ज्ञान म्हणजे जे शाश्वत सत्य आहे. त्याची अनुभुती होणे. ज्ञान हे प्रिय-अप्रिय, सुख-दु:ख यांच्या पलिकडे असते त्याच्या व्याख्या या काही विषयानुसार म्हणजे रूप गंध स्पर्श… अशाप्रकारे करण्याचा प्रयत्न निश्चित होतो. ज्ञान हे शाश्वत सत्याकडे नेणारे असले तरीही हे ज्ञान मनुष्याच्या उद्धाराचा आणि पतनाचाही मार्ग निश्चित करू शकते. कारण ज्ञानाला अहंकाराची साथ मिळाली तर जे ज्ञान समस्त लोकांच्या उद्धारासाठी उपयुक्त असते तेच स्वत:च्या पतनाचा मार्गही उघडत जाते. म्हणूनच ज्ञानी व्यक्तीस सतर्क रहावे लागते. ज्ञानाचा प्रकाश प्रथम प्रत्येकाच्या अंतरंगात प्रकाशित होतो, नंतर त्या अनुभूतितून समस्त मानवतेच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त होत जातो.
लोककल्याणासाठी उपयुक्त असलेले भौतिक आणि बौद्धिक दोन्ही प्रकारचे ज्ञान जाणण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तित निश्चित आहे. दुस-यांच्या सुख दु:खाप्रती संवेदनशील बनवते ते ज्ञान. दुस-यांच्या भानवांचा आदर न करणाऱ्यास ज्ञानाच्या सर्वोच्च शृंखलेत बसवता येत नाही. ज्ञान परमसुखाची अनुभूती आहे. ते अंध:कार दूर सारते, ते अज्ञानास दूर सारते. अंध:कार दूर करण्यास फक्त ज्ञानाचा प्रकाशच उपयुक्त ठरत असतो.
सूर्य आहे हे सत्य. मग तो उगवतीचा की मावळतीचा हा प्रश्न गौण असतो. भयाच्या अंध:कारात जगणे हे मृत्यू समान आहे. मृत्यू म्हणजे मुक्ती नव्हे, तर निर्भय होऊन जगणं म्हणजे मुक्ती. मृत्युने तर केवळ जीवाचा अंत होतो. जीवाचा अंत ही मुक्ती असू शकत नाही, प्रकाश हे जीवन आहे. डोळे उघडले की प्रकाश दिसतो. अज्ञानाचा अंधार ज्ञानाच्या प्रकाशाने दूर होतो. आवश्यकता आहे ती डोळे उघडून प्रकाशाकडे पाहण्याची. निर्भय होण्याची. ही निर्भयता अध्यात्मिक ज्ञानातून प्राप्त होऊ शकते.
इथं भौतिकतेवरील आसक्ती दूर करावी लागते. भौतिक सुखसंपदा हे समाधान निर्माण करू शकेल, सुख देऊ शकेल यासाठीची साधने प्रस्तुत करेल. सुख देणारी साधनं म्हणजे सुख नाही की समाधान नाहीत. समाधान, परमसुख प्राप्ती ही केवळ ज्ञानाच्या माध्यमानेच प्राप्त होते. शाश्वताच्या अनुभूतीनेच प्राप्त होते. जे नित्य आहे निरंतर आहे त्याचा साक्षात्कार मानवाचा उद्धार करीत असते. असंख्य स्त्रोत माहिती प्रसारीत करू शकतात, त्यात भ्रम निर्माण करणारे अनेक मार्ग आहेत, यातून जो योग्य मार्ग आहे त्याची निवड करून शाश्वताची अभिलाषा असेल तर निश्चित प्रयत्न होतो.
सत्याचा बोध होणे हेच अखिल मानवाच्या कल्याणाची आधारशीला आहे. आपण बाह्य जगताकडे अधिकाधिक आकर्षित होत जातो त्यामुळे आपल्या स्वत: पासूनही किती दूर जात आहोत ; याची जाणीव अनेकदा नसते त्यातून परमसुखाला आपण पारखे होतो. मात्र, आत्मज्ञानाची यात्रा सुरू होते तेव्हा आपण त्याच परमशक्तीला शरण जातो. एका सुखद अनुभूतीकडे आकर्षित होत जातो. शुद्द चित्तासह प्रामाणिकपणे ज्ञानाच्या अनुभूतीच्या समिप गेलो की करूणेचा उगम होतो. स्थिरता आणि करूणा यांच्या सहाय्याने परमसुख आणि समाधान म्हणजेच सकारात्मकतेने हे विश्व भरून जाते. जिथे सकारात्मकता असते तिथेच शुभ आणि लाभ यांची स्थापना होतो.