मुक्तपीठ टीम
अवसायनाच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ५२९ कोटींच्या ठेवींच्या विम्यापोटी ३८ लाख ६२ हजार रुपयांच्या हफ्त्याची रक्कम आज गुरुवारी डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन महामंडळाला आरटीजीएस सेवा प्रणालीद्वारे अदा करण्यात आल्याने ठेवीदारांच्या ठेवी पुढच्या मर्यादित काळासाठी सुरक्षित झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक तथा प्रशासक जी. जी. मावळे यांनी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांना दिली.
भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आदेशानुसार केलेल्या लेखा परीक्षक तपासणीत प्रारंभी अध्यक्ष, संचालक मंडळ, कर्मचाऱ्यांनी संगनमत करून ५१२ कोटीची अफरातफर केल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढे आणखी काही बोगस कर्ज खाती समोर आल्याने हा आकडा ५२६ कोटींवर गेला आहे.
दरम्यान रिझर्व्ह बँकेने घातलेल्या निर्बंधांनंतर बँकेचे व्यवहार गोठविण्यात आले आहेत. घोटाळ्याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल करून काही संचालकांची वाहने जप्तीची कारवाई केली आहे. तर सहकार खात्याने येत्या ३ तारखेला ३८ संचालकांची निवाड्यापूर्वी मालमत्ता जप्त करण्यासाठी ठाणे येथे सुनावणी ठेवल्याने संचालक पद भूषविलेले बडे नेते अडचणीत सापडले आहेत.
कर्नाळा नागरी सहकारी बँकेची आर्थिक अवस्था अत्यंत नाजूक झाल्याने ठेवीदारांच्या विम्याची रक्कम अदा करण्यास बँकेवर मुसीबत ओढवली होती. अवघ्या दीड ते दोन लाख रुपयांची पुंजी बँकेकडे शिल्लक असल्याने ठेवींच्या विम्याची इतकी मोठी रक्कम भरणे दिव्य बनले होते.
यासंदर्भात ठेवीदारांचे हित लक्षात घेवून पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू आणि सहकाऱ्यांनी सहकार आयुक्त अनिल कवडे यांची पुणे कार्यालयात भेट घेवून विम्याच्या रकमेची तरतूद करावी, अशी फेब्रुवारीमध्ये लेखी मागणी केली होती. त्यानुसार कवडे यांच्या आदेशानुसार मावळे यांनी कर्ज वसुलीवर भर देवून ४० लाख रुपयांची व्यवस्था केली होती.
यासाठी गेले तीन महिने कडू यांनी मावळे यांच्याशी वारंवार बैठका घेवून, फोनवरून विचारणा करून सततचा पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. कडू यांच्या प्रयत्नांना यश आल्याने ठेवीदारांच्या नावाने राजकीय गळा काढून श्रेय लाटणाऱ्यांना ही सणसणीत चपराक मानली जात आहे.
बँकेच्या ५२९ कोटींच्या ठेवींना विम्याचे संरक्षण देताना मावळे यांनी ऑडिट करून रितसर रक्कम अदा केल्याने ठेवीदारांना मोठा दिलासा देण्यात कांतीलाल कडू यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश आले आहे.
कोरोनामुळे व्यत्यय आल्याने कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यास अडसर ठरत आहेत. असे असली तरी लवकरच त्यांच्या ठेविच्या रकमा परत मिळवून देवू. मात्र, त्याचे श्रेय बँकेचे पैसे वापरून आर्थिक श्रीमंती अंगोपांगी मिरवणाऱ्यांनी घेण्याचा मुळीच प्रयत्न करू नये असा गर्भित इशाराही कांतीलाल कडू यांनी दिला आहे.