मुक्तपीठ टीम
श्रीकाशी विश्वनाथ मंदिर परिसरात कडाक्याच्या थंडीत अनवाणी ड्युटी करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना आता दिलासा मिळाला आहे. मंदिर असल्याने चामड्याचे, रबराचे बूट चालत नसल्याने त्रास सहन करत सुरक्षारक्षक अनवाणी ड्युटी करत असत. मात्र आता तेथे ड्युटी करणाऱ्यांसाठी आता ज्यूटचे बूट पुरवण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार, मंदिरात हा उपक्रम घेण्यात आला. सीआरपीएफ जवान, पोलीस, पुजारी, सेवक आणि सफाई कर्मचारी थंडीत अनवाणी ड्युटी करतात हे पंतप्रधानांना कळले होते. त्यांनी पुढाकार घेतल्याने या सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे.
दिल्लीहून आले तागाचे १०० बूट!
- पंतप्रधान मोदींच्या सूचनेनंतर सर्व कर्मचाऱ्यांसाठी १०० तागाचे बूट दिल्लीहून पाठवण्यात आले आहेत.
- विभागीय आयुक्त दीपक अग्रवाल यांनी मंदिरात काम करणारे शास्त्री, पुजारी, सीआरपीएफ जवान, पोलीस, सेवादार आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना हे बूट वाटप केले.
- तागाचे आणखी बूट येतील आणि ड्युटी करणाऱ्यांना वाटप करण्यात येईल. असे विभागीय आयुक्तांनी सांगितले.
During His visit to Kashi Vishwanath Dham, PM @narendramodi found people working bare-footed.
He immediately got 100 pairs of Jute footwear & sent over to these people to enable them perform their duties in cold.
This is how much “The KarmaYogi” cares for the People He meets 🙏 pic.twitter.com/CK6aE1AKyp
— C T Ravi 🇮🇳 ಸಿ ಟಿ ರವಿ (@CTRavi_BJP) January 10, 2022
मंदिरात सुरक्षा रक्षकांची अणवाणी ड्युटी का?
मंदिर परिसरात चामड्याचे किंवा रबराचे बूट आणि चप्पल घालण्यास मनाई आहे. काशी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहात भाविकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. कोरोना संसर्गाचा वाढता वेग पाहता मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यासोबतच थर्मल स्कॅनिंग आणि हॅंड सॅनिटायझेशननंतरच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात होता.
ताग (ज्यूट) म्हणजे काय?
- ताग म्हणजेच इंग्रजीत ज्यूट म्हणून ओळखली जाणारी ही एक वनस्पती आहे.
- या वनस्पतीच्या ‘फ्लोएम’ पेशीपासून माणसाला उपयुक्त असे तंतू मिळतात.
- त्या तंतूंपासून वनस्पतीजन्य धागेनिर्मिती करता येते, हे एक हरित तंत्रज्ञान आहे.
- बंगालात भाताची लागवड करताना पाण्याच्या साठवणीसाठी बांध घालावे लागतात.
- या बांधांवर ताग लावण्यात येतो. तागाचा दोन प्रकारे उपयोग होतो. फ्लोएमपासून धागा मिळवणे आणि त्याच्या मुळांवरील गाठी नत्रस्थिरीकरण्यास मदत करतात. म्हणूनच कमी पाऊस-पाण्यात उत्कृष्ट धागा देणार्या या वनस्पतींच्या लागवडी पर्यावरण रक्षणास पूरक आहेत.
माहिती स्त्रोत : विकीपेडिया, पीआयबी