मुक्तपीठ टीम
अविश्रांतपणे गेले वर्षभर करोनाची लढाई लढणाऱ्या डॉक्टर, परिचारिका तसेच आरोग्यसेवकांचे ऋण मानणे हे समाजाचे कर्तव्य आहे. याच एका भावनेतून ठाणे पश्चिम येथील घंटाळी नाक्यावरील संदीप आचार्य मित्र मंडळाने शनिवारी नायर रुग्णालयात जाऊन हापूस आंब्याच्या २०० पेट्यांची गोड भेट डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली आहे. गेले महिनाभर सुरु असलेल्या या सामाजिक कृतज्ञता यज्ञात १५०० आंब्याच्या पेट्या महापालिका व राज्य शासनाच्या रुग्णालयात देण्यात आल्या आहेत.
घंटाळी नाका ठाणे येथील संदीप आचार्य मित्र मंडळाच्यावतीने करोना काळात वैद्यकीय मदतीचे अनेक उपक्रम राबविण्यात आले. यात विविध रुग्णालयात पीपीइ किट व मास्क वाटपा पासून गरजू रुग्णांना औषधे मिळवून देणे, रक्तदान शिबिरांच्या आयोजनापासून अनेक उपक्रम राबविण्यात आले होते. रुग्णांच्या मदतीसाठी अखंड धावपळ सुरु असतानाच प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करणार्या डॉक्टर, परिचारिका व वॉर्डबॉय यांच्यासाठी सामाजिक कृतज्ञता म्हणून काहीतरी ठोस केले पाहिजे ही भावना बळावत चालली होती. मित्रमंडळाच्या गप्पात एक दिवस रुग्णालयात आंबे वाटप करण्याची कल्पना संदीपने मांडली आणि लगेच त्याची अंमलबजावणी करण्याचे निश्चित झाले. यातून १ मे रोजी प्रथम ठाणे जिल्हा रुग्णालयात डॉ कैलास पवार यांच्याकडे १०० हापूस आंब्याच्या पेट्या देण्यात आल्या. त्यापाठोपाठ ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात १०० आंब्याच्या पेट्या उपसंचालक डॉ गौरी राठोड व डॉ अविनाश भागवत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
पुढे शीव रुग्णालयात रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ मोहन जोशी यांच्याकडे २०० आंब्याच्या पेट्या तर बीकेसी जम्बो कोरोना रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ ढेरे यांच्याकडे देण्यात आल्या. त्यानंतर परळच्या वाडिया रुग्णालयात २०० आंब्याच्या पेट्या दिल्या तर जे जे रुग्णालय व सेंट जॉर्ज रुग्णालयासाठी ४०० आंब्याच्या पेट्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत देण्यात आल्या. आज शनिवारी २२ मे रोजी नायर रुग्णालयात जाऊन संदीप आचार्य मित्र मंडळाने नायरचे अधिष्ठाता व महापालिका रुग्णालयांचे संचालक डॉ रमेश भारमल यांच्याकडे २०० आंब्याच्या पेट्या देण्यात आल्या. दरम्यान ठाणे जिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा १०० आंब्याच्या पेट्या तसेच ३७०० मास्क आणि ग्लुकोज बिस्किटांचे दहा खोके देण्यात आले.
कोरोनाची पहिली लाट, त्यापाठोपाठ आलेली दुसरी लाट आणि आता तिसऱ्या लाटेची भीती या काळात शासकीय व महापालिका रुग्णालयांत ज्या सेवाभावाने रुग्णांवर उपचार केले त्याला तोड नाही. घरदार एवढेच नव्हे तर स्वत:चा जीव पणाला लावून अखंड रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांविषयी केवळ थाळ्या व टाळ्या वाजवून अथवा दिवे लावून कृतज्ञता व्यक्त करणे पुरेसे ठरणारे नाही.
समाजातील अनेक घटक यात स्वयंसेवी संस्था, व्यक्ती, राजकारणी वेगवेगळ्या प्रकारे मदत करत होते व करत आहेत. अनेकांनी गरजूंना अन्नधान्य वाटप केले. कोणी बंदोबस्तावरील पोलिसांना चहा, जेवण, पाणी देण्याचे काम केले. संदीप आचार्य मित्रमंडळानेही सुरुवातीला यातील काही उपक्रम राबवले. तथापि डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांसाठी काहीतरी आगळावेगळा उपक्रम राबविण्याच्या भूमिकेतून आंबे वाटपाची संकल्पना सुचली. गेले पंचवीस दिवस झपाटल्यासरखे संपूर्ण संदीप आचार्य मित्रमंडळ ही संकल्पना राबविण्यासाठी दिवसरात्र काम करत होती. या योजनेसाठी विख्यात हार्ट सर्जन डॉ अन्वय मुळे, डॉ राजेश मोरे, डॉ अमोल अन्नदाते, राजेश कोडनानी यांच्यासह सर्वच मित्रांनी सढळ हस्ते मदत केली. मुंबई महापालिकेच्या माजी चिटणीस मृदुल जोशी यांनी नुसते कौतुक न करता १० हजार रुपयांची मदत केली.
संदीप(नैनेश) पाटणकर, नितीन कामथे, अजय जया, मोहन साठे,संदिप आवारी, प्रमोद हेदुलकर, श्रीकांत खरे, अनिल वाल्मिकी, सुश्रुत पाटणकर, सुनेश जोशी, संतोष पाटील, अतुल मालुसरे, प्रदीप भावे, लतेश सुर्वे, उदय पाटील, श्रीकांत पाटील, अभय यादव, करण वाल्मिकी यांच्यासह अनेक मित्र या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी सतत झटत होते. आंबेवाले सचिन मोरे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांच्या प्रती सामाजिक कृतज्ञतेच्या भावनेने संदीप आचार्य मित्र मंडळाने वेगवेगळ्या रुग्णालयात जाऊन १५०० हापूस आंब्याच्या पेट्या दिल्या. डॉ कैलास पवार, डॉ मोहन जोशी, डॉ ढेरे, डॉ तात्याराव लहाने तसेच डॉ रमेश भारमल यांनी या आंबा वाटप संकल्पनेचे मनापासून कौतुक केले. ही संकल्पना राबवताना समाजातील वेगवेगळ्या घटकांनीही डॉक्टरांचा आपल्या परीने सन्मान व कृतज्ञता व्यक्त करावी हिच भावना होती व आहे.
घंटाळी नाका ठाणे संदीप आचार्य मित्रमंडळाची ही संकल्पना अनेकांना आवडली व त्यांनीही ती राबवली. बदलापूर, नवी मुंबई, पालघर, पुणे, जळगाव आदी ठिकाणच्या सामाजिक संस्था व व्यक्तींनीही आंबे वाटपाचा हा उपक्रम राबवला असून त्यांनाही आम्ही अभिवादन करतो. आंबे देताना आम्ही मित्रमंडळी एकेक हापूसचा आंबा निवडून पेटीत भरायचे. साधारणपणे १०० पेट्या भरण्यासाठी किमान साडेचार तास लागायचे. आमचा हा उपक्रम असाच पुढे चालावा अशी आमच्या मित्रमंडळाची इच्छा आहे…. करोनाची लढाई अजूनही संपली नाही…. डॉक्टर मंडळी अविश्रांतपणे लढतच आहेत… त्यामुळे आमचेही डॉक्टरांविषयीचा कृतज्ञता यज्ञ असाच यापुढेही सुरु राहाणार आहे… लोकांनीही आपापल्या परीने डॉक्टर व आरोग्य सेवकांविषयी कृतज्ञता व्यक्त करावी.