मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात महाविकास आघाडी अस्तित्वात आली. भाजपाला सत्तेबाहेर ठेवत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं होतं. आता तसाच प्रयोग बिहारमध्ये होताना दिसत आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी भाजपावर पक्ष फोडण्याचा आरोप करत नवी समीकरणे जुळवण्यास सुरुवात केली आहे. जर चर्चा आहे तसंच झालं तर बिहारमध्ये महागठबंधन सरकार अस्तित्वात आलेलं दिसेल. काही वेळातच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
भाजपाने जदयूमध्ये शिवसेनेसारखा फुटीचा प्रयत्न केल्याचा आरोप
- भाजपाने महाराष्ट्रातील शिवसेनेतील प्रभावशाली नेते एकनाथ शिंदे यांना बळ देत उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद घालवलं.
- भाजपाने बिहारमध्ये त्याच दरम्यान जदयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांना हाताशी धरत तसंच करण्याचा प्रयत्न खूप आधीपासून केला.
- त्यासाठी आरसीपी सिंह यांना मोदी मंत्रिमंडळात नितिशकुमारांना न विचारताच स्थान देण्यात आलं.
- त्यानंतर ते सातत्यानं जदयू ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप झाला.
- अखेर नितिशकुमारांनी आरसीपींची राज्यसभा मुदत संपल्यावर त्यांना पुन्हा संधीच दिली नाही.
- आरसीपी सिंह यांच्या राजीनाम्यापासून जदयू पक्ष भाजपावर हल्लाबोल करत आहे.
- त्यांच्या माध्यमातून भाजपा जदयू फोडण्याच्या कारवाया करत असल्याचा आरोप झाला.
बिहारमधील महागठबंधन महाविकास आघाडीसारखंच कसं?
- बिहारमध्ये नवं महागठबंधन सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत.
- जदयूचे नेते, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे जदयू, राजद आणि काँग्रेसचे समीकरण घडत आहे.
- नितिश कुमार मुख्यमंत्री आणि राजदचे तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री आहेत.
बिहार विधानसभेतील संख्याबळ किती आहे?
- बिहार विधानसभेच्या एकूण जागांची संख्या २४३ आहे.
- येथे बहुमत सिद्ध करण्यासाठी पक्ष किंवा आघाडी, युतीला १२२ जागांची आवश्यकता असते.
- सध्या राजद हा बिहारमधील सर्वात मोठा पक्ष आहे. विधानसभेत त्यांचे ७९ सदस्य आहेत.
- त्याचवेळी भाजपकडे ७७, जदयूकडे ४५, काँग्रेसकडे १९, कम्युनिस्ट पक्षाकडे १२, एआयएमआयएमकडे १, हिंदुस्थानी अवाम मोर्चाकडे ४ आमदार आहेत.
- याशिवाय अन्य आमदार आहेत.
सत्तेचं नवीन समीकरण कसं?
सध्या जदयूचे ४५ आमदार आहेत. भाजपाशिवाय जाण्यासाठी नितिश कुमारांना सरकारसाठी आमदारांची गरज आहे. आता राजद आणि जदयू यांच्यातील जवळीकही वाढली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही एकत्र आल्यास राजदचे ७९आमदार मिळून या आघाडीकडे १२४ सदस्य असतील, जे बहुमतापेक्षा जास्त आहे. याशिवाय काँग्रेसही या आघाडीत सामील होईल. असे झाल्यास, युतीकडे १४३ आमदार असतील. तसेच जितन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे ४ आमदार पाठिंबा देणार असल्याने १४७ आमदारांचं बळ महागठबंधनकडे असेल.