मुक्तपीठ टीम
विशाखापट्टणम् येथील भारतीय नौदलाच्या पूर्व मुख्यालयात सोमवारी नेहमीपेक्षा जास्त शिस्तीचे वातावरण होते. प्रत्येक मिनिटा-मिनिटांनी अधिकारी आणि नौसैनिकांना ठराविक वेळी ‘करड्या’ आवाजात कमांड दिल्या जात होत्या, त्याचे पालन अत्यंत कसोशीने केले जाते. त्याचे कारणही खास होते. भारतीय नौदलाकडून भारताच्या सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर रामनाथ कोविंद यांना २१ तोफांची सलामी आणि ‘सेरेमोनिअल गार्ड आॅफ आॅनर’! निमित्त होते, १२ व्या ‘प्रेसिडेंट फ्लीट रिव्ह्यू’चे!
तो स्विकारल्यानंतर त्यांच्यासाठी खास सजवलेल्या ‘आयएनएस सुमित्रा’ या लढाऊ नौकेला ‘प्रेसिडेंट यॉट’ मिळालेला सर्वोच्च दर्जा आणि त्यावर स्वार झालेले राष्ट्रपती आणि त्यांचा संपूर्ण ताफा विशाखापट्टणम्च्या समुद्रात मार्गक्रमणा करत होता. जणू सागर शांत राहून त्यांनाही सलामी देत होता.
एका बाजूला ‘प्रेसिडेंट यॉट’ पाणी कापत पुढे जात असताना नौदलाच्या, तटरक्षक दलाच्या , शिपिंग कॉर्पोरेशनची (एससीआय) आणि एमओईसच्या अशा मिळून ४४ नौका विशाखापट्टणमजवळील ‘अँकरेज’मध्ये चार रांगामध्ये रवाना होत होत्या. देशाच्या सागरी सामर्थ्याचे संपूर्ण प्रदर्शन भारतीयांनीच नव्हे तर परदेशांतील नौदलांनीही पाहिले.
‘७५ वर्षे राष्ट्र सेवेत’ या थीमसह भारतीय नौदलाने आपली नवीन ‘ताकद’ प्रदर्शित केली ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणून साज-या होणाऱ्या भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘प्रेसिडेंट फ्लीट रिव्ह्यू’ वेळी अत्याधुनिक स्वदेशी बनावटीच्या नौका सहभागी झाल्या होत्या.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. ‘फ्लीट’ पुढे जात असताना नौदलातील ५५ विमाने, हेलिकॉप्टर्स यांचा नेत्रदीपक ‘फ्लायपास्ट’ दाखवण्यात आला. ‘फ्लिट रिव्हयु ’अंतिम टप्प्यात आल्यावर युद्धनौका आणि पाणबुडींच्या ‘मोबाईल कॉलम’ने राष्ट्रपतींच्या नौकेच्या बाजूने वेगाने ‘स्टीम पास्ट’ केले. परेड आॅफ सेल्स तसेच समुद्रात शोध आणि बचाव प्रात्यक्षिक, हॉक विमानाद्वारे एरोबॅटिक्स याशिवाय सी किंग्ज, कमॉव्ह हेलिकॉप्टर्स, डॉर्मिअर, मिग २९ के आदी विमानांच्या आणि नौदलातील ‘मरीन कमांडोज’नी (मार्कोस) ‘वॉटर पॅरा जम्प्स’ आणि समुद्रात अनेक आकर्षक कवायती दाखवल्या. त्या पाहून राष्ट्रपती मंत्रमुग्ध झाले होते.
राष्ट्रपतींची नौका ‘पुनरावलोकन स्तंभामधून जाताना प्रत्येक नौकेवरील अधिकारी आणि नौसैनिकांनी ‘सर्वोच्च कमांडर’विषयी असलेल्या बिनशर्त निष्ठेचे प्रदर्शन करण्यासाठी तीनवेळा पारंपारिक जय’ केला. व राष्ट्रपतींना अभिवादन केले. संरक्षण मंत्री, दळणवळण राज्यमंत्री देवूसिंह जे चौहान यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष पहिल्या दिवसाचे कव्हर आणि स्मरणार्थ तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. भारतीय नौदलातील नौका, पाणबुड्या, विमाने यांच्या तयारीच्या आढाव्यामुळे उत्कृष्ट परेड पाहण्यास मिळाली आणि सर्व नौका,लढाऊ विमाने आणि पाणबुड्यांनी व्यावसायिक क्षमतेचे दर्शन घडवले आहे. शिवाय कोणत्याही आपत्तीसाठी भारतीय नौदलाची तयारी दर्शवते, असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केले. भारतीय नौदल अधिकाधिक आत्मनिर्भर होत आहे आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमात आघाडीवर आहे हे लक्षात घेऊन मला आनंद होत आहे, असेही ते म्हणाले.
|