मुक्तपीठ टीम
किर्लोस्कर म्हटलं की मराठी माणसाला आपुलकी वाटतेच वाटते. महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या औद्योगिक प्रगतीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या या उद्योगी घराण्याविषयी अभिमानाचीच भावना मराठी मनात नांदते. गेल्या काही दिवसांपासून चॅनल्सवर दिसणाऱ्या किर्लोस्करांच्या जाहिरातींमुळे नव्या पिढीलाही किर्लोस्कर समजू लागलेत. मात्र, १३० वर्षांचा वारसा मिरवणाऱ्या या जाहिरातीच किर्लोस्करांमधील नव्या वादाचं कारण ठरल्या आहेत.
किर्लोस्कर घराण्यातील एक नवा वाद माध्यमांमधून समोर आला आहे. १३० वर्ष जुन्या वारशाचं हे प्रकरण आहे. संजय किर्लोस्कर यांच्या नेतृत्वाखालील किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडने (केबीएल) मंगळवारी त्यांचे भाऊ अतुल आणि राहुल किर्लोस्कर यांच्या अखत्यारीत असलेल्या चार कंपन्यांवर हल्लाबोल केला. किर्लोस्कर ब्रँडचा १३० वर्षांचा वारसा हिसकावून घेण्याचा आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
मात्र, अतुल आणि राहुल किर्लोस्कर बंधूंनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. कौटुंबिक वादातून किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडनं बाजार नियामक सेबीला पत्र लिहिले आहे, असं म्हटलं. किर्लोस्कर ऑईल इंजिन (कोईल), किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड (केआयएल), किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड (केपीसीएल) आणि किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लि. (केएफआयएल) या कंपन्यांनी किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचा वारसा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्याचं या पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात केआयएलच्या प्रवक्त्याने सांगितले की केबीएलने सेबीला लिहिलेल्या पत्रात अनेक तथ्यात्मक चुका आहेत.
वाद वारशाचा
• या १६ जुलै रोजी अतुल आणि राहुल किर्लोस्कर यांच्या नेतृत्वाखालील पाच किर्लोस्कर कंपन्यांनी आपल्या व्यवसायाला नवी झळाळी देण्याची प्रक्रिया सुरू केली.
• या कंपन्यांसाठी नवीन किर्लोस्कर लोगोही निवडण्यात आला.
• रंग आणि ब्रँडमधील नाविन्य लक्षवेधी ठरु लागले.
• घोषणेच्या वेळी असे म्हटले गेले होते की हा रंग १३० वर्ष जुन्या नावाच्या वारसा दर्शवतो.
• केबीएलने आक्षेप घेत सेबीला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, केओईएलची स्थापना २००९ मध्ये, केआयएलची १९७८ मध्ये, केपीसीएल १९७४. आणि केएफआयएलची १९९१ मध्ये झाली. त्याप्रमाणे, या कंपन्याना १३० वर्षांचा वारसा नाही.
न्यायालयाचा मध्यस्तीचा सल्ला
• किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे सीएमडी, संजय किर्लोस्कर यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी करीत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, या कौटुंबिक वादाचा योग्य उपाय म्हणजे मध्यस्थी.
• मुंबई उच्च न्यायालयाच्या लवादाच्या माध्यमातून मालमत्तेचा वाद मिटविण्याचे निर्देशांना किर्लोस्कर कुटुंबियांनी आव्हान दिले आहे.
• सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, किर्लोस्कर एक प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंब आहेत. जर त्यांची इच्छा असेल तर, न्यायालय मध्यस्थीसाठी न्यायाधीश नियुक्त करू शकेल किंवा कौटुंबिक मित्र आणि नातेवाईकांची मदत घेतली जाऊ शकते.
• परंतु जर हा खटला चालूच राहिला तर तो बरीच वर्षे चालेल, जे प्रतिष्ठित व्यावसायिक कुटूंबासाठी योग्य नाही.