मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाचं संकटाची दुसरी लाट उसळलेली असतानाच माणुसकीची प्रसन्नताही बहरत आहे. त्यामुळे मनाला एक वेगळा दिलासा मिळत आहे. ताजं उदाहरण मुंबईतील एका डॉक्टर दांपत्याचं आहे. ते एका वेगळ्या संकल्पनेवर काम करत आहेत. ते कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांकडून उरलेली औषधे गोळा करतात आणि गरजू रूग्णांना पुरवतात. डॉ. मार्कस रन्ने आणि त्यांची पत्नी डॉ. रॅनाने ‘मेड फॉर मोअर’ ही मोहीम सुरू केली. कोरोनाविरुद्ध युद्ध जिंकलेल्या रूग्णांकडे उरलेली चांगली औषधे गोळा करणे आणि गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवणे हे त्यांच्या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
त्यांनी हा उपक्रम एक मेपासून सुरू केला आहे. ते गृहनिर्माण संस्थांकडून औषधे गोळा करतात आणि ज्यांना गरज असेल त्यांना पुरवतात. जेव्हा त्यांच्या कर्मचार्यांमधील एका कुटुंबाला कोरोना झाला आणि औषधाची गरज भासली तेव्हा ही कल्पना सुचली. त्यांनी कोरोनावर मात केलेल्या रुग्णांकडून औषधे गोळा करून ती गरजूंपर्यंत पोहचवण्याचा निर्णय घेतला.
‘मेड फॉर मोअर’चे काम चालते कसे?
• या डॉक्टर दांपत्याने १०० इमारतींची साखळी तयार केली आहे.
• तेथे असलेल्या सहकारी संस्था इमारतींमधून उरलेली औषधे गोळा करतात आणि त्यांना पाठवतात.
• त्यांची आठ लोकांची एक टीम आहे आणि सोबत विविध इमारतींमधील स्वयंसेवक.
• जे औषधे खरेदीसाठी बाहेर जाऊ शकत नाहीत किंवा ज्यांना औषधांची खूप गरज आहे, अशाना मदत करण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरु झाले.
• या जोडप्याने अवघ्या १० दिवसात बरे झालेल्या रूग्णांकडून २० किलो औषधे गोळा केली.
• ही औषधे संपूर्ण भारतातील ग्रामीण जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रांना दान करण्यात येतील, जिथे त्यांची सर्वात जास्त आवश्यकता आहे.
गेल्या आठवड्यात त्यांनी २० किलो औषधे गोळा केली. ती औषधे स्वयंसेवी संस्थांना पाठवली गेली. ‘मेड फॉर मोअर’ने कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या अँटीबायोटिक्स, फॅबिफ्लू, वेदना कमी करणारी औषधे, स्टिरॉइड्स, इनहेलर, जीवनसत्त्वे, अँटासिड्स इत्यादी सर्व प्रकारची औषधे गोळा केली. याव्यतिरिक्त, ते पल्स ऑक्सिमीटर आणि थर्मामीटरसारखी मूलभूत औषधी साधने देखील गोळा करीत आहेत. याबद्दल माहिती मिळू लागल्यानंतर शेजारच्या इमारतींमधील रहिवाशांनी स्वेच्छेने औषधे संकलन करण्यास प्रारंभ केला आहे.
पाहा व्हिडीओ: