नुकतेच इंग्रजी नवीन वर्ष सुरू झाले आपण सर्वांनीच त्याचे स्वागत आपापल्या स्थितीनुसार जोरदार केले. अनेकांच्या भेटी गाठी झाल्या, अनेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या-घेतल्या. अनेकांनी नातेवाईकांची भेट घेतली, असे आपण खूप काही केले. तसंच वर्षभरातही आपण कित्तेकांच्या भेटी घेत राहतो. दुसऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतो. कामा निमित्तही प्रचंड व्याप वाढवतो. पण तुम्हाला माहित आहे का? या सर्व प्रपंचात आपण स्वत:ला भेटतो का? कधी शांत बसून स्वत:शी बोलतो का ओ? याचे उत्तर नेहमी नकारार्थीच येतं.
आपण आपल्याशी संवाद साधत नाही. मी म्हणजे कोण याचा विचार कधीतरी मनाला स्पर्श करून जातो पण त्यावर कधी चिंतन होत नाही. मी म्हणजे हे शरीर आहे की हे अवयव म्हणजे मी, की हे मी-मी करणारे मन म्हणजे मी. नक्की मी म्हणजे कोण? याचे उत्तर आपल्यालाच नव्हे तर भल्याभल्या विद्वानांनाही भ्रमित करणारे आहे. या मी चा शोध हा कधी तरी प्रत्येकाने घ्यायला हवा. त्याचे मी पण कशात दडलंय हे जाणणे हा एक प्रवास आहे. हा प्रवास करायचा म्हणजे कधी तरी शांत बसावे लागेल. एकांतात मनातल्या विचारांवर आरूढ होऊन त्याच्यासह भटकावे लागेल. वाहवत जावंस वाटलं तर जावे लागेल.
पण तितका वेळ आपण स्वत:ला दिला पाहिजे. सतत घाईगडबड आणि एका जीवघेण्या स्पर्धेत उतरून केवळ धावत आहोत आणि प्रचंड दडपणाने दमछाक होतेय. पण आम्हाला थांबायचे नाहीये. असे म्हणतात की हा मनुष्य जन्म खूप दुर्मिळ आहे. कित्तेक संतांनी महापुरुषांनी हे सतत सांगितलंय. तरीही आपण त्यावर क्षणभरच थांबतो आणि दुसऱ्या क्षणीच तिथून पळ काढतो. कोणत्या भीतीने ग्रासलोय आपण हे स्वत:लाही कळत नाहीये. यातून नैराश्य भय चिंता हेच अधिक वाढत आहे.
हे जग म्हणजे सत्य मानून आपण त्यावरून धावत सुटलोय. समस्त सृष्टी ही केवळ मानवाच्या विकासासाठी निर्माण झाली आहे. त्याचा वारेमाप वापर आपण केला आणि विकास आणखी विकास याचा कैफ चढत गेला. या सर्वात पुन्हा पुन्हा ‘मी कोण’ हा प्रश्न मागे पडत राहिला. मी म्हणजे माझे शरीर आणि या शरीराने निर्माण केलेली ओळख एवढे आहे का? तर नाही हे स्पष्टच आहे. मग हा स्वत:च्या आत दडून बसलेला मी म्हणजे मन बुद्धी तरी आहे का? याचेही उत्तर नाही हेच येतं. मी कोण? या प्रश्नाचा शोध कित्तेकदा आपली आपल्याशी ओळख करून देतो. आपल्यातील अनेक खुबींची आपल्याला जाणीव होते.
आपण तटस्थ राहून निरीक्षण करू लागलो की आपल्या व्यक्तिमत्वातील विविध पैलुंची आपल्याला ओळख होते. आपल्या चैतन्य शक्तिशी आपली ओळख होऊ लागेल पण त्यासाठी नित्य प्रयत्न करावे लागतील. मी कोण याचे थेट उत्तर नाही मिळाले तरी ‘स्व’ कडून ‘स्व’ कडे जाण्याचा प्रवास सुरू होईल आणि आपल्या भरकटलेल्या जीवाला थोडी विश्रांती मिळेल. आपण आपल्यातल्या चेतन आणि अचेतन, सूक्ष्म अशा जाणिवांच्या कक्षेत प्रवेशाचा प्रयत्न होईल आणि कदाचित त्यातून आपल्या नित्य कर्माच्या सहाय्यास हा प्रवास बहुमोल ठरेल. जे जे घडत आहे आणि जे जे दृष्यमान आहे ते सर्व आपल्या आतच आहे. त्यातूनच या सर्वांची उत्पत्ती होत आहे. ही जाणीव होईल. मी आणि माझे स्वरूप एक वाटत आहे. तरीही कर्ता कुणी वेगळा आहे. अलिप्त आहे. या शोधातून कदाचित आपल्याला आपल्यातील सूप्त जाणिवांची ओळख होईल आणि मी कोण हा प्रवास नित्य कर्माच्या पार्श्वभूमिवर तरी स्वतंत्रपणे सुरू राहिल. हाच प्रवास एक दिवस निश्चित आपल्याला लक्ष्यापर्यंत घेऊन जाणारा असेल.
(सुमेधा उपाध्ये या पत्रकारितेतील दीर्घ अनुभवानंतर आता सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शिक्षणासोबतच त्यांचा अध्यात्माचा चांगला अभ्यास आहे)