अखेर जो बायडन यांच्या विजयावर अमेरिकन काँग्रेसने शिक्कामोर्तब केले. एक औपचारिकता पूर्ण झाली. ट्रम्प यांनीही सत्तेच्या हस्तांतरणाची हमी दिली. पण त्याआधी जे घडलं ते अस्वस्थ करणारे होते.
अमेरिकेचे वादग्रस्त आणि मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सुरु असेलल्या अमेरिकन काँग्रेसच्या बैठकीत घुसून धुडगूस घालत हिंसाचार केला. ट्रम्प समर्थकांच्या या वागणुकीने अमेरिकेच्या लोकशाहीची घमेंड उतरवली आहे. इराण, इराक, लिबिया, सीरिया, ट्युनिशिया या देशांमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्याच्या नावाखाली केलेले अनन्वित अत्याचार करणाऱ्या अमेरिकेचे लोकशाहीची लक्तरे वाशिंग्टनमधील कॅपिटॉल मध्येच वेशीला टांगली गेली यातच सर्व काही आले.
अमेरिका प्रथम धोरणाखाली राष्ट्रवाद तेवत ठेवणाऱ्या ट्रम्प सारख्या नेत्यांने आपलीच कबर खोदून ठेवली पण यामुळे राख झाली तो तिथल्या लोकशाहीव्यवस्थेची. त्याचप्रमाणे राष्ट्रवादाच्या नावाखाली बहुसंख्याकावर आधारित राजकारणाची निर्मिती अंततः विनाशाकडेच नेते याची जाणीव देखील या निमित्ताने झाली. ट्रम्प यांच्या येण्याने अमेरिकेची प्रतिष्ठा लयाला गेली असे जे चित्र रंगवले गेले आहे ते अर्धसत्य आहे. अमेरिकेने आत्तापर्यंत आखलेल्या धोरणाचे हि परिणीती असून अमेरिकन जनता धर्माध, राष्ट्रवादी आणि स्वार्थी बनल्यामुळे ट्रम्प यांचा उदय झाला. जरी बायडेन यांना निवडून अमेरिकन जनतेने आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला असला तरी ट्रम्प यांनी चार वर्षात अमेरिकेचे जे नुकसान केले आहे त्याची भरपाई करणे हे बायडेन यांच्यासाठी अवघड जाणार आहे. साधारणतः आपली कारकीर्द संपल्यानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फारसा हस्तक्षेप करत नाही. ट्रम्प यांच्या समर्थकांच्या हिंसेने अमेरिकेची हि परंपरा संपुष्ठात येणार आहे. ट्रम्प हे इथून पुढे राजकारणात सक्रिय राहतील आणि आपला स्वार्थी अजेंडा पुढे चालूच ठेवतील.
या नकारात्मक गोष्टी असूनदेखील अमेरिकन समाजाची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. तंत्रज्ञानातील प्रगती, रोजगाराच्या संधी, तुलनेने स्थिर कायदा व सुव्यवस्था, राजकीय स्थिरता, बाहेरील समाजघटकांना आपल्यात सामावून घेण्याची वृत्ती हि अमेरिकन समाजव्यस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. अमेरिका राष्ट्र म्हणून जे जगावर अधिपत्य गाजवते ते या मूलभूत वैशिष्टयांवर. एक राष्ट्र म्हणून अमेरिकेचे परराष्ठ्र धोरण आक्रमक, युद्धखोर आणि वर्चस्ववादी राहिले असले तरी अमेरिकन समाज हा बहुतांश वेळा उदारमतवादीच राहिला आहे. सत्या नाडेला, सुंदर पिचाई, सध्याच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस हि उदारमतवादाची उद्दिष्टे आहेत.
भारतीय वंशाच्या कर्तबगार लोकांचे गोडवे गट असताना आजन्म सोनिया गांधींच्या विदेशी नागरिकत्वावरून आयुष्यभर राजकारण करणाऱ्या भारतासाठी हा एक मोठा धडा आहे. याउलट भारतासारखा देश वसुदेव कुटुंबकम विश्वास ठेवत असला तरीहि जातीयता आणि प्रादेशिकता हि इथल्या राजकारणाची मुख्य स्रोत राहिली आहेत. अमेरिकेतही कृष्णवर्णीयांचा तिरस्कार आणि पुरुषसत्त्ताक पद्धत अस्तित्वात असली तरी जगभरच्या मध्यमवर्गीयांना आकृष्ट करण्यात याचा कधीही अडथळा आला नाही.
१९९९ साली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी ‘रोग स्टेट’ नावाची संकल्पना मांडली होती. जागतिक शांततेला धोका असणारी राष्ट्रे असा त्याचा अर्थ होता. ज्यामध्ये लिबिया, इथिओपिया, सीरिया यासारख्या राष्ट्रांचा समावेश बुश यांनी केला होता. परंतु प्रख्यात विचारवंत, नॉम चोम्स्की यांनी जागतिक राजकारणात अमेरिका आणि इस्राईल हे दोनच ‘रोग स्टेट’ असून तेच खरे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला धोका असल्याचा प्रतिवाद केला होता.
महत्वाची गोष्ट म्हणजे ना बुश यांनी त्यांना ‘तुकडे तुकडे’ म्हणून टीका करणाऱ्या नॉम चोम्स्की यांची निर्भत्सना केली नाही ना अमेरिकन समाजाने त्यांना शहरी नक्षलवाद, देशद्रोही म्हणून हेटाळणी केली नाही. इतक्या टोकाच्या टीकेनतंरही चोम्स्की मिशिगन इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी या संस्थेत संचालक म्हणून कार्यरत होते. हे अमेरिकन समाजाचे वैशिष्ट्य आहे. बराक ओबामा यांच्या काळातही अमेरिकन समाजाच्या या मूलभूत वैशिष्ट्याला धोका निर्माण झाला नव्हता . डोनाल्ड ट्रम्प यांच्या येण्याने मात्र या मूलभूत वैशिष्ट्याला जबर धक्का बसला. आत्ता घडलेला हिंसाचार हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. जगभरातील जनतेसाठी हा धडा असून लोकशाहीच्या मार्गाने येऊन लोकशाहीचाच खून करण्याची प्रवृत्ती हि किती घातक आहे हे या निमित्ताने लक्षात आले तरी ते पुरेसे आहे.