मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या पुढाकाराने प्रथमच महाराष्ट्राच्या महान परंपरेचा ‘महा-उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. एन.डी.स्टुडिओच्या ४७ एकरच्या विशाल जागेत २८ एप्रिल ते १ मे दरम्यान हा उत्सव होत आहे. स्त्री शक्तीचा जागर करणाऱ्या भव्य बाईक रॅलीने महोत्सवाची सुरुवात झाली. १ मे ‘महाराष्ट्र दिना’निमित्त महाराष्ट्रातील ५ हजार शालेय विद्यार्थी ५ हजार रुबिक्स क्युब्सचा वापर करत छत्रपती शिवाजी महाराज यांची जगातील सर्वात मोठी प्रतिमा बनवण्याचा विश्वविक्रम करणार आहेत.
”कोरोना महामारीनंतर हजारो कलाकारांना प्रोत्साहन देत त्यांना कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावं, रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने महा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा उत्सव म्हणजे सर्व कलाकारांना एक सलामी आहे. कलाकारांचं नवचैतन्य, उत्साह पाहून समाधान वाटतं. आपल्या महाराष्ट्राची कला, संस्कृती, अभिमानास्पद परंपरा जगभर पोहचावी हीच यंदाच्या महाराष्ट्र दिनानिमित्त सदिच्छा.” अशा भावना ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी व्यक्त केल्या. त्यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या ‘महा उत्सव’च्या प्रारंभावेळी ते बोलत होते.
श्रेयसी वझे आणि मंदार आपटे यांच्या संकल्पनांतर्गत बनलेले ‘महाराष्ट्र गीत’ यावेळी सादर केले जाईल.”महाराष्ट्राचं वैभव एकाच ठिकाणी मांडणारा हा महा उत्सव वाखणण्याजोगा आहे. महाराष्ट्राची ही वैविध्यता जगभर विस्तारुंदे हीच ईच्छा.” अशा भावना खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्या. ”२००८पासून मी एन.डी.स्टुडिओचा प्रवास पाहिला आहे. अनेक आव्हानांना झेलून मोठा प्रवास करत आज या यशाच्या शिखरावर हा स्टुडिओ पोहचला आहे. हजारो कलाकारांना व्यासपीठ, रोजगार देत त्यांचे कार्य रसिकांसमोर आणण्याचे कार्य या स्टुडिओने केले आहे. या महा उत्सवाच्या निमित्ताने कलाकारांचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचत असल्याचा आनंद आहे.” असे रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या.
यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ निर्माते, लेखक, दिग्दर्शक एन.चंद्रा, रायगडचे एसपी अशोक दुधे, आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते. ”कोरोना महामारीनंतर अशा प्रकारचा भव्यदिव्य सोहळा प्रत्यक्ष पाहणे मी माझे भाग्य समजतो. आयुष्य खरंच किती सुंदर आहे हे या कार्यक्रमाने दाखवून दिले.” अशा भावना एन.चंद्रा यांनी व्यक्त केल्या.या महोत्सवाला देशातील वेगवान कृषी आणि मत्स्यपालन कंपनी, शेती तंत्रज्ञानातील अग्रणी ‘ए एस अॅग्री’ आणि ‘अॅक्वा एलएलपी’ यांचे सहकार्य लाभले आहे. या कंपनीद्वारे अत्याधुनिक व्हर्टिकल फार्मिंग प्रकल्प सादर केला जाणार असून महाराष्ट्रातील लाखो शेतकर्यांना याचा लाभ होईल. या महाउत्सवातल्या महामंचावर चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम आणि रमेश देव यांना समर्पित विशेष कार्यक्रम तसेच महाराष्ट्राचे महाराजे; छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारित महानाट्याचा समावेश आहे. . ‘एन.डी.फिल्म वर्ल्ड’तर्फे आयोजित या महोत्सवात अनेक सेवाभावी संस्थाचाही सहभाग आहे.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन घडवणारे, मराठ्यांची गौरव गाथा, मायमराठी लोककला उत्सव, महालावणी उत्सव, बॉलीवूड घराणा, फ्युजन वाद्य संगीत अशा भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असून शाहीर विनता जोशी वीर तान्हाजींचा इतिहास सादर करतील. ‘महामेळा’ अंतर्गत राज्याच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचे प्रदर्शन, विक्री होणार असून राज्यभरातून शेकडो छोटे व्यावसायिक आणि दुकानदार यांनी यासाठी नोंदणी केली आहे. ‘महाकला’ उपक्रमाद्वारे राज्यातल्या विविध लोककलांचे मनोहारी दर्शन घडणार असून गोंधळ, जागरण, भारुड, आदिवासी कला, धनगरी नृत्य, मर्दानी कला यांचं दर्शन घडवण्यासाठी १०० हून अधिक पारंपरिक कलावंत या महोत्सवात सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार, छायाचित्रकार यांच्या कलाकृतींची दालन तसेच ललित कलेची प्रत्याक्षिके आणि कार्यशाळा देखील महा उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. बाबुराव पेंटर, प्रभाकर कोलते, वासुदेव कामत, दीनानाथ दलाल आणि इतर भारतीय कला दिग्गजांनी रेखाटलेली चित्र, शिल्प पाहता येतील. कागदावर नक्षीकाम, धातूची तार कला, मातीची भांडी आणि बरेच काही या क्षेत्रातील प्रख्यात कलाकारांसह अनेक कला कार्यशाळा देखील आयोजित केल्या आहेत. वारली, पट्टाचित्र, तारकाशी, गोंड पेंटिंग, लघुचित्र, आदिवासी दागिन्यांची कामेही पारंपरीक कारीगर यांच्या प्रदर्शनात असतील. ‘महाखेळ’ अंतर्गत महाराष्ट्राची कुस्ती आणि कब्बडीचे स्पर्धात्मक सामने होणार असून त्यातही १०० हून अधिक क्रीडापटू आपलं कौशल्य पणाला लावणार आहेत. ‘महासंस्कृती’द्वारे महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारे पारंपारिक व्यवसाय, बारा बलुतेदार, कारागिरी यांचे दर्शन घडणार आहे. ‘महास्वाद’ अंतर्गत राज्यभरातल्या वैविध्यपूर्ण रुचकर पदार्थांवर खवय्यांना ताव मारता येईल. ‘महाव्यवसाय’ अंतर्गत राज्यातले विविध व्यावसायिक एकत्र येणार असून उद्योगांपुढचे प्रश्न, आगामी काळातल्या जागतिक संधी, प्रतिमा संवर्धन, ब्रॅण्डिंग अशा विविध विषयांवर विचारमंथन आणि तरुण पिढीला मार्गदर्शक ठरतील अशी चर्चासत्रे, परिसंवाद होणार आहेत. ‘महागौरव’ उपक्रमांतर्गत राज्यातल्या विविध क्षेत्रातल्या गुणवंतांचा गौरव होणार आहे. एन. डी. स्टुडिओतल्या रायगड दरबार, शिवनेरी, रॉयल पॅलेस, लाल किल्ला, तसंच मुंबईची खाऊ गल्ली, चोर बाजार, मार्केट, अशा उभारलेल्या आकर्षक सेटसवर तसंच विविध पुरस्कार सोहळ्याचं आयोजन होणाऱ्या मेगा फ्लोअर, टॅलेंट हंट फ्लोअर आणि भव्य खुल्या रंगमंचावर होणारे सांस्कृतिक कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहेत.