उदयराज वडामकर / कोल्हापूर
नवरात्र म्हणजे देवीचा आनंदोत्सव…कोल्हापूरात नवरात्रोत्सवाच्या निम्मीताने श्री करवीर निवासीनी अंबाबाई मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने आणि आकर्षक रंगरंगोटीने उजळून निघाले. कोल्हापूरच्या अंबाबाईचा नऊ दिवसाच्या या नवरात्रोत्सवाचा सोहळा थाटात पार पडला. अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने विक्रम केला.
नऊ दुर्गांची महती सांगणाऱ्या चैतन्यदायी नवरात्रोउत्सव सोहळ्याची सुरुवात घटस्थापनेने झाली. पहिल्या दिवशी कोल्हापूरची करवीर निवासिनी श्री अंबाबाई सिंहासनाधीश्वरीच्या रूपात साकारली होती. देवीच्या सिंहासनाच्या नावाआधी श्री उपाधी लावली जाते. त्याचे कारण ती ज्या ज्या आसनावर विराजमान आहे ते त्रिदेवाच्या आधाराने तयार झाले आहे. हातामध्ये शंख, चक्र, धनुष्यबाण, वरद, कमळ, त्रिशुळ, तलवार आदी आयुधं धारण करणारी दुर्गा या नावाने आदिशक्तीच्या दुस्तर म्हणजे अवघड गोष्टींना सुद्धा सोपं करणारी या रूपाचा बोध होतो.
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या द्वितीया तिथीला करवीर निवासिनी श्री अंबाबाई अष्टभुजा सिंह वाहिनी दुर्गेच्या रूपात सजली होती. दुर्गा म्हणजे दुर्गम असुराला मारणारे जगदंबेचे स्वरूप. महात्म्याच्या अकराव्या अध्यायात देवीने स्वतःच्या भविष्यात्मक अवतारांचा उल्लेख केला आहे. त्या वेळेला पुढे दुर्गमसुराला मारल्यानंतर माझे नाव दुर्गा म्हणून प्रसिद्ध होईल असे वचन देवीने स्वतः दिलेले आहे.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या तृतीयेला करवीर निवासिनी श्री अंबाबाईला सिद्धीदात्रीचे रुप साकारण्यात आले होते. सिद्धीदात्री हे नवदुर्गातील अंतिम रूप. सिद्धी म्हणजेच सामर्थ्य. अष्ट महासिद्धी या जगप्रसिद्ध आहेत परंतु केवळ त्या असणं म्हणजे सिद्ध नव्हे तर या सिद्धींच्या असण्यानही ज्याच्या मनाच्या किंवा साधनेच्या कुठल्याही पातळीत फरक पडत नाही तो खरा सिद्ध. अशा सिद्धांची स्वामिनी म्हणजे ही सिद्धीदात्री.
कोल्हापूरची करवीर निवासिनी श्री अंबाबाई चतुर्थीला श्री मीनाक्षी या रूपात साकारली होती. त्यादिवशी अंबाबाई करिता तिरुपती वरून शालू ही आला होता. पार्वती भगवान शिवांची पत्नी. ती भगवान विष्णूची बहीण देखील आहे. त्यांची प्रामुख्याने दक्षिण भारतात पूजा केली जाते.
पंचमीला कोल्हापूरची करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपात पुजा झाली. यापूजेची पार्श्वभूमी अशी, ‘पंचमीला करवीरनिवासिनी आपल्या लवाजम्यासह त्र्यंबोलीसमोर कोलासूररुपी कोहळा हनन करायला हत्तीवर आरुढ होऊन जाते.
षष्ठीला करवीर निवासिनी श्री अंबाबाई शारदीय नवरात्भुक्ती मुक्ती प्रदायिनी या रूपात सजली होती. अगस्ती ऋषींनी रचलेल्या अष्टकात भुक्ती मुक्ती प्रदे देवी असा उल्लेख केलेला आहे. भुक्ती अर्थात जगण्याची सर्व सुखं आणि मुक्ती अर्थात पुन्हा जन्म मरणाचा फेरा न पाहण्याचं शाश्वत वरदान. करवीर क्षेत्री या दोन्ही गोष्टींची प्राप्ती होते कारण हे क्षेत्र या मोठ्या आईचं अर्थात महामातृकक्षेत्र म्हणून ओळखलं जातं.
सप्तमीला श्री अंबाबाई शाकंभरीच्या रुपात सजली होती. गुहारण्य हे बदामीतील तिलकवन आहे. शाकंभरी देवी या पवित्र वनात वास करते, त्यामुळे तिला बनशंकरी किंवा वनशंकरी म्हणतात. काशीतून बाहेर पडलेले अगस्त्य ऋषी विंध्याला नमवून दक्षिणकाशी करवीर या तीर्थक्षेत्रात पत्नी लोपामुद्रेसह आले. तेव्हा करवीर निवासिनी श्री अंबाबाईने त्यांना येथे फक्त सहा महिने राहण्याची परवानगी दिली. शाकंभरीने अवर्षण व जलाभावामुळे मरणोन्मुख झालेल्या समस्त लोकांचे स्वत:च्या दिव्यशक्तीने स्वत:च्या देहापासून बनलेल्या शाकपत्रांनी भरणपोषण करून त्यांच्या प्राणाचे रक्षण केले. त्यामुळेच देवीचे नाव शाकंभरी असे प्रसिद्ध झाले.
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या महाअष्टमी तिथीच्या दिवशी कोल्हापूरची श्री अंबाबाई महिषासुरमर्दिनी हे रुप धारण केलं होतं. महिषासुरासारख्या वाट चुकलेल्या पुत्रासाठी करूणामय जगदंबेने महिषासुरमर्दिनीचे उग्र रूप घेतलं. शक्तिपीठांच्या परंपरेप्रमाणे करवीरक्षेत्री आदिशक्तीचे स्वरूप असणाऱ्या माता सतीचे त्रिनेत्र पडले तेथे देवीने महिषासुरमर्दिनीरूपाने विहार केला अशी आख्यायिका आहे.
अष्टमीच्या दिनी श्री अंबाबाईचा जागर करवीर निवासिनी अंबामातेच्या चांदीच्या वाहनातून नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबामातेची नगरप्रदक्षिणा उत्साहात पार पडली. महाद्वार रोडवर २१ फुटी अंबाबाईचा मुखवटा आकरण्यात आला होता. विविध रंगी फुले व आकर्षक विद्युत रोषणाईने ही प्रतिमा सजविण्यात आली होती. गेली दोन वर्ष निर्बंधामुळे हा सोहळा प्रतीकात्मक साजरा झाला होता. यंदा अष्टमीच्या नगरप्रदक्षिणेच्या सोहळ्याची जय्यत तयारीही करण्यात आली होती.
सप्तरंगी रांगोळी, फुलांच्या पायघड्यांनी सजवलेले रस्ते तसेच विद्युत रोषणाई असणारे रस्ते, ढोल ताशाच्या दणदणाट तसेच पोलीस बँड पथकांचा निनाद भक्तांच्या मुखी अंबामातेचा गजर हा सोहळा जल्लोषपूर्ण वातावरणात अंबाबाईची नगर प्रदक्षिणा पार पडली.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या नवमीला करवीर निवासिनी श्री अंबाबाई विश्वेश्वरी जगद्धात्री या रूपात सजली होती. या नऊ दिवसात आपण विविध रूपातील अंबामातेचं दर्शन घेतले परंतु या नऊ रूपांखेरीजही तिची अनेक रूप आहेत त्या सगळ्यांचे वैभव जाणून घेणे निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे जे घडू शकतं ते घडून न देणारी आणि जे घडणार नाही तेही सहज घडवणारी अशी अतर्क्य जगदंबा म्हणजेच विश्वेश्वरी जगद्धात्री. जगदंबेच्या या वैभवाला जाणून घेतलं तर तिची कृपा झाल्या वाचून राहणार नाही.
नवरात्रोत्सवाचा उत्सव दणक्यात पार पडला. आईचा आशीर्वाद आता पुढच्यी नवरात्रोत्सवापर्यंत लेकरांवर मायेचा हात धरेल. पुढचा उत्सव अधिकच उत्साहात साजरा करण्यासाठी अवघ्यांचं जीवनं ऊर्जेनं सळसळतं राखेल.