मुक्तपीठ टीम
मोदी सरकारने देशातील नागरिकांसाठी समान नागरी कायदा आणण्याची तयारी सुरू केली आहे. या कायद्याचे प्रस्तावित विधेयक आगामी काळात संसदेत मांडण्याची शक्यता आहे. केंद्रीय कायदा मंत्रालयाने या कायद्याचा मसुदा राज्यांना पुरवल्यामुळे तो तयार केला असल्याचे उघड झाले.
एकप्रकारे समान नागरी कायद्याविषयीचे जनमत अजमावण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी तसा कायदा बनवण्यासाठीचे प्रयत्न उत्तराखंडमध्ये सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी त्या राज्यात एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीसाठी मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा केंद्रीय कायदा मंत्रालयाने पुरवला आहे. त्यामुळे समान नागरी कायद्याचा मसुदा केंद्राने तयार केला असल्याचे जाणकारांच्या लक्षात आले.
समान नागरी कायद्याचा प्रवास कसा होईल?
- राज्यांमध्ये समान नागरी कायदा प्रायोगिक तत्त्वावर तयार केला जात आहे.
- राज्यांमध्ये बनवलेले समान नागरी कायदे नंतर केंद्रीय कायद्यात समाविष्ट केले जातील.
- समानता आणण्यासाठी कायदा हा केंद्रीय असला पाहिजे.
- मोदी सरकारच्या अजेंड्यानुसार हा कायदा नक्की येणार पण तो कधी आणि केव्हा येणार, हाच प्रश्न आहे.
- उत्तराखंडनंतर मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश या अन्य राज्यांमध्येही ही समिती स्थापन होण्याची शक्यता आहे.
- या राज्यांनी एकसमान नागरी संहिता आधीच मान्य केली आहे.
सध्याचे कायदे कसे आहेत?
- सध्या वैयक्तिक कायदे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारशी यांच्यासाठी त्यांच्या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत.
- हिंदूंचे कायदे वेद, उपनिषदे, स्मृती, न्याय, समानता इत्यादींच्या आधुनिक कल्पनांवर आधारित आहेत.
- सध्याच्या कायद्यांमुळे संयुक्त हिंदू कुटुंबांना मिळणारी आयकर सवलत मिळते.
- तर मुस्लिमांचे कायदे कुराण, सुन्ना, इज्मा आणि कियास यावर आधारित आहेत.
- त्याचप्रमाणे, ख्रिश्चनांचे कायदे बायबल, चालीरीती, तर्कशास्त्र आणि अनुभवाच्या आधारे बांधलेले आहेत.
- झोरोस्ट्रियन लोकांच्या कायद्याचा आधार झेंड अवेस्ता आणि रुडीस हे त्यांचे धार्मिक ग्रंथ आहेत.
समान नागरी कायदा म्हणजे काय ?
समान नागरी कायद्यामुळे देशातील सर्व नागरिकांसाठी विवाह, लग्नाचे वय, घटस्फोट, देखभाल, वारसा, सह-पालकत्व, मुलांचा ताबा, वारसा, कौटुंबिक मालमत्तेचे विभाजन, मृत्युपत्र, धर्मादाय इत्यादींवर समान नियम लागू होतील,
मग नागरिक कोणत्याही धर्माचे किंवा पंथाचे किंवा श्रद्धेचे असले तरीही सर्व नियम समान असतील.