मुक्तपीठ टीम
परिस्थिती कितीही हलाखीची असो, प्रतिभेला प्रामाणिक परिश्रमांची साथ असेल तर यश मिळवणं अशक्य नसतं. हे दाखवून दिलं आहे गडचिरोलीतील सात मुलींनी. गडचिरोलीतल्या दुर्गम जंगल भागात जन्मलेल्या या मुलींमधील हिऱ्यासारखी प्रतिभा ओळखली ती लोकबिरादरीनं. आमटेंच्या लोकबिरादरीनं या क्रीडापटू हिऱ्यांना पैलू पाडले. त्यांची नैसर्गिक चमक अधिकच झळाळली. तोपर्यंत जगाशी फारशी ओळख नसलेल्या आणि आपलं गाव, आपलं जंगल हेच सारं मानणाऱ्या या सात जणींना संधी मिळाली आणि त्यांनी क्रीडाविश्वात स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं. त्यांच्यातील कल्पना मडकामी ही नुकतीच अनिकेत आमटेंना भेटायला आली. त्यांनी कौतुकानं तिची तिनं मिळवलेल्या पदकांसह छायाचित्रं पोस्ट केली. त्यांच्या या पोस्टमुळे या प्रतिभावान मुलींच्या क्रीडा प्रतिभेचा वेध घेण्याचा हा प्रयत्न.
कल्पना मडकामी ही नुकतीच अनिकेत आमटेंना भेटल्यानंतर त्यांनी कौतुकानं तिची तिनं मिळवलेल्या पदकांसह छायाचित्रं पोस्ट केली. “लॉक डाऊनमध्ये दोन मेडल मिळविलेत या मुलीने. एक सिल्व्हर आणि एक गोल्ड. लाँग जंपमध्ये. लोक बिरादरी आश्रमशाळेची ती माजी विद्यार्थिनी आहे कल्पना मडकामी. भामरागड तालुक्यातील दुर्गम गोंगवाडा गावाची. सध्या गावाला आली आहे. बिडी पत्ता तोडून पैसे कमविण्यासाठी. औरंगाबाद येथे साईमध्ये ट्रेनिंग सुरू आहे तिचे. 5.27 मिटर लांब उडी मारली तिने. आज भेटायला आली होती. अभिमानास्पद आहे. हार्दिक अभिनंदन.”
आपलं जीवन आदिवासींना माणसासारखं सन्मानानं जगता यावं म्हणून सेवाकार्याला वाहिलेल्या आमटे परिवारातील अनिकेत आमटे यांची ही पोस्ट म्हणजे कल्पना मडकामीसाठी सुपर मेडलच! कल्पना आणि तिच्यासोबतच्या सहाजणी आणखी पुढे जातील. झेपावतच राहतील. जंगलात खळखळणाऱ्या झऱ्यासारख्या…वाहत्या वाऱ्यासारख्या…अमर्याद शक्यतांच्या आकाशात झेपावतील. नित्य नव्या विक्रमांसह.
लोकबिरादरीच्या सप्त कन्या
• कल्पना आणि तिच्या सोबतच्या सहाजणी म्हणजे क्रीडाविश्वातील काजल सोमा मज्जी, कल्पना शंकर मडकामी आणि सगुणा शंकर मडकामी या बहिणी, तसेच प्रियंका लालूस ओकास, रोशनी साधू मज्जी, मीना उसेंडी आणि अनिता गावडे या सप्ततारकाच.
• डॉ.प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पातर्फे चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळेत या सात मुलींचे शिक्षण झाले.
• त्यापैकी पाच जणींची निवड औरंगाबादच्या भारतीय खेळ प्राधिकरण म्हणजेच साईमध्ये क्रीडा कौशल्यात पारंगत होण्यासाठी झाली.
• एक विद्यार्थीनी हेमलकासा आणि दुसरी नागपूरमध्ये शिकत आहे.
• त्या मुलींमधील असणारी जिद्द, चिकाटी व काटेकोरपणा तसेच खेळाडूसारखी शरीरयष्टी लोकबिरादरी आश्रमशाळेचे क्रीडा शिक्षक विवेक दुबे यांनी ओळखली. लोकबिरादरीच्या कार्यात कौटुंबिक वसा म्हणून समरस झालेल्या समीक्षा आमटे-गोडसे यांनी या मुलींना प्रोत्साहन दिले. त्यातूनच त्यांना पैलू पडत गेले.
साईमध्ये प्रशिक्षण…कौशल्याचं चीज!
लोकबिरादरी प्रकल्पातील सारिका गायकवाड यांच्या मदतीने दुबे सर प्रकल्पातील काही निवडक खेळाडूंना औरंगाबाद येथे असलेल्या भारतीय खेळ प्राधिकरण म्हणजेच साईमध्ये गेले. तिथे त्यांची निवड चाचणी झाली. त्यात लोक बिरादरी आश्रमशाळेचे विद्यार्थी विविध खेळासाठी पात्र ठरले. त्यांनी पुढे लोकबिरादरीचं नावही उंचावलं. पदकं मिळवतं कौशल्य सिद्ध केलं. भविष्यातही लोकबिरादरीच्या माध्यमातून जंगलाची ही लेकरं क्रीडाविश्वाच्या अथांग अवकाशात मर्याद झेपावत राहतील…मुक्तपीठ टीमच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा!
पाहा व्हिडीओ: