मुक्तपीठ टीम
देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेच्या ९९.५५ टक्के नगरसेवकांनी २०१७ – १८ ते २०२० – २१ दरम्यान सामान्य नागरिकांच्या तक्रारी आणि प्रश्नांना प्राधान्य दिले नाही. प्रजा फाउंडेशनने मुंबई महापालिका नगरसेवक रिपोर्ट कार्ड जारी केले आहे. या २०२१ कार्यअहवालामुळे गेल्या पाचवर्षातील मुंबई मनपाच्या कामकाजाची माहिती समोर झाली आहे. कामगिरीच्या आधारे २०२१ च्या प्रगती पुस्तकात सर्वाधिक गुण काँग्रेसच्या रवि राजा ८१.१२%, दुसऱ्या क्रमांकाचे गुण शिवसेनेचे समाधान सरवणकर ८०.४२% आणि तिसऱ्या क्रमांकाचे भाजपाचे हरीश छेडा ७७.८१% यांना मिळाले आहेत. वर्षागणिक नगरसेवकांची सभागृहातील उपस्थिती कमी होत चालल्याकडेही प्रजाच्या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.
नगरसेवकांची घटती उपस्थिती
नगरसेवकांच्या रिपोर्ट कार्डविषयी माहिती देताना प्रजा फाउंडेशनचे संचालक मिलिंद म्हस्के म्हणाले की, २०१२-१३ मध्ये नगरसेवकांची उपस्थिती ८१ टक्के असायची. जी २०१४ – १५ मध्ये ६९ टक्क्यांवर आले. ते म्हणाले की, विद्यमान २२७ नगरसेवकांचा कार्यकाळ २०१७ – १८ पासून सुरू झाला. त्या वर्षी नगरसेवकांची उपस्थिती ८२% होती, परंतु २०१९-२० मध्ये ती ७४ टक्क्यांवर आली.
५० टक्के नगरसेवकांकडून चार वर्षात फक्त १७ प्रश्न
प्रजा फाऊंडेशनच्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त निताई मेहता म्हणाले की २०१७ -१८ ते २०२० – २१ या चार वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे ५० टक्के नगरसेवकांनी केवळ १७ प्रश्न विचारले आहेत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ४ वर्षात नगरसेवक मोहम्मद सलीम कुरेशी आणि श्रीमती गुलनाज यांना कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउन दरम्यान, एप्रिल २०२० ते मार्च २०२१ दरम्यान आयोजित विविध सभांमध्ये एकही प्रश्न विचारला गेला नाही.
राजकीय पक्षांच्या कमिगिरीवर देण्यात आले गुण
प्रजा फाऊंडेशनच्या मुंबई महापालिका नगरसेवक रिपोर्ट कार्ड – २०२१ मधील राजकीय पक्षांचा सरासरी स्कोअर देखील जारी करण्यात आला आहे.
1. काँग्रेसच्या २८ नगरसेवकांची सरासरी कामगिरी ५७.२१ टक्के
2. शिवसेनेच्या ९२ नगरसेवकांची ५५.८८ टक्के
3. समाजवादी पक्षाच्या ६ नगरसेवकांची ५५.०५ टक्के
4. भाजपाच्या ८१ नगरसेवकांची ५५.०१ टक्के होती.
नगरसेवकांच्या प्रगतीपुस्तकातील महत्वाचे शेरे
महामारीमुळे यंदा एरवीप्रमाणे नगरसेवकांचे वार्षिक प्रगती पुस्तक जाहीर न करण्याचे प्रजाने ठरवले आहे. त्याऐवजी, लोकप्रतिनिधींचे ‘संयुक्त प्रगती पुस्तक’ तयार केले असून त्यामध्ये आर्थिक वर्ष एप्रिल २०१७-१८ ते २०२०-२१ या कालावधीतील नगरसेवकांच्या कामगिरीचा विचार केलेला आहे.
नगरसेवकांची कामगिरी
- या संयुक्त प्रगती पुस्तकाच्या कालावधीत एकूण नगरसेवकांपैकी केवळ १०% (२२) जणांनी श्रेणी A व B प्राप्त केलेली असून अन्य नगरसेवकांना C, D, E व F या श्रेणी मिळाल्या आहेत.
- २०२१ च्या प्रगती पुस्तकातील सर्वाधिक गुण प्राप्त केलेले प्रथम तीन क्रमांकावरील लोकप्रतिनिधी पुढीलप्रमाणे: रवि कोंडू राजा – कॉंग्रेस (श्रेणी 1 – गुण – 81.12%), समाधान सदानंद सरवणकर – शिवसेना (श्रेणी 2 – गुण – 80.42%) आणि हरीश रावजी छेडा भाजपा (श्रेणी 3 – गुण – 77.81%).
नगरसेवकांची उपस्थिती
- टर्मच्या प्रत्येक वर्षागणिक नगरसेवकांची उपस्थिती कमी होताना दिसते आहे. मागील टर्मच्या वर्ष 2012-13 मध्ये नगरसेवकांच्या एकंदर उपस्थितीची टक्केवारी 81% होती, जी 2014-15 मध्ये 69% वर आली. तसेच, चालू टर्ममध्ये 2017-18 मध्ये एकंदर उपस्थिती 82% होती जी 2019-20 मध्ये 74% वर आली.
नगरसेवकांचा सहभाग
- 2017-18 ते 2020-21 या कालावधीमध्ये 50% (115) नगरसेवकांनी वर्षभराच्या काळात केवळ 17 प्रश्न विचारले आहेत.
- नागरिकांच्या तक्रारी प्रशासनापर्यंत नेणे व त्यांची सोडवणूक करणे ही नगरसेवकांची एक मुख्य जबाबदारी आहे. मात्र 2017-18 ते 2020-21 या कालावधीमध्ये 99.55% नगरसेवकांनी नागरिकांच्या तक्रारींना प्रश्न विचारताना प्राधान्य दिल्याचे दिसत नाही. ज्यामुळे त्यांची श्रेणी E व F वर घसरलेली आहे.
- मागील चार वर्षात नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन केले असता कोणत्याही नगरसेवकाला A श्रेणी प्राप्त करता आलेली नाही.
सभागृहात प्रश्नच न विचारणारे नगरसेवक
- गुलनाझ मो. सलिम कुरेशी (AIMIM – H/E वॉर्ड) यांनी 2017-18 ते 2020-21 या कालावधीमध्ये एकही प्रश्न विचारलेला नाही. तसेच, एप्रिल 2020 – मार्च 2021 या महामारीच्या काळात ज्या विविध बैठकां झाल्या त्यात 30 नगरसेवकांनी एकही प्रश्न विचारलेला नाही.
- कामगिरीची पक्षनिहाय तुलना केली असता सर्वाधिक चांगली कामगिरी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची असून त्यांचे आर्थिक वर्ष 2017-21 काळातील गुण 57.21% आहेत, त्याखालोखाल शिवसेना (55.88%) आणि समाजवादी पार्टी (55.05%) नगरसेवकांची कामगिरी आहे.
- मुंबई, 19 ऑगस्ट: प्रजा फाऊंडेशनतर्फे ‘मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांचे प्रगती पुस्तक 2021’ आज गुरुवार, दिनांक 19 ऑगस्ट 2021 रोजी जाहीर झाले असून त्यामध्ये आर्थिक वर्ष एप्रिल 2017-21 या कालावधीतील नगरसेवकांच्या कामगिरीचा संयुक्तपणे विचार केलेला आहे. आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना नागरिकांप्रती उत्तरदायी करण्याच्या आणि संविधानाने त्यांच्यावर सोपवलेली कर्तव्ये पार पाडण्यास सहाय्य करण्याच्या हेतूने त्यांच्या कामगिरीचा आढावा या प्रगती पुस्तकात घेतलेला आहे.
“कोरोना जन्य परिस्थितीच्या ताणामुळे मुंबई महानगरपालिकेचे नियमित कामकाज काहीसे विस्कळीत झाले याची जाणीव प्रजाला आहे. लोकप्रतिनिधींच्या बैठका व नागरिकांच्या प्रश्नांवरील उहापोह इतर वेळेसारखा होऊ शकला नाही. त्यामुळेच प्रजाने यावर्षी एरवीप्रमाणे लोकप्रतिनिधींचे वार्षिक प्रगती पुस्तक तयार न करता ‘संयुक्त प्रगती पुस्तक’ जाहीर करायचे ठरवले. आर्थिक वर्ष एप्रिल 2017-18 ते 2020-21 या कालावधीसाठी नगरसेवकांच्या कामगिरीचा विचार यामध्ये केलेला आहे.”, असे प्रजाचे संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त निताई मेहता यांनी सांगितले.
कोरोना संकटात मुंबई मनपाचे चांगले काम
“कोरोनाकाळात मुंबई महानगरपालिकेने सर्व 24 प्रभागांमध्ये वॉर्ड स्तरीय ‘कोरोना वॉर रूम’ तयार करून विकेंद्रित पद्धतीने काम केले आणि दाखवून दिले की स्थानिक पातळीवर प्रभावीपणे व कार्यक्षमतेने काम केले तर नागरिकांच्या प्रश्नांची तड लावता येते व यामध्ये नगरसेवक महत्त्वाची भूमिका निभावतात. कोरोना मुळे 2020 मध्ये लागू केलेल्या टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात जे मदतकार्य झाले त्यात नगरसेवक सक्रीय सहभागी झाले होते. तातडीची मदत लोकांपर्यंत पोहोचावी याकरिता मुंबई महानगरपालिकेने विविध संस्थांशी समन्वयाने काम केले. मात्र असेच समन्वयातून केलेले काम दीर्घ काळ करत राहणे जरूरीचे आहे. यासाठी स्थानिक शासनाचे कामकाज नियमित झाले, बैठका झाल्या आणि त्यातून शासनाला उत्तदायित्व सिद्ध करायला भाग पाडले पाहिजे.”, असे मत प्रजाचे संचालक मिलिंद म्हस्के यांनी मांडले.
तंत्रज्ञानाच्या वापराने बैठका, चर्चा आणि गुणवत्ता वाढ आवश्यक!
टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये या नियमित बैठका व विचारविनिमयाच्या चर्चा पूर्णपणे थांबल्या होत्या, त्यानंतर काही काळाने त्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऑनलाईन स्वरूपात सुरू झाल्या. महामारी असो वा नसो, कोणत्याही काळात टेलिकम्युनिकेशन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून कामकाजाची गुणवत्ता आणि बैठकांची संख्या दोन्हीही वाढवणे जरूरीचे आहे. एप्रिल 2017 ते मार्च 2020 या काळात सरासरी 24 वॉर्ड बैठका दर महिन्याला घेण्यात आल्या. तर ऑक्टोबर-डिसेंबर 2020 या दरम्यान जेव्हा वॉड स्तरीय बैठका ऑनलाईन स्वरूपात झाल्या तेव्हा ही संख्या महिन्याला सरासरी 28 अशी होती. एप्रिल 2017 ते मार्च 2021 या काळातील मासिक सरासरी बैठकसंख्या पुढीलप्रमाणे आहे – वॉर्ड समित्यांच्या 21 बैठका, वैधानिक समितीच्या 32 बैठका, सर्वसाधारण सभेच्या 7 बैठका दरमहा झाल्या. तंत्रज्ञानाच्या वापर करून ही बैठक संख्या व चर्चेची गुणवत्ता वाढवता येईल आणि अधिक समावेशक पद्धतीने निर्णप्रक्रिया होऊ शकेल.
जास्त वॉर्ड समित्यांची गरज
मुंबईमध्ये सध्या 24 वॉर्ड आहेत आणि 17 वॉर्ड समित्या आहेत. स्थानिक प्रश्नांची चर्चा प्रभावीपणे होण्यासाठी व मतदारसंघातील प्रश्नांची अल्पावधीत तड लागावी यासाठी जितके वॉर्ड तितक्या समित्या असणे गरजेचे आहे. याखेरीज निर्णयांची अंमलबजावणी व समस्या निवारण अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशासनाने नगरसेवकांशी समन्वयाने काम केले पाहिजे.
जास्त नगरसेवकांना सी, डी श्रेणी
“संयुक्त माहितीचे विश्लेषण केले असता या वेळी प्रगती पुस्तकाचे सरासरी गुण 55.10% आहेत, तर मागील टर्ममध्ये (एप्रिल 2012-मार्च 2016) मध्ये सरासरी गुण 58.92% होते. एप्रिल 2017-मार्च 2021 यादरम्यान, एकूण 220 नगरसेवकांपैकी, 71 नगरसेवक ‘E’ आणि ‘F’ या श्रेणीमध्ये होते आणि केवळ 2 जणांना ‘A’ श्रेणी व 20 जणांना ‘B’ श्रेणी मिळाली आहे. बहुसंख्य, म्हणजे 127, नगरसेवकांना ‘C’ व ‘D’ श्रेणी मिळालेल्या आहेत. समित्यांचे कामकाज कार्यक्षमपभे करून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी A, B, C व D श्रेणीतील नगरसेवकांची संख्या वाढली पाहिजे आणि E व F श्रेणीमध्ये कोणीच नगरसेवक येता कामा नये.”, असेही म्हस्के यांनी म्हटले.
निवडणुका जवळ आल्याने कार्य मूल्यमापनाची योग्य वेळ
“हा बदल घडण्यासाठी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विचारविनिमयाच्या अधिक बैठका घेणे, संबंधित हितधारकांमधील परस्पर समन्वय वाढवणे आणि सत्तेचे विकेंद्रिकरण करणे जरूरीचे आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत, त्यामुळे चालू टर्मच्या नगरसेवकांच्या कामगिरीचा विचार करण्याची ही अगदी योग्य वेळ आहे असे आम्हाला वाटते.”, असे निताई मेहतानी सांगितले.