मुक्तपीठ टीम
बॉलिवूड स्टार्सची मुले अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान आणि अनन्या पांडे यांची नावे वादाच्या भोवऱ्यात सापडली. त्याचवेळी अभिनेत्री माधुरी दीक्षितचा धाकटा मुलगा रेयान नेनेही सध्या एका वेगळ्या सकारात्मक चर्चेत आहे. सोशल मीडियावरून माधुरीच्या मुलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कौतुक करण्यासारखंच काम रेयानने केले आहे. त्याने लहान वयात कौतुकास्पद दान दिले आहे.
माधुरीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. रेयानचा अभिमान आहे, असे त्यात तिनं लिहिलंय.
अनेकांना माहित नसावं की, कर्करोगावरील उपचारातील केमोथेरपीत केस जात असल्याने ते रुग्ण अनेकदा निराश होतात. त्यांना मानसिक आधार देण्यासाठी केसांच्या विगचा उपाय आहे. ते बनवण्यासाठी किमान १२ ते १४ इंच लांबीचे केस लागतात. त्यामुळेच रेयानने दोन वर्षे केस कापले नाहीत. ते जपले आणि आता दान देण्यासाठी कापले, त्यामुळे माधुरी त्याला इतर हिरो टोपी घालत नसले तरी माझा हिरो टोपी घालतो, असे म्हणते, तेव्हा ते पटतं. माणुसकीचा हिराच आहे हा अवघा १६ वर्षांचा कोवळा हिरो!
रेयान नेने याने कर्करोग रूग्णांसाठी केस दान केले
- रेयान नेनेने आपले केस कर्करोग रुग्णांसाठी दान केले आहेत.
- माधुरी दीक्षित नेनेने एक व्हिडीओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
- स्वाभाविकच माधुरीने आपल्या मुलाला हिरो म्हटले आहे.
- व्हिडीओमध्ये रेयान हेअर सलूनमध्ये बसलेला दिसत आहे. आणि दोघे जण त्याची लांब वेणी कापत आहेत.
- रेयान रिलॅक्स मूडमध्ये बसून केस कापत आहे.
माधुरी दीक्षितला आपल्या मुलाचा अभिमान आहे
व्हिडीओ पोस्ट करताना, ‘सर्व नायक टोपी घालत नाहीत, परंतु माझा हिरो टोपी घालतो’ असे कॅप्शन लिहिले आहे. राष्ट्रीय कर्करोग दिनानिमित्त मला एक खास गोष्ट सांगायची आहे.
कर्करोगसाठी केमोच्या माध्यमातून इतक्या लोकांना जाताना पाहून रेयनला खूप वाईट वाटले. त्यांचे केस गळतात. माझ्या मुलाने कर्करोग सोसायटीला केस दान करण्याचे पाऊल उचलले आहे. त्याच्या या वाटचालीचा आम्हाला पालक म्हणून अभिमान आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार केसांची आवश्यक लांबी वाढण्यास दोन वर्षे लागली. हा त्याचा अंतिम टप्पा होता.
केसदान कशासाठी?
- कर्करोगावरील केमोथेरपी उपचारांदरम्यान शरीरावरील केस गळून पडत असतात.
- त्यामुळे कर्करोगग्रस्त रुग्णांपैकी अनेक रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य हरवते.
- आधीच कर्करोगासारखा रोगाशी सामना करता कमकुवत झालेले शरीर त्यात मनही खंतावलं की परिस्थिती अधिक बिघडू शकते.
- त्यामुळे त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी केस गमावलेल्या कर्करोगग्रस्तांना कृत्रिम ‘विग’चा आधार दिला जातो.
- गेली काही वर्षे असे विग तयार करण्यासाठी केसदानाचा उपक्रम रुजू लागला आहे.
कोण करु शकते केसदान?
- जगभरात हजारो महिला आणि पुरुष कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी आपले केस दान देण्यास पुढे येत आहेत.
- अनेक स्वयंसेवी संस्था त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत.
- कर्करोगग्रस्तांना मानसिक उभारी मिळवून देण्यासाठी केसांचे विग उपयोगी ठरतात.
- नैसर्गिक केस असलेले कुणीही केसदान करु शकते.
- केस हे किमान १२ ते १४ इंच लांब असावेत.
- ते दान करण्यापूर्वी शाम्पू आणि कंडिशनरने धुतलेले असावेत.
- मात्र, रासायनिक थेरपी केलेले केस मात्र शक्यतो चालत नाहीत.
- कृत्रिम सौंदर्यप्रसाधन न वापरलेले केस कर्करोगग्रस्तांच्या विग निर्मितीसाठी वापरले जातात.
- केसांचा पोनी बांधून किंवा वेणी घालून सलग बारा इंच कापलेले केस द्यावेत.
- नैसर्गिकरीत्या पिकलेले किंवा पांढरे होऊ लागलेले केसही स्वीकारले जातात.