मुक्तपीठ टीम
संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारी सुरु होत आहे. हे अधिवेशन १८ जुलैपासून १२ ऑगस्टपर्यंत सुरु राहण्याची शक्यता आहे. या अधिवेशनामध्ये अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित करण्याची शक्यता आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सत्तांतरण, अग्निपथ, काश्मिकी पंडितांवरील हल्ले, प्रयागराज बुलडोझर प्रकरण असे मुद्दे उपस्थित होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संभाव्य प्रश्नांच्या यादीनुसार, काश्मीर खोऱ्यातील स्थलांतरित आणि काश्मिरी पंडितांवर हल्ले, माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे संरक्षण, २०२१ च्या जनगणनेची स्थिती आणि बेकायदेशीर कृती कायद्यांतर्गत नोंदवलेले खटले यासारखे मुद्देही खासदारांद्वारे उठवले जाऊ शकतात.
महाराष्ट्रातील सत्तांतरण
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्यातील सत्तांतराला सुरुवात झाली. एकनाथ शिंदेसह ३९ आमदारंनी बंड करत आधी सूरत नंतर गुवाहाटी गाठलं. शिवसेनेत फूट पडून शिवसेनेचे दोन गट पडले. एकनाथ शिंदे यांचा गट भाजपासोबत गेल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.
अग्निपथ योजनेच्या मुद्दा
अग्निवीरांना निमलष्करी दलातील आरक्षणाचा मुद्दा अतारांकित प्रश्नाद्वारे सूचीबद्ध केला असला तरी विरोधी पक्ष इतर माध्यमातूनही हा मुद्दा उपस्थित करतील अशी शक्यता आहे.१४ जून रोजी केंद्र सरकारने संरक्षण सेवेत साडे १७ वर्षे ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांच्या सैन्यात भरतीसाठी महत्त्वाकांक्षी अग्निपथ योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. याअंतर्गत चार वर्षांच्या अल्प कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने सैनिकांची भरती करण्यात येणार असून, भरती झालेल्या सैनिकांचे नाव अग्निवीर ठेवण्यात येणार आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर, केवळ २५ टक्के अग्निवीरांना नियमित सेवेत राहण्याची संधी दिली जाईल. या योजनेच्या विरोधात देशातील अनेक भागात हिंसक निदर्शनेही झाली.
बुलडोझर
प्रयागराजला १० जून रोजी झालेल्या हिंसाचाराचा मास्टरमाईंड जावेदच्या घरावर दुपारी साडे बाराच्या सुमारास बुलडोझर फिरवण्यात आला. कायदेशीर प्रक्रियेत जावेदचे घर तोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रशासनाने चार तासांत बुलडोझर आणि पोकलेनच्या सहाय्याने जावेदचे घर पाडले. घर तोडण्यापूर्वी काही महत्त्वाच्या वस्तू बाहेर नेण्याची परावनगी देण्यात आली होती.
सरकारला घेरण्याचा विरोधकांचा डाव
संसदेच्या या अधिवेशनात निमलष्करी दलातील जवानांच्या कुटुंबीयांना भरपाई, नक्षलवादी हल्ले, दंगल, कर्फ्यू आणि पोलिसांच्या गोळीबाराच्या घटना, सीमेपलीकडून होणारी अंमली पदार्थांची तस्करी, दहशतवादी हल्ल्यांच्या घटना यासारखे मुद्देही उपस्थित होण्याची शक्यता आहे. निमलष्करी दलातील भरतीला होणारा विलंब, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटना, अतिवृष्टीमुळे होणारी जीवित आणि मालमत्तेची हानी, लडाख या केंद्रशासित प्रदेशातील बेरोजगारीचा मुद्दा, जम्मू-काश्मीरमधील भूसंपादन हे काही संभाव्य प्रश्न आहेत.