मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कोल्हापूरचे संजय पवार या सामान्य कार्यकर्त्याचा पराभव झाला आहे. संजय पवार हे शिवसेनेतर्फे सहाव्या जागेसाठी लढत होते. त्यांच्याविरोधात कोल्हापूरचे प्रस्थापित नेते धनंजय महाडिक हे भाजपातर्फे मैदानात होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वेगानं हालचाली करत ठरवलेल्या रणनीतीमुळे महाडिकांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली आहे. स्वत: शरद पवारांनीही आजच सकाळी देवेंद्र फडणवीसांच्या माणसे जोडण्याच्या कौशल्याचे चमत्कार घडवल्याचे सांगत कौतुक केले आहे. या निकालामुळे भाजपाकडे क्रमांक एकची आमदारसंख्या असतानाही आघाडीची सत्तास्थापन करणाऱ्या आघाडीचे सर्व चाणक्य एका सामान्य कार्यकर्त्यासाठी बळ लावण्यात नापास झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यसभा निकालानंतर कोण काय बोलले?
राज्यसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी पहाटे जाहीर झाला. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया सुरु झाल्या. त्यातही आकड्यांची गणितं विरोधात असूनही भाजपाच्या तिसऱ्या उमेदवाराच्या विजयाचे गणित जुळवणारे विरोधी पङक्षनेते देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आली. त्यांनी स्वाभाविकच शिवसेनेला डिवचले. त्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया आली. त्यांनी अपेक्षेप्रमाणे नाराजी व्यक्त करत भाजपाच्या फोडाफोडीवर खापर फोडले. त्यानंतर सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची प्रतिक्रिया आली. त्यांनी हा निकाल धक्कादायक वाटत नसल्याचे सांगितले. तसेच देवेंद्र फडणवीसांनी चमत्कार घडवल्याचं म्हटलं.
फडणवीस म्हणाले महाडिकांना राऊतांपेक्षा जास्त मतं!
- देवेंद्र फडणवीस राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिलेली प्रतिक्रिया ही शिवसेनेला सणसणीत चपराक देणारी मानली जाते.
- ते म्हणाले, धनंजय महाडिकांनी शिवसेनेच्या पहिल्या उमदेवारापेक्षा म्हणजे संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मतं घेतली आहेत.
- महाराष्ट्रातील जनतेने २०१९ साली भाजपच्या बाजूने जनमत दिले होते.
- आमच्या पाठीत सुरा खुपसून महाविकास आघाडीने ते काढून घेतले.
- अशाप्रकारे स्थापन झालेले सरकार किती अंतर्विरोधाने भरलेले असू शकते, हे आजच्या विजयाने स्पष्ट झाले आहे.
- जे स्वत:लाच महाराष्ट्र समजतात, जे स्वत:लाच मुंबई समजतात, जे स्वत:लाच मराठी समजतात, त्या सगळ्यांना या विजयाने लक्षात आणू दिले आहे की, ते म्हणजे महाराष्ट्र नाहीत, ते म्हणजे मुंबई नाहीत. महाराष्ट्र म्हणजे राज्यातील १२ कोटी जनता आहे.
- भाजपला मिळालेला आजचा विजय हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे.
- भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले. मी हा विजय आमचे लढवय्ये नेते मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित करतो.
- आमचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवली होती.
- हा विजय म्हणजे त्यांच्या वाढदिवसाचे गिफ्ट आहे. आम्ही त्यांना भेट म्हणून कोल्हापूरचा पैलवान दिला आहे
निवडणूक आयोगावर दबाव टाकून मिळवला तो कसला विजय? : संजय राऊत
- आमच्या सोबत असलेले अपक्ष आमदार फुटले, ते कोण फुटले हे आम्हाला माहिती आहे. पण त्यांना आमिषं दाखवण्यात आली. काहींना केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवण्यात आला.
- आमच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार म्हणजेच पक्षाचे आमदार फुटले नाहीत तर काही अपक्ष आमदार, काही छोट्या पक्षाचे आमदार फुटले आहेत.
- त्यांना काही आमिषं दाखवण्यात आली.
- काहींवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणण्यात आला.
- काही ठिकाणी इतर काही व्यवहार आहे. ठीक आहे आज ते जिंकले असतील… पण आम्ही उद्या पाहू… निवडणुकीत असं होत असतं.
भारतीय जनता पक्षाने नक्कीच जागा जिंकली, पण मी त्यांचा विजय मानायला तयार नाही. - पहिल्या पसंतीची सर्वाधिक ३३ मतं संजय पवारांना आहेत तर भाजपचे विजयी उमेदवार धनंजय महाडिक यांना पहिल्या क्रमाकांची २७ मतं आहेत.
- दुसऱ्या पसंतीच्या आकडेमोडीवर धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे, हे मान्य आहे.
- पण भाजपाचा दणदणीत विजय झाला, हे चित्र साफ झूट आहे. माझं एक मत बाद करायला लावलं, निवडणूक आयोगावर दबाव टाकून कसला आलाय विजय?
निकाल धक्कादायक नाही, देवेंद्र फडणवीसांनी चमत्कार – शरद पवार
- राज्यसभा निकालाने मला कोणताही धक्का बसलेला नाही.
- अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात भाजपला यश आले आहे.
- महाविकास आघाडीच्या एकूण संख्येप्रमाणे मतदान झालं आहे.
- अपक्षांना आपल्या बाजूने वळविण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला आहे.
- अपक्ष आमदार आपलीशी करण्यात विरोधी फडणवीस यांना यश आलं.
- महाविकास आघाडीच्या एकूण संख्येप्रमाणे मतदान झालं.
- तिन्ही पक्षातील एक मतंही फुटलं नाही.
- जी मतं फुटली आहेत ती अपक्षांची आहेत.
- राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांचा उमेदवारांचा जो कोटा दिला, त्यामध्ये काहीही फरक पडलेला नाहीये.
- एक मत प्रफुल्ल पटेल यांना जादा पडलं आहे आणि ते मत कुठून आलंय हे मला ठाऊक आहे.
- ते या आघाडीचं नाही ते दुसऱ्या बाजूचं आहे.
- आता सहावी जागा जी शिवसेनेने लढवली तिथे आम्हाला मते कमी पडत होती.
- मतांची संख्या कमी होती. पण, धाडस केलं आणि प्रयत्न केला, त्या प्रयत्नात अपक्षांची संख्या ही भाजपकडे अधिक होती आणि आमच्याकडे कमी होती.
- तरीही दोघांना पुरेशी नव्हती आणि त्यामुळे भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणारे जे अपक्ष होते त्यांना आपल्या बाजूला घेण्यासाठी जी काही यशस्वी कारवाई केली त्यात फडणवीसांना यश आलं.
- चमत्कार झाला हे मान्य केलं पाहिजे. त्यामुळे हा फरक पडला.
- नाहीतर ही जी आघाडी आहे त्या आघाडीच्या एकंदर संख्येप्रमाणे त्यांना मतदान झालेलं आहे. त्यात वेगळं काही नाही.
हे ही वाचा:
क्रम बदला! शिवसेना नेते संजय राऊत सहावे उमेदवार, तर सामान्य शिवसैनिक संजय पवार हमखास खासदार!!