मुक्तपीठ टीम
कोरोना साथीच्या महामारीत वर्षभराचा उशीर झाला असताना लातूर आणि सांगली जिल्ह्यातील दोन गरजूंना त्यांच्या घरच्यांनी मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यास मदत केली. त्यांची “मूत्रपिंड स्वॅप” माध्यमातून मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. मूत्रपिंड स्वॅपिंग म्हणजे रूग्णांशी त्यांच्या नातेवाईकांचा रक्तगट जळत नसल्यास त्यांच्याशी जुळणारे दुसऱ्या रुग्णाचे नातेवाईक शोधून जोड्या जुळवल्या जातात. त्यामुळे दोन्ही रुग्णांना मूत्रपिंड दान लाभते आणि दोन जीव वाचतात.
या दोन्ही प्रकरणात, मूत्रपिंड दान करणाऱ्या या रुग्णांच्या पत्नी होत्या. मुंबईच्या पी.डी. हिंदुजा रुग्णालयात ८ मार्च रोजी त्या दोघांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन्ही रूग्णाांना संसर्ग होऊ नये यासाठी सात दिवसांच्या कालावधीत चार कोरोना चाचण्यांची दक्षता घेण्यात आली.
नेफ्रॉलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. जतिन कोठारी यांनी सांगितले की, सांगलीतील ४३ वर्षीय रूग्ण १२ वर्षापूर्वी मूत्रपिंडाच्याच तीव्र आजाराने त्रस्त झाल्यानंतर तेव्हाही त्यांना मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या आईने त्यांना मूत्रपिंड दान केले होते. मूत्रपिंड प्रत्यारोपण केल्यानंतर १० वर्षे त्यांना कोणताही त्रास झाला नाही. दोन वर्षांपूर्वी मूत्रपिंडाने कार्य करणे बंद केले. आणि त्यांना डायलिसिसचे सहाय्य घ्यावे लागले. तेव्हापासून ते मूत्रपिंड देणगीदार शोधत होते, कारण त्यांच्या पत्नीचाही रक्तगट त्यांच्याशी जुळत नव्हता.
२०१९ मध्ये लातूरच्या रूग्णाच्याही मूत्रपिंडाने काम करणे बंद झाले होते आणि दीड वर्ष ते डायलिसिसच्या सहाय्यावर होते. दारिद्र्य रेषेखाली असल्याने त्यांना रुग्णालयात विनामूल्य उपचार केले गेले. “गेल्या वर्षी, कोरोना महामारीमुळे रूग्णालयात प्रत्यारोपणाच्या रूग्णांना वेगळ्या खोल्या उपलब्ध करुन देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे शस्त्रक्रिया थांबवावी लागली, असे डॉ. कोठारी म्हणाले.
लातूरच्या रूग्णाच्या ५२ वर्ष पत्नीचे रक्तगट सांगलीच्या रुग्णाशी जुळले होते, तर सांगलीच्या रूग्णाच्या ३६ वर्षीय पत्नीचे रक्तगट लातूरच्या रूग्णाशी जुळले असल्याचे आढळले. कोरोना चाचणी घेतल्यानंतर रुग्णालयाने प्रत्यारोपणाची व्यवस्था केली आणि प्रत्यारोपण करण्यात आले.
पाहा व्हिडीओ: