मुक्तपीठ टीम
“हास्य योग आनंदी व निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे. हास्य योग ज्येष्ठांपर्यंत सीमित न राहता तो सर्व वयोगटातील लोकांपर्यंत पोहोचावा. हास्य योगाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हास्य योग प्रशिक्षक तयार व्हावेत आणि त्यासाठी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात हास्य योगाचे प्रशिक्षण केंद्र उभारावे,” असे मत आंतरराष्ट्रीय हास्यगुरु डॉ. मदन कटारिया यांनी व्यक्त केले.
नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित महाराष्ट्र हास्य योग परिषदेचे उद्घाटन डॉ. मदन कटारिया व माधुरी कटारिया यांच्या हस्ते झाले. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडामंच येथे झालेल्या या परिषदेत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कृष्णकुमार गोयल, साहित्यिक प्रा. मिलिंद जोशी, उद्योजक प्रकाश धोका, तुषार केळकर, प्रसन्न पाटील, ‘नवचैतन्य’चे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे, सुमन काटे, मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, सचिव पोपटलाल शिंगवी आदी उपस्थित होते.
डॉ. मदन कटारिया म्हणाले, “हास्य योग आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे सिद्ध करणारे ४५० हुन अधिक संशोधन प्रबंध देशभरात सादर झाले आहेत. हास्य योगाचा आणखी प्रचार व प्रसार होण्याची गरज आहे. शाळा-महाविद्यालय, कामाच्या ठिकाणी, सोसायट्यांमध्ये, पोलीस, डॉक्टर्स, कारागृह अशा प्रत्येक ठिकाणी हास्य योगाचे केंद्रे उभा राहिली, तर समाजात आनंद पसरेल. त्यासाठी प्रशिक्षण हास्य योग शिकवणाऱ्यांची गरज आहे. असे प्रशिक्षक तयार करण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची उभारणी महत्वाचे पाऊल ठरेल. हास्याला योगाशी जोडून घेत योग शिकवणाऱ्यांना हास्य योग घेण्यास सांगायला हवे. बालपणापासून हसण्यावर लक्ष केंद्रित करावे. हास्याला योगाशी जोडण्यासाठी, तसेच शासकीय पातळीवर हास्य योग चळवळ राबविण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरु असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत लिहिले आहे.”
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, “भारत ही योगभूमी आहे. हास्ययोग सहज आणि सोपा आहे. हास्य जीवनाचे संगीत असून, जीवन सुरेल करण्यासाठी हास्ययोग गरजेचा आहे. माणसाला हास्य आणि विनोदबुद्धीचे वरदान लाभले आहे. हसण्याची कला केवळ माणसाकडे आहे. पण माणूस हसण्याऐवजी सतत गंभीर राहतोय, हे चिंताजनक आहे. खळखळून हसलो, तर स्टेटसला धक्का लागेल, ही भीती आहे. हास्य सौंदर्याचे उगमस्थान आहे. जगातील सर्व प्रकारचे दुःख हलके करण्याची ताकद हास्यामध्ये आहे. भावनिक आणि मानसिक आधाराचे काम हे हास्य क्लब करत आहेत.”
कृष्णकुमार गोयल म्हणाले, “उतारवयात स्नेहीजनांचा अमूल्य ठेवा देण्याचे काम हास्ययोग क्लब करत आहेत. हास्य योगाच्या चळवळीला व्यापक रूप देणाऱ्या आणि लाखोंच्या आयुष्यात हास्य, आनंद पेरणाऱ्या सुमन व विठ्ठल काटे दाम्पत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळायला हवा. सोसायट्यांमध्ये हास्यक्लब झाले, तर सामाजिक बंध अधिक दृढ होतील.”
प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाने आपल्या गृहप्रकल्पामध्ये हास्ययोगाची अमेनिटी द्यावी, अशी विनंती सुमन काटे यांनी केली. त्याला क्षणात प्रतिसाद देत गोयल यांनी त्यांच्या प्रकल्पात ही अमेनिटी देण्यासह बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्याचा शब्द दिला.
आगामी वर्षात एक लाख लोकांपर्यंत हास्य योग पोहोचवण्याचे उद्दिष्ट असून, सर्व हास्य वीरांच्या साथीने ते गाठणार असल्याचा विश्वास मकरंद टिल्लू यांनी व्यक्त केला. प्रकाश धोका यांनी मनोगत व्यक्त केले. विठ्ठल व सुमन काटे यांनी स्वागतहास्याने कार्यक्रमाची सुरूवात केली. पोपटलाल सिंघवी यांनी प्रास्ताविक केले. सुभाष राजवळ यांनी सूत्रसंचालन केले.