सुमेधा उपाध्ये
आज लग्नाचा वाढदिवस. मला तसं त्याचं जास्तच अप्रूप. कारण याच दिवशी माझी जीवन गाठ जुळली गेली ती केशवसारख्या एका अस्सल माणूसपण जपणाऱ्या माझ्या आवडत्या माणसाशी! २३ वर्षे झाली. पण रोजचा दिवस नवा असतो. केशव नेहमीच तसा सळसळता असतो. त्याला कोणी काही सांगितले, त्यातही ते काम राष्ट्र, समाज आणि पक्ष यांच्या हिताचं असेल तर तो करणार नाही, किंवा नाही म्हणेल असे होतच नाही. केशव हा सतत, अथक, अविरत आपल्या कार्याला वाहून घेतलेला एक वेगळा माणूस आहे. सणवार, लग्नाचा वाढदिवस, आमचे वाढदिवस शक्य झाले तर आम्ही साजरे करतो. पण केले तरी उगाच त्यात भपका नसतो. एक मात्र घडतं, हे दिवस आले की मन आपोआपच मागे काय घडून गेलं त्यांचं सिंहावलकोन करू लागतं. आताही तेच घडलं. लग्नाचा वाढदिवस आला आणि मन मात्र मागे मागे मागे जात राहिलं. आठवलं ते आमचं लग्न. आमची ओळख. आणि केशवच्या बोलण्यातून उमगलेलं केशवचं जीवन…अनेकांना माहित नसलेलं!
नुकतीच दिवाळी गेली. यावेळी खरोखरच तिमिरातून तेजाकडे नेणारी दिवाळी होती. कोरोनाच्या सावटातून बाहेर काढत प्रसन्नता उजळवणारी अशी. पूर्वी दिवाळीच्या तोंडावर बाजारात खरेदीसाठी गेलो की छोटी छोटी फटाक्यांची दुकानं दिसायची आणि ती पाहिली की शाळकरी वयात केशव असेच फटाके विकायचा ती आठवण तो आवर्जून सांगायचा. कदाचित त्या स्टॉल्सच्या पलिकडे त्याला त्याचं बालपण दिसत असावं. शाळकरी वयापासून ते कॉलेज पूर्ण होईपर्यंत त्याने छोटीमोठी अनेक काम केलीत- अगदी पेपर टाकणे असेल, दूधाच्या पिशव्या पोहचवण्यासह, किरकोळ वस्तूंची विक्री करणं, अशा अनेक कामांची लांबलचक यादी होईल!
सोलापूर जिल्हाच तसा दुष्काळी. कायम पाण्याची कमतरता त्यामुळे लांबवरून पाण्याचे घडेही वाहून आणावे लागायचे. अशा सर्व नित्य कामांसह शाळाकॉलेजचे शिक्षण पूर्ण करणं आणि पुढे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन परिषदेचं कार्य करणं हे सर्व सोप नव्हतंच. म्हणतात ना काही माणसांच्या आयुष्यात संघर्ष पाचवीलाच पूजला जातो. ते किती सत्य असू शकतं हे आजही केशवकडे पाहिलं की समजतं. तरीही मनात कटूता नाही. संघर्ष अपना नारा है…असं म्हणून पुढे पाऊल टाकायचं.
सोलापूरातल्या एका गिरणी कामगाराचा मुलगा. कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यात सहभागी झाला. नंतर त्या विद्यार्थी चळवळीतच त्याची भविष्याची बीजं पेरली गेली. वडिलांची इच्छा होती मुलानं शिकावं आणि स्थानिक बँकेत नोकरी पत्करावी. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जे शिक्षणाचे संस्कार होतात आणि ज्या अपेक्षा असतात त्याच घरून होत्या. विद्यार्थी परिषदेचं काम करणं आणि कॉलेजच्या गेटवरच्या आंदोलनामुळे काही वेळा पोलीस ठाण्यात रात्र घालवावी लागली की दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये नाव यायचं. ते वाचताच घरात दिवाळी नसतानाही फटाके फुटायचे. तरीही केशवनं परिषदेचं काम कधी सोडलं नाही. एक सक्रिय कार्यकर्ता ही त्याची ओळख होती. तेव्हा जोडलेले जिवाभावाचे दोस्त आजही तसेच मैत्रीच्या धाग्यानं घट्ट आहेत. आपल्या स्वभावधर्मानुसार माणसं जोडणं आणि जोडलेले संबंध टिकवणं हा गुणच म्हणावा लागेल.
सोलापूरात बी. कॉम पूर्ण केल्यानंतर केशवने थेट पुण्याची गाडी पकडली . तिथंही स्वत:चे असे कोणी नव्हते. रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारितेसाठी प्रवेश घेतला आणि पुढारीत पोटापाण्यासाठी नोकरी स्वीकारली. राहण्याची सोय होण्यासाठी तिथल्याच जुजबी ओळखी कामी आल्या. आपल्यावर कितीही संकट आलं तरी घरी त्याबद्दल कळू न देणं हाही नंतर नंतर तर स्वभावच बनलाय. जी आणि जशी परिस्थिती समोर येईल त्यास स्वत:च तोंड देणं, मार्ग काढणं आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या संयमाची शिदोरी भरपूर आहे.
पुण्यातलं शिक्षण पूर्ण झालं आणि मग मुंबई ही गुणवत्तेला वाव देणारी, कर्माला साकारणारी कर्मभूमी त्याला खुणावू लागली. मुंबईतही जवळचे नातेवाईक किंवा स्नेही असे कुणीच नव्हते. तरूण भारतमध्ये सेवा सुरू झाली आणि प्रकाश मेहतांच्या सरकारी बंगल्यात राहण्याची सोय झाली. १९९५चा तो काळ होता. अवघा तेवीस-चोविसीतला हा मुलगा मायानगरीत स्वत:ला स्थिरावू पहात होता. केशवचा मेहनती पिंड आणि चौकट सोडून विचार करणं, तसंच हाती घेतलेलं काम चिकाटीनं पूर्ण करणं, यामुळे हळू हळू तरूण भारतमध्ये सर्वांनाच त्याने आपलंसं केलं. कित्येक जबाबदाऱ्या त्याच्यावर सहज पडत गेल्या. त्याने त्या पूर्ण केल्या.
याच तरूण भातच्या सांज आवृत्तीत मी काम करीत होते. हा मुलगा संध्याकाळी पाच नंतर ऑफिसला यायाचा हातातल्या बातम्या लिहून द्यायचा आणि नंतर बराच वेळ संपादकांच्या केबिनमध्येच असायचा. हे सुरूवातील नेमकं काय हे कळलं नाही. ठरलेले दोन तीन अगदी साधे शर्ट पॅण्ट आणि रविवारी ठरलेला एकच कुर्ता तोही खिसा फाटलेला. अतिशय साधा राहणारा हा मुलगा बोलायला लागला की मात्र सर्व त्याच्या बोलण्यात गुंग व्हायचे. तो जे बोलतोय तेच खरंय, तेच योग्य आहे असं वाटायचं आणि त्याचं म्हणणं मान्य व्हायचंय. याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे त्याच्या मांडणीच्या मागे त्याचा स्वत:चा अभ्यास असायचा. सर्वबाजूंनी विचार करून तो मांडणी करायचा आणि त्याच सोबत त्याचा प्लान ए प्लान बी तयार तर असायचाच, पण त्याचे विशेष हा की प्लान सी सुद्धा तयार असायचा. त्याच्या आजवरच्या वाटचालीत मग ते घर संसार असो की कार्यालय असो, त्याचं हेच मायक्रो प्लॅनिंग त्याला आधार देतंय.
वाचनाची आवड प्रचंड. बरं असं काही ठरवून ठरावीक साचेबंदच वाचत नाही. जे मिळेल ते वाचायचं विषयाचं बंधन नाही. दररोज सोळा सतरा पेपर, टीव्ही वरील बातम्या आणि आता तर ट्विटरचा जमाना आहे. सोशल मीडिया प्रचंड जाळं पसरत आहे. त्यामुळे बदलत्या माध्यमांचाही उपयोग करून घेणं ही सवय प्रमोद महाजनांच्या काळापासून जास्तच लागली. तरूण भारतमध्ये असतानाच भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या संपर्कात येत राहिला. मात्र, नंतर संसाराला सुरूवात झाली, मुलाचा जन्म झाला, जबाबदारी वाढली आणि संसाराच्या आर्थिक गरजांचा विचार करणं क्रमप्राप्त ठरलं. त्याच दरम्यान लोकसत्तामध्ये काम सुरू झालं पण नोकरीत रमणारा केशव नव्हता. पत्रकारीतेची कास सोडण्याची आता वेळ आली होती.
एके दिवशी मी आणि आमच्या दोघांचा एक मित्र मिलिंद थत्ते आम्ही ठरवून तिघे भेटलो. रात्रभर चर्चा केली. रिलायन्सच्या पीआर विभागात ३५ हजाराची नोकरी करायची की भारतीय जनता पार्टीचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करायचं ? कारण नोकरी करत असतानानाही केशवनं नक्षलवाद्याच्या संदर्भात रिसर्च वर्क केलं होतं. तसंच पारधी समाजावरील रिसर्चही केला होता. त्याठिकाणी जाऊन अगदी सखोल अभ्यास केला आणि नंतर त्याने जे वास्तव मांडलं ते दखलपात्र ठरलं. एकूण त्याचा कल समाजकार्याकडे जास्त आहे, हे अधून मधून प्रकर्षाने जाणवत होतं. पत्रकारितेतही समाजासाठी काम केलं जातं पण त्यात मर्यादा असतात. तसं एखाद्या पक्षाशी जोडल्यानंतर नसतं. तुम्हाला व्यापक काम करता येतं! आणि त्याच दिवशी ब्रह्ममुहूर्तावर निर्णय घेतला भाजपचा पूर्णवेळ कार्यकर्ता होणं योग्य आहे. त्यासाठी मला संसाराची अधिकाधिक जबाबदारी उचलावी लागणार होती. आता मी सुरू असलेली पत्रकारिताच पुढेही कायम करण्याचा निर्णय घेतला आणि केशवनं राजकीय कार्यक्षेत्र निवडलं. दोन हजार साली भाजपच्या मीडियासेलचे काम केशव करू लागला आणि नंतर गोपीनाथ मुंडे यांची संघर्ष यात्रा सुरू झाली. तेव्हा यात्रेच्या प्रसिध्दीचं कामही करू लागला. या यात्रेत तो मुंडेसाहेबांसोबत होता. त्याची कामाची पद्धत ठसवणारीच होती. त्यामुळे मीडिया सेलच्या कामासह मुंडेसाहेबांच्या प्रसिद्धीचे कामही तो पुढे करू लागला.
एखाद्या राजकीय पक्षाचे कार्य तुम्ही सुरू करता तेव्हा तुम्हाला घराला जास्त प्राधान्य देता येत नाही. आलेली परिस्थिती स्वीकारणं आणि त्यातून मार्ग काढणं एवढंच माणसाच्या हाती असतं. जेमतेम एक वर्षाचा मुलगा, त्याची आई नोकरी करते आणि वडिल राजकीय वर्तुळात स्वत:ला शोधत आहेत, घरात काय आणि बाहेर काय आधाराला तसं कुणी नाही. स्वमनात कितीही संघर्ष सुरू असला, तरीही बाहेरच्या जगात तुम्हाला चेहऱ्यावर हसू ठेवावं लागतं. तो एक मुखवटा घ्यावाच लागतो. तुमचा हा संघर्ष असतो, तो तुमचाच असतो. जगाला त्याच्याशी काहीही देणं घेणं नसतं. कारण समाजकार्याची निवड आपण केलेली असते. निर्णय आपले असल्यानं ते निभावणं आपलंच कर्तव्य असतं.
संघर्ष यात्रेनंतर पक्षातील कामात तो रमला. राज्यातल्या नेत्यासह राष्ट्रीय नेत्यांच्याही नित्य संपर्कात आला. या वाटचालीत अनेक अनुभव गाठीशी आले. कित्येकदा आपले कोण परके कोण, हे ही कळलं. दरम्यानच्या काळात राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यांचं अचानक जाणं मनाच्या खच्चीकरणाचं होतं. प्रमोद महाजन गेले आणि नंतर गोपीनाथ मुंडेसाहेबांचं जाणं हे तर डोक्यावरील छत्र जाण्यासारखंच होतं. सकाळी सकाळी पत्रकारांचे फोन येऊ लागले…बातमी हादरवणारी होती. अक्षरश: मनावर दगड ठेवून तो बाहेर पडला खूप धीरानं घेतलं पण नंतर बांध फूटलाच आणि तो मीडियासमोर बोलून गेला – आज माझा राजकीयक्षेत्रातला बाप गेला ! सारेच सून्न झाले. यात चूक काहीच नव्हतं कारण ऐन पंचवीशीत तो मुंडेसाहेबांच्या संपर्कात आला होता. त्या दोघांचं नातं सहज जुळलं होतं. त्यांच्या कसोटीच्या काळातही हा त्यांच्या सोबत होताच. अनेकदा रात्री बारानंतर फोन वाजला की समजावं साहेबच. ते बोलत असायचे तास दीड तास आणि हा फक्त ऐकत रहायचा. प्रत्येक माणसाला मन हलकं करण्यासाठी विश्वासाचं कुणी तरी हवं असतं, मग तो लहान की मोठा हे महत्वाचं नसतं. तेच साहेबांचं आणि त्याचं होतं. पण मुंडेसाहेबांच्या कामासह त्यानं संघटनेचं कामही तितक्याच प्रामाणिकपणे केलं. तो नेहमी म्हणतो आमच्यासाठी आधी संघटना महत्वाची. त्यामुळेच कदाचित त्याचं सगळ्यांशीच छान जमतं. देवेंद्रजी फडणवीसांसह रावसाहेब दानवे, चंद्रकांतदादा पाटील आणि अशा अनेक नेत्यांच्या सोबत काम तितक्याच तन्मयतेनं सुरू राहिलं. सर्वांनीच त्याला स्वीकारलं.
सहकाऱ्यांना सोबत घेऊन आपण काम करतो तेव्हा सर्वांची सोबत मिळते. नित्य कामाच्या चक्रात कधी कधी मनुष्य स्वभावानुसार थोडफार कमीजास्त होतं असलं, कधी कुणी थोडे दुखावले जात असतील तर ते फक्त कामापुरतं असतं. वैयक्तिक कुणाबद्दलही आकस नाही. त्यामुळेच केवळ पक्षातच नाही तर अन्य पक्षातील लोकांशीही त्याचे चांगले संबंध आहेत. टीव्हीवरील चर्चेत कित्येकदा टोकाचे वाद होतात. पण चर्चा संपली की सर्व संपलं. शेवटी प्रत्येकजण आपल्या पक्षाची बाजू मांडण्याचं कर्तव्य बजावत असतो. त्यातही केशव कधीही राजकीय वादाला वैयक्तिक भांडणात बदलू देत नाही. दिलखुलास स्वभाव इथं तारत असतो.
पत्रकारीतेतील सर्वच बाजू माहित असल्यानं अनेकांशी जोडलेली मैत्री कायम आहे. पत्रकारांसाठी बातमी पाठवण्यापासून ते त्यांच्या दौऱ्यांपर्यंत. सर्वच चोख व्यवस्था करायचा त्यामुळे बातम्या वेळेवर देणं सोप व्हायचं. म्हणून पत्रकारही खूष. अशा बाहेरच्या धावपळीतही एक गोष्ट कायम राहिली ती म्हणजे मुलाला क्वालिटी टाईम देणं. ते आजही सुरू आहे. तरूण भारतपासून सुरू झालेला प्रवास आता मुख्य प्रवक्ता पदापर्यंत आलाय. मला वाटतं राजकारणातील केशवची ही खरी सुरूवात आहे. अजून खूप पल्ला गाठायचा आहे. आत्ताशी गाडी सुरू झालीय. भारतीय राजकारणातील वयोमर्यादाही तशी परिपक्व वयातीलच आहे.
मेहनत संयम चिकाटी आणि सर्वात महत्वाचं कायम अपडेट राहणं, त्यासाठी सर्व माध्यमांचा पूर्ण उपयोग करून घेणं, यामुळेच आता त्याची बरीचशी ट्विटस् गाजतात. कोणत्याही घटनेवर त्वरित योग्य विचारमांडणं तेही नेमक्या थोड्या शब्दात. त्यामुळे आजही अनेकदा फटाके वाजतात. टीव्ही चॅनलच्या चर्चाही गाजतात. कारण मुद्दे धरून मांडणी करणं, समोरच्याला माघार घ्यायला लावतं. अलीकडे माहितीचा स्फोट झालाय. कोणतीही माहिती लपून राहू शकत नाही. त्यामुळे वस्तुस्थिती लक्षात घेऊन सत्य माहितीच्या आधारे केलेली चर्चा महत्वाची ठरते. मुद्दे असतील तर तुम्ही आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडू शकता. पण मुद्दे नसतील तर केवळ आरडाओरड होतो.
आता काळानुसार राजकारणातही बदल होत आहे. जबाबदारी वाढलीय. सत्य लपवणं शक्य नाही. जनतेच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. कोणत्याही पक्षाचं सरकार असंल तरीही शंभर टक्के अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही. अशा वेळी एका राष्ट्रीय पक्षाचा प्रवक्ता म्हणून खूप मोठी जबाबदारी असते. आपल्या शब्दांच्या मांडणीवर खूप काही अवलंबून असंत. एकूणच राजकारणाबद्दल समाजात उदासीनता निर्माण झालेली असताना, पक्षाच्या कामाला तळापर्यंत पोहचवण्याची कसरत असते. कधी बाजू मांडायची, तर कधी सावरायची असते, यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. राजकारण हे माणसांना एकत्र बांधून करता येतं, इथं कुणी एक व्यक्ती काहीच करू शकत नाही. रोजच्या रोज लोकांशी संबंध येतो, म्हणजेच लोकांच्या भावनांशी संबंध येतो. त्यामुळे खूप जपून शब्द वापरावे लागतात. या सर्वांचा नित्य सरावच तुम्हाला तातरत असंतो. हेच भान केशव क्षणोक्षणी बाळगून आहे. हेच खरं त्याचं बळही आहे.
व्यापक समाज हिताचा विचार करतानाच आपण वैयक्तिक काय कार्य करू शकतो? या प्रश्नातूनच मित्र फाऊंडेशनची सुरूवात झाली. त्यातुन पहिला उपक्रम पाण्यासंदर्भात केला आणि नंतर सौरऊर्जा सोबत अन्य उपक्रम आदिवासी पाड्यावर सुरू झाले. मुंबईपासून अवघ्या दीडशे किलोमिटरवर असलेल्या एका पाड्यावर एक तरी पणती त्यांच्या दारी लावूया म्हणून दिवाळी पूर्व दिवाळी सुरू केली. आधी पाड्यावर आदिवासींच्या दारात दिवाळी नंतर आपली दिवाळी असा उपक्रम सुरू झाला. कधी मोठ्या प्रमाणात तर कधी अगदी घरगुती. तळागाळातल्या समाजासोबत तुम्ही काही तास असता, तेव्हा त्या कामातून एक वेगळीच ऊर्जा मिळते. कोणासाठी तरी खारीचा वाटा उचलता आला, हेच महत्वाचं असंत. आज सुरूवात केलीय भविष्यात अशी विकास गंगा पाड्यावर सदैव वाहत राहणार एवढं नक्की!
विविध उपक्रम आणि विविध कार्यासोबतच अविरत संघर्षाचा नारा आहेच. पण कधी कधी वाटतं हा संघर्षच केशवला पुढे पुढे जाण्यासाठी संजीवनीचं कार्य करीत आहे.
(सुमेधा उपाध्ये या पत्रकार आहेत. ईटीव्हीपासून अनेक मराठी चॅनल्सचा त्यांना अनुभव आहे. सध्या त्या अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून विविध विषयांवरील संशोधन आणि लेखन सुरु आहे.)
संपर्क ट्विटर @SumedhaUpadhye
अरे वा वहिनी किती सुंदर मांडले आहे केशवला तुम्ही 👌🏻👌🏻