळजी घेत असे.
एवढंच नाही. आईचं माहेर श्रीमंत. सुखवस्तू. कामाची तशी लाडक्या लेकीला गरज नसलेलं. पण आई झडपोलीत आली. वडिल एसटीच्या सेवत असल्यानं त्यांना वेळ नसायचा. आईनं एकहाती घर तर सांभाळलंच, पण शेतीही. तेव्हा काही सोयीही नव्हत्या. पण आईनं शेतीची जबाबदारी सांभाळत वडिलांच्या कष्टांना कष्टानंच साथ दिली. तिला ते काम करताना पाहत मोठा झालो. त्यामुळे आज रस्ते बांधणी व्यवसायात स्थिरावल्यानंतरही माझ्यासाठी सूर्योदयाबरोबर सुरु होणारा कामाचा दिवस रात्री उशीरापर्यंत सुरु राहतो.
तिचं आम्हा तिघा भावंडांच्या शिक्षणावरही बारीक लक्ष. वडिलांसारखाच तिचाही शिकण्यासाठी आग्रह. १९९१च्या दरम्यान मी कॉलेजसाठी भिवंडीला जात असे. पहाटे एसटीने जावं लागायचं. वय कोवळं होतं. खरं सांगतो, आज कितीही निधड्या छातीचा म्हणून ओळखला जातो, तरीही तेव्हा काळोखाला घाबरायचो. मग आई सोडण्यासाठी तेवढ्या पहाटे सोबत येत असे. त्याआधी मला डबा देण्यासाठी लवकर उठून काम करत असे. मला एसटीत बसवल्यानंतरच ती घरी परत जात असे. तिचे ते कष्टच मला शिक्षणाची प्रेरणा देणारे ठरले. त्यातूनच प्रसंगी भिवंडीच्या कॉलेजमधील इलेक्ट्रिक मीटरच्या खोलीत झोपून शिक्षण घेण्याचं बळ मिळालं.
आणखी एक. तिचं कष्ट बाबांप्रमाणेच आजही थांबलेले नाहीत. बाबा आणि आई हे दोघेच खरंतर झडपोलीचं रुग्णालय आणि शाळा चालवतात. दोघे फक्त नावापुरते तेथे नाहीत. ते स्वत: दिवसातून अनेक फेऱ्या मारतात. वैयक्तिक लक्ष ठेवतात. प्रत्येक काम चांगलंच झालं पाहिजे, याची काळजी घेतात. रुग्ण,डॉक्टर-नर्स-वॉर्डबॉय, विद्यार्थी, शिक्षक, इतर कर्मचारी यांची ते काळजी घेतात. विशेषत: रुग्णांची ते ज्या अगत्यानं विचारपूस करतात, त्यांचं पथ्यपाण्याचं पाहतात, ते त्यांना आजाराशी लढण्याचं सामर्थ्य वाढवतात. काहींसाठी जर काही गैरसोय असेल तर खास घरून डबाही पाठवतात, हे विशेष!
जिजाऊमार्फत कोकणभर अभ्यासिका-वाचनालय चालवली जातात. आपल्या अॅकेडमीतून यूपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी, पोलीस भरतीसाठी मुलं घडवली जातात. आपल्या दृष्टहीन दिव्यांगांच्या खास निवासी शाळेत दूरदूरची मुलं आहे. यासर्वांचीही आई-बाबा मुलांप्रमाणेच आपुलकीनं काळजी घेतात.
बाहेरगावातून आलेल्या मुलांची रोज तर चौकशी करतातच पण सणासुदीला संस्थेच्या वसतीगृहातही घरासारखं वाटावं अशी काळजीही घेतात. गोडधोड खाऊ घालतात. ही त्यांची आपुलकी शिक्षणाएवढीच महत्वाची ठरते. जिजाऊतून शिकलेली मुलं स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवत कोकणाच्या मातीतून अधिकारी घडवण्याचं माझं स्वप्न पूर्ण करु लागली त्यात त्यांचाही मोठा वाटा.
नात्यातच नाही, तर समाजातही कुठे काही दु:खाचा प्रसंग ओढवला की तेथे अश्रू पुसण्यासाठी आई धाव घेतेच घेते. बाबाही आधार द्यायला असतातच.
संस्थांचं काम पाहायला कुणी आलं-गेलं तरी आई त्यांचे स्वागत-सत्कार आपुलकीने करते. आई जी भूमिका पार पाडते. बाबाही न थकता प्रत्येक धावपळीत अगत्यानं असतात. त्यामुळेच मला ठाण्यात कॉर्पोरेट पार्कमधून किंवा इतरत्र फिरत व्यावसायिक जबाबदाऱ्यांसाठी वेळ देता येतो. त्यांची या वयातील धावपळ, आपुलकी, समाजाप्रति समर्पण मला बळ देते!
जिजाऊच्या वटवृक्षाच्या पारंब्या कोकणाच्या मातीत रुजतायत. पसारा वाढतोय. वाढतच राहणाराय. पण मूळ बळ, मातीत रुजलेली मूळं ही आई-बाबांच्या संस्काराची. त्यातून घडलेल्या जिजाऊच्या विचारांची आहेत. ती मूळंच समाजसेवेचा वटवृक्ष आणखी फोफावत समाजेसेवेचा पसारा वाढवत नेणार आहेत, एवढं नक्की!
(निलेश सांबरे हे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.रस्ते बांधणी उद्योगातून मिळणाऱ्या नफ्याचा मोठा भाग ते ‘स्वकमाईतून समाजसेवा’ या सिद्धांतानुसार जिजाऊच्या सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करतात.)