लेखन – संकलन : अपेक्षा सकपाळ
श्री दत्तांच्या प्रत्येक भक्ताच्या ह्रदयात स्थान असलेली पवित्र जागा म्हणजे नरसोबाची वाडी. या श्री दत्तस्थानाला नृसिंहवाडी म्हणूनही ओळखलं जातं. कोल्हापुरातील कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य संगमावर हे तीर्थस्थळ वसलंय. भक्तांच्या मनात या स्थानाला दत्तप्रभूंच्या राजधानीचं स्थान आहे. नरसोबाची वाडी. श्री दत्तात्रयांचं पवित्र स्थान. तिथं गेलं की मनात भक्तिभावाला उधाण येतं. शेजारून वाहणाऱ्या कृष्णा पंचगंगेसारखीच मनात भक्ती ओसंडते. मनातील भक्तिभाव मुखातील दत्तनामातून अखंड प्रवाही होतो.
नरसोबाची वाडीचं नाव कसं पडलं?
नृसिंहसरस्वती यांना दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ओळखले जाते. नृसिंहवाडी म्हणजेच नरसोबाच्या वाडीला त्यांच्या नावानेच ओळखले जाते. या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे. वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथेच वास्तव्य केलं. त्यांनी नरसोबाच्या वाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले आहे.
नयनरम्य नदीकिनारी पवित्र स्थान
- कोल्हापुरातील शिरोळमध्ये कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर तीर्थस्थळ वसलं आहे. दत्तभक्तांमध्ये हे स्थान दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखलं जातं.
- नदीतीरामुळे या श्रीदत्तस्थानास एक नैसर्गिक समृद्धी लाभली आहे. एक रम्य असं हे अध्यात्मिक स्थान आहे. तसेच वातावरणात सर्वत्र भक्तिभाव भरलेला असतो. नरसोबाच्या वाडीत दत्तभक्तांचा नेहमीच राबता असतो.
- नृसिंहसरस्वती यांच्यानंतर अनेक महान विभूतींनी येथे वास्तव्य केलं आहे. साधना, उपासना भक्ती यासाठी हे स्थान अत्युत्तम मानलं जातं.
- या दत्तस्थानी नेहमीच सतत अविरत दत्तभक्तीचा जागर सुरू असतो.
- नरसोबाच्या वाडीला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे. वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथेच वास्तव्य केलं. त्यांनी नरसोबाच्या वाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले आहे. गेल्या अनेक पिढ्या मंडप आणि इतर सर्व व्यवस्था करण्याची जबाबदारी राजू अत्तर पाहतात.
भक्तिभावानं भरलेला दिनक्रम!
नरसोबाच्या वाडीतील प्रसादालय हे भक्तांनी ओसंडून वाहते. तिथं दिवसभर भक्तांसाठी प्रसाद मिळतो. तो ग्रहण करणं हे भक्त श्रीदत्तात्रयाची कृपा मानतात. तिथं भक्तही सेवेत मग्न असतात. नरसोबाच्या वाडीतील दिनक्रम हा भक्तिभावानं भरलेला असतो. पहाटे तीनपासून ते रात्रौ दहा वाजेपर्यंत दत्तभक्तीचा जागर येथे सुरू असतो. काकड आरती, पंचामृत अभिषेक, महापूजा, पवमान पठन, धूपदीप आरती, दत्तगजरात होणारा पालखी सोहळा आणि शेजारती असा नित्यक्रम असतो. दत्तभक्तीचा जागर आणि रोजचा पालखी सोहळा खास अनुभवावा असाच…जायचंच नरसोबाच्या वाडीला…श्री दत्ताच्या दर्शनाला!
पावसातही आहे दर्शनाचे महत्व वेगळं!
हे मंदिर नदीकिनारीच मंदिर आहे. मात्र, त्यामुळे महापुराचे पाणी पादुकांना स्पर्श करतेच करते. वेगवान पाण्याच्या प्रवाह वाहत असतानाही दक्षिण द्वाराचं भाविक दर्शन घेतात. मंदिरात पाणी शिरलं तरी पुराच्या पाण्यातून जात सारे नित्य सोपस्कार पार पाडले जातात. पादुकांपर्यंत पाणी आल्यावर मात्र उत्सव मूर्ती टप्प्याटप्प्याने हलवली जाते. अर्थात दरवर्षीच्या या नित्य कार्यक्रमाचं पालन तेथे केले जाते.
संततधार विधी म्हणजे काय ?
- फक्त नरसोबाच्या वाडीलाच हा विधी संपन्न होतो.
- नरसोबाच्या वाडीत हा संततधार विधी चैत्र शुद्ध पंचमी ते द्वादशी असे आठ दिवस असतो.
- वैशाखवणव्याचा दाह श्री दत्तमहाराजांच्या सुकुमार पाऊलांना होऊ नये म्हणून त्यांच्या मनोहर पादुकांवर प्रथम दत्तदेवस्थान तर्फे सलग
- आठवडाभर दिवसरात्र जलाभिषेक होत असतो, त्यालाच संततधार विधी म्हणतात.
- त्यावेळी नरसोबाच्या वाडीचे पुजारी ३ पाळ्यांमध्ये आठ तास पवमानसूक्त, रुद्रावर्तने, पुरुषसूक्त, श्रीगुरुचरित्र पठण करीत असतात.
- एरवी शेजारतीनंतर देवांच्या कट्टयावर जायला परवानगी नसते पण संततधार चालू असताना असते.
- मध्यरात्रीही भक्त मागील बाजूला अभिषेक चालू असलेल्या पादुकांचे दर्शन घेऊ शकतात.
- देवस्थानच्या संततधारेनंतर ज्यांना वैयक्तिक संततधार करायची असेल ते देवस्थानच्या परवानगीने करू शकतात.
- आता वेळेच्या अभावामुळे खूप कमी प्रमाणावर भक्त संततधार करतात.
कशी केली जाते संततधार?
- ओवरी नारळाच्या झावळ्यांनी आणि विविध फुलांनी सजवलेली असते.
- श्रीनरसिंहसरस्वती दत्त महाराजांची सुरेख तसबीर ठेवलेली असते.
- देवाच्या कट्टयावर मागील बाजूच्या ओवरीत एका मोठ्या परातीत अभिषेकासाठीच्या दत्तपादुका ठेवल्या जातात. एका मोठ्या अडणीवर अभिषेकपात्र ठेवले जाते.
- सतत आठ दिवस संततधार चालू असते.
- सतत हंडे भरले जातात आणि सतत वेदपठण सुरु असते.
- सातही दिवस श्रीगुरुचरित्र सप्ताह सुरू असतो. समाप्तीला सामुदायिक पवमानसूक्त पठन केले जाते.
- संततधार विधी चैत्र शुद्ध पंचमी ते द्वादशी असे आठ दिवस असतो.
श्री गुरूचरित्रातील संगम व स्थानाचं महात्म्य
भक्तिभावें श्रीगुरुसी । नमन करी प्रतिदिवसीं ।
सेवा करी कलत्रेसी । एकोभावेंकरुनियां ॥
वर्ततां ऐसे एके दिवसीं । आली पौर्णिमा माघमासीं ।
नमन करुनि श्रीगुरुसी । विनवीतसे तो भक्त ॥
म्हणे स्वामी जगद्गुरु । माघस्नानी प्रयाग थोरु ।
म्हणोनि सांगती द्विजवरु । काशीपुर महाक्षेत्र ॥
कैसे प्रयाग गयास्थान । कैसे वाराणसी भुवन ।
नेणों आपण यातिहीन । कृपा करणें स्वामिया ॥
श्रीगुरु म्हणती तयासी । पंचगंगासंगमेसी ।
‘प्रयाग’ जाणावें भरंवसीं । ‘काशीपुर’ तें जुगुळ ॥
दक्षिण ‘गया’ कोल्हापुर । त्रिस्थळ ऐसे मनोहर ।
जरी पहासी प्रत्यक्षाकार । दावीन तुज चाल आतां ॥
बैसले होते व्याघ्राजिनीं । धरीं गा मागें दृढ करुनि ।
मनोवेगें तत्क्षणीं । गेले प्रयागा प्रातःकाळीं ॥
तेथे स्नान करुनि । गेले काशीस माध्याह्नी ।
विश्र्वनाथा दाखवूनि । सवेंचि गेले गयेसी ।।
ऐसी त्रिस्थळी आचरोनि । आले परतोनि अस्तमानीं ।
येणेंपरी तयास्थानीं । देखता झाला तो नर ।।
विश्र्वनाटक श्रीगुरुमूर्ति । प्रगट झाली ऐसी कीर्ति ।
श्रीगुरु मनीं विचारिती । आतां येथें गौप्य व्हावें ॥
ऐसेपरी तयास्थानीं । प्रकट झाले श्रीगुरुमुनि ।
अमरेश्र्वराते पुसोनि । निघते झाले तये वेळीं ॥
श्रीगुरु निघतां तेथोनि । आल्या चौसष्ट योगिनी ।
विनविताति करुणावचनीं । आम्हां सोडूनि केवीं जातां ॥
नित्य तुमचे दर्शनेसीं । तापत्रय हरती दोषी ।
अन्नपूर्णा तुम्हांपाशीं । केवीं राहूं स्वामिया ॥
येणेपरी श्रीगुरुसी । योगिनी विनवीती भक्तीसी ।
भक्तवत्सलें संतोषी । दिधला वर तया वेळीं ॥
श्रीगुरु म्हणती तयांसी । सदा असो औदुंबरेसी ।
प्रकटार्थ जाणे पूर्वेसी । स्थान आमुचे येथेचि असे ॥
तुम्ही रहावे येथे औदुंबरी । कल्पवृक्ष मनोहरी ।
अन्नपूर्णा प्रीतिकरीं । औदुंबरी ठेवितों ॥
कल्पवृक्ष औदुंबर । येथे असा तुम्ही स्थिर ।
अमरापुर पश्र्चिम तीर । आम्हा स्थान हेचि जाणा ॥
प्रख्यात होईल स्थान बहुत । समस्त नर पूजा करीत ।
मनकामना होय त्वरित । तुम्ही त्यांसी साह्य व्हावें ॥
तुम्हांसहित औदुंबरी । आमुच्या पादुका मनोहरी ।
पूजा करिती जे तत्परी । मनकामना पुरती जाणा ॥
येथे असे अन्नपूर्णा । नित्य करिती आराधना ।
तेणें होय कामना । चतुर्विध पुरुषार्थ ।
।। श्री गुरूदेव दत्त ।।
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी सत्पुरूषांचं वास्तव्य
- श्री नरसिंहसरस्वती १२ वर्षे वास्तव्य – लिलाभूमी
- श्री दीक्षित स्वामी
- श्री वासुदेवानंद सरस्वती
- श्री मौनी बाबा
- श्री रामचंद्रयोगी
- श्री नारायणस्वामी
- श्री गोपालस्वामी
- श्री ब्रम्हानंद स्वामी.
स्थान माहिती
- श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त देवस्थान,
- श्री क्षेत्र नृसिंहवाडी
- तालुका शिरोळ
- जिल्हा कोल्हापूर
- पिनकोड क्र. ४१६१०४