मुक्तपीठ टीम
मराठी वाचकांमध्ये वाचनगोडी वाढवण्यासाठी कार्यरत लेट्स रीड इंडिया फाउंडेशनने कोरोना संकटात एक पुढचं पाऊल उचललं आहे. नवी मुंबईतील सिडकोच्या कोरोना उपचार केंद्रात या फाउंडेशनने आपलं वाचनालय उभारलं आहे. त्यामुळे कोरोना उपचार सुरु असलेल्या रुग्णांना विरंगुळा लाभल्याने रोगाविषयीच्या ताण-तणावातून त्यांचं मन मुक्त होऊ शकतं. एक प्रकारे लेट्स रीड इंडियाचा हा उपक्रम कोरोना रुग्णांसाठी एक प्रकारचा वाचनोपचारच ठरणार आहे.
लेट्स रीड इंडिया फाउंडेशन हे गेली काही वर्षे महाराष्ट्रात त्यांच्या वाचनप्रेम जोपासणाऱ्या उपक्रमांमुळे चर्चेत आहे. वाचकांची आवडती पुस्तके थेट मोबाइल वाचनालयातून थेट वाचकांपर्यंत पोहचवली जात असतात. आकर्षक फिरती पुस्तकांची गाडी लक्ष वेधून घेते आणि एकदा पुस्तक हाती आलं की वाचनाची गोडी लागतेच लागते.
या कठीण काळात आपण एकमेकांना मदत करूया. मानवधर्माचे पालन करूया….माणूसकी वाढवूया!
तुमचाही या कामी हातभार लावा. या ऊपक्रमासाठी #पुस्तकदान करा.
आमच्या वेबसाईटवर या संबंधी माहिती ऊपलब्ध आहे.#LetsReadIndia #DonateBooks #LetsReadAtCovidCareCentre pic.twitter.com/oMTc5zcdiN
— Let’s Read India (@LetsReadIndia) May 17, 2021
आता लेट्स रीडच्या टीमनं सध्याच्या कोरोना संकट काळातील गरज ओळखून कोरोना उपचार केंद्रातच वाचनालय सुरु करण्याची भन्नाट कल्पना राबवली आहे. त्यामुळे कोरोना उपचारासाठी आलेल्या वाचनप्रेमींची तर सोय होतेच आहे, पण आता उपचारांसाठीच्या सक्तीच्या विश्रांतीमुळे तिथं आलेल्या इतर रुग्णांमध्येही वाचन वेड रुजण्याची शक्यता आहे.
लेट्स रीड इंडिया फाउंडेशनचा वाचन प्रेम जोपासण्याचा उपक्रम
• या फाउंडेशनची स्थापना जानेवारी २०२० मध्ये झाली.
• यानंतर समाज माध्यमांवर मोठ्या वेगाने काम सुरू झाले.
• वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी पहिल्या टप्प्याच्या कामास सुरुवात झाली.
• लोकांनी वाचले तर आपली प्रगती होईल, हा लेट्स रीड इंडिया फाउंडेशनचा विचार आहे.
• आता संपूर्ण देशभर पुस्तकांची ही चळवळ उभी करण्याचा या फाउंडेशनचा मानस आहे.
• पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, गोवा आणि मध्य प्रदेशात ही चळवळ सुरू होणार आहे.
• मात्र कोरोनामुळे सुरुवातीला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात ‘ग्रंथालय आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला.
• आता नवी मुंबईसह लगतच्या परिसरात पुस्तकाची गाडी दारोदारी पोहोचविण्याचे काम सुरू आहे.
• पुढील दोन वर्षांत ही चळवळ पूर्ण राज्यात उभी केली जाणार आहे.
वाचन प्रेम जोपासण्यास आधुनिक तंत्रज्ञानाची जोड
• पुस्तकाच्या गाडीमध्ये जीपीएस लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम, बारकोड सिस्टीम आहे.
• हे सर्व आपण आपल्या मोबाइल किंवा कॉम्प्युटरवरून वापरू शकतो.
• लेखक, पुस्तक प्रकाशन संस्थांनाही पुस्तकांची मदत होईल अशा पद्धतीने पुस्तकांची गाडी कार्यान्वित आहे.
• पुढील महिन्यात पुस्तकाची दुसरी गाडी आणण्याचा विचार आहे.
• सध्या गाडी ५० किलोमीटरच्या परिसरात फिरत आहे.
• आतापर्यंत ५ हजार पुस्तके खरेदी करण्यात आली-
• वाचकांना पुस्तक वाचण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी देण्यात येत आहे.
• पुस्तक निशुल्क वाचण्यास देण्यात येत आहेत, हे विशेष!
• यातील सॉफ्टवेअर हे मोठ्या प्रमाणात स्केलेबल असून लाखो पुस्तकांचे आदानप्रदान करण्यास आणि गाड्या चालविता येण्यास सक्षम आहे.
• भविष्यात यूट्युब चॅनलही सुरू करण्यात येणार असून त्याद्वारे तज्ज्ञांतर्फे वाचनाचे धडे दिले जातील.
गरजूंपर्यत पुस्तक पोहोचवण्याचा प्रयत्न
• वाचकांना कोणती पुस्तके वाचण्यास आवडतील? याची माहिती विविध माध्यमातून गोळा केली जात आहे.
• विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक, आर्थिक, राजकीय , बालसाहित्य , संतवाङ्मय , कविता , आत्मचरित्र , स्त्रीहक्क आणि समानता , विविध अनुवादित तसेच अनेक अशी वेगवेगळी पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
• आतापर्यंत ५ हजार पुस्तके खरेदी करण्यात आली आहेत.
• एका गाडीत २ हजार पुस्तकांची क्षमता आहे.
• अनाथ मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गरीब-होतकरू विद्यार्थी, नोकरी-सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणारी तरुण मुले वाड्यावस्तीवरील मुलांपर्यंत पहिल्यांदा पुस्तके पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
• ज्यांना खरी गरज आहे, जे पुस्तक विकत घेऊ शकत नसतील किंवा जे पुस्तक आणण्यासाठी बाहेर पडू शकत नसतील किंवा ज्या परिसरांत वाचनालय नसेल त्यांच्यापर्यंत पुस्तक वाचण्यासाठी पोहोचते केले जाणार आहे.