मुक्तपीठ टीम
शिक्षण म्हणजे केवळ शालेय अभ्यासक्रम नसून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक घडविणे याला अधिक महत्त्व आहे. वातावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये जागृतीसाठी पर्यावरण विभागाने अतिशय उपयुक्त अभ्यासक्रम तयार केला असून शालेय शिक्षण विभाग त्याची कालबद्ध अंमलबजावणी करून आपली जबाबदारी निश्चित पूर्ण करेल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने युनिसेफच्या साहाय्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वातावरणीय बदल म्हणजे नक्की काय, त्याचे परिणाम आणि आपण काय करायला हवे याबाबत माहिती देणारा ‘माझी वसुंधरा’ अभ्यासक्रम तयार केला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या अभ्यासक्रमाची पुस्तके शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात सुपूर्द केली. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे महासंचालक जयराज फाटक, युनिसेफचे राजलक्ष्मी, .युसूफ, माझी वसुंधराचे अभियान संचालक सुधाकर बोबडे आदी यावेळी उपस्थित होते.
Education is about helping children better interact with their environment. Through the #MajhiVasundhara curriculum, to be introduced in schools, we hope to prepare young minds to respect, protect and save the environment. #ClimateAction @scertmaha @MahaDGIPR @thxteacher @UNICEF pic.twitter.com/zulLYGcNqO
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 13, 2021
शालेय शिक्षण मंत्री गायकवाड म्हणाल्या, पर्यावरण विभागाने माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून अतिशय चांगले उपक्रम राबविले आहेत. वातावरणीय बदलांविषयी भावी पिढीला जागरूक करण्यासाठी शालेय अभ्यासक्रम हा त्यातील अत्यंत उपयुक्त उपक्रम ठरेल. शालेय शिक्षण विभागामार्फत नववीपासून पुढे असा अभ्यासक्रम यापूर्वीच शिकविला जातो. आता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये जागृतीसाठी नवीन अभ्यासक्रम मोलाचा ठरेल. शालेय शिक्षण विभागामार्फत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यासक्रमासाठी समिती कार्यरत आहे. या समितीमध्ये पर्यावरणविषयक तज्ज्ञांचाही समावेश करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण अनिवार्य आहेच, तथापि भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर अडचण येऊ नये यादृष्टीने पहिलीपासून द्वैभाषिक अभ्यासक्रम शिकविण्याचे नियोजन असल्याचेही त्या म्हणाल्या.
स्वत:ला वाचवायचे असेल तर वातावरणीय बदलांबाबत आजच कृती आवश्यक
या अभ्यासक्रमाची आवश्यकता सांगताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, वातावरणीय बदल ही आता जागतिक समस्या बनली असून ती प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचली आहे. यावर मात करण्यासाठी शासन विविध मार्गांनी प्रयत्न करीत आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला अभ्यासक्रम हा त्याचाच एक भाग असून विद्यार्थ्यांना बालपणापासूनच वातावरण बदलांविषयी तसेच त्यासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी माहिती होणे अत्यावश्यक आहे. वातावरणीय बदलांचे परिणाम ही गंभीर बाब बनली असून त्यापासून स्वत:ला वाचवायचे असेल तर ही समस्या रोखण्यासाठी समाजातील प्रत्येकाने आजपासूनच कृती करणे आणि पर्यावरणपूरक सवयी अंगिकारणेही गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
वंदना कृष्णा म्हणाल्या, वातावरणीय बदल ही गंभीर बाब असून त्याचा शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत, पर्यावरण विभागाने तयार केलेला अभ्यासक्रम त्यादृष्टीने अतिशय उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकात मनीषा म्हैसकर म्हणाल्या, वातावरणीय बदलासंदर्भातील परिणाम सर्वांना जाणवत आहेत. पर्यावरण विभाग त्याच्या परिणामांना रोखण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. ‘माझी वसुंधरा अभियान’, इलेक्ट्रीक वाहन धोरण, ४३ अमृत शहरांचा कार्बन न्युट्रॅलिटीकडे प्रवास आदी उपक्रमांची माहिती देऊन एक वर्षापूर्वी युनिसेफसोबत केलेल्या करारानुसार शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
युनिसेफच्या श्रीमती राजेश्वरी आणि श्री.युसूफ यांनी यावेळी या अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली. युनिसेफने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट अंतर्गत रिजनल सेंटर फॉर अर्बन अँड इन्व्हायर्नमेंटल स्टडीज तसेच सेंटर फॉर इन्व्हायर्नमेंट एज्युकेशन, पुणे व शालेय अभ्यासक्रम तयार करणारे पर्यावरण तज्ज्ञ यांच्या साहाय्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम तयार केला आहे. यामध्ये जैवविविधता संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन आणि वैयक्तिक आणि समुदाय आरोग्य, जलस्रोत व्यवस्थापन, ऊर्जा, वायू प्रदूषण आणि वातावरण बदल या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.