मुक्तपीठ टीम
आजही समाजातील एका मोठ्या वर्गात महिलांची मासिक पाळी म्हटले की तोंड वेंगाडले जाते. गडचिरोलीच्या आदिवासी गावांमध्ये महिलांना पाळीच्या दिवसांमध्ये घरात राहण्याऐवजी गावातील सामयिक मासिक पाळीसाठी बांधलेल्या खोलीत राहावे लागते. अनेक गावांमध्ये अशा खोल्यांची अवस्था वाईट असते. त्यामुळेच गडचिरोली जिल्ह्यातील एका सरपंचांनी मुंबईतील सामाजिक संस्थेच्या मदतीने गावातील महिलांसाठी आधुनिक आणि सुरक्षित विश्रामगृह म्हणजेच ‘मासिक गृह’ उभारण्यास मदत केली आहे.
गडचिरोलीमधील आदिवासी समुदाय ‘कुरमा’ नावाच्या प्रथेचे पालन करतात. त्यानुसार महिलांना मासिक पाळीच्या काळात घरापासून दूर राहावे लागते. गावातील सामायिक वापरातील स्वतंत्र घरात राहून तेथे त्या विश्रांती घेतात. गडचिरोलीतील धानोरा तालुक्यातील फासली टोला गावाच्या महिलांनी मूलभूत सुविधांसह आधुनिक स्वच्छ “कुर्मा” घरांची मागणी करण्यास सुरवात केली, तेव्हा दुधमाला ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनंदा तुळवी यांनी एका स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने आदिवासी मुली आणि महिलांसाठी “मासिक गृह” बनवण्यासाठी पाऊल उचलले.
या वर्षाच्या सुरुवातीला सरपंचपदी निवड झालेल्या तुळवी यांनी फासली टोला गावात आधुनिक मासिक गृह बांधण्यासाठी खेरवाडी सोशल वेलफेयर असोसिएशन, मुंबई या स्वयंसेवी संस्थेची (एनजीओ) मदत घेतली. खेड्यातील महिलांसह स्वयंसेवी संस्थेची बैठक घेण्यात आली. या महिलांनी बांधकाम करताना श्रमदान केले. या घराच्या बांधकामासाठी प्लास्टिकच्या बाटल्या आणि वाळूचा वापर करण्यात आला आहे. या मासिक विश्राम गृहात १३ ते १४ महिला राहू शकतात. त्यात एक मोठी खोली, एक प्रसाधनगृह, कपाट, बेड, गद्दे, पंखे आणि सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा आहे.
पाहा व्हिडीओ: