मुक्तपीठ टीम
तुम्ही टीव्हीवर ब्रुक बाँड चहाची ती ‘नातं आपलेपणाचं’ ही जाहिरात मालिका पाहिली असेल, एक वृद्धा आपल्या नातीसह वाहतूक कोंडीत अडकते. मोठा पाऊस असतो. काचेवर टक टक होते. बाहेर किन्नर असते. वृद्धा काय कटकट म्हणून पाहते. बोलतेही. पैसे देऊ पाहते. पण ती किन्नर उलट तिला चहा देते. पैसेही घेत नाही. ती वृद्धा बदल्यात तोंड भरून आशीर्वाद देते. तुम्हाला वाटलं असेल. हे काय जाहिरातीत ठिक आहे. प्रत्यक्षात कधी असं घडतं! पण तसा तुमचा समज असेल तर तो गैर समज आहे. मग तुम्हाला मुंबईतील किन्नर मां या संस्थेच्या सलमा खान यांना भेटावं लागेल. कोरोनाच्या भीषण परिस्थितीत किन्नरही मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. मुंबईतील ‘किन्नर माँ’ या संस्थेचे सदस्य गरजू लोकांना रेशन वाटप करण्यासाठी मुंबईच्या विविध भागात फिरत आहेत.
किन्नर माँ संस्थेचं सेवाकार्य
• कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर आतापर्यंत ८० हजारांहून अधिक लोकांसाठी रेशन दिले आहे.
• दररोज रेशनची एक हजाराहून अधिक पाकिटे वाटण्यात येतात.
• मास्क आणि सॅनिटायझर लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.
• पोलीस स्टेशन आणि बसस्थानक येथे मास्क व सॅनेटायझरचे वितरण करण्यात आले आहे.
• पूर्वी ही मोहीम केवळ तृतीयपंथीयांसाठी सुरू केली गेली होती.
सलमा यांच्या शब्दात सांगायचं तर, “हे सरकारचे काम आहे, परंतु आम्ही किती काळ सरकारवर अवलंबून राहू. आपल्या सर्वांनी आपल्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजेत. म्हणूनच आम्ही गरजूंना अन्न पुरवण्याचे काम करीत आहोत. ठाणे, नालासोपारा, पालघर, पुणे आणि वसई येथेही आम्ही रेशन वाटत आहोत. आम्ही प्रथम फक्त किन्नरसाठी ही मोहीम सुरू केली, परंतु नंतर आम्ही सामान्य लोकांना मदत करण्यासही सुरवात केली. आम्ही झोपडपट्टी भागात राहणाऱ्या लोकांना अन्न पुरवतो.”
‘किन्नर मां’ संस्थेचा मानव धर्म
• आम्ही केवळ मानवी धर्माचे अनुसरण करत आहोत.
• अजूनही तृतियपंथीयांना समाजात त्यांचे योग्य स्थान मिळालेले नाही.
• काही लोक घृणास्पद नजरेने आमच्याकडे पाहतात.
• आम्ही सर्व मूलभूत मानवी हक्कांपासून वंचित आहोत.
• देशात साथीचा रोग आहे आणि आम्ही केवळ मानवतेच्या धर्माचे पालन करीत आहोत.
• आज लोकांना मदतीची आवश्यकता आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी शक्य ते सर्व करीत आहोत.
पाहा व्हिडीओ: