मुक्तपीठ टीम
चीनच्या सीमेवर 4G मोबाईल सेवा जिओने उपलब्ध केली आहे. चीन सीमेला लागून असलेल्या लडाखमधील दुर्गम सीमावर्ती गाव डेमचोकमध्ये प्रथमच मोबाईलची घंटी वाजली आहे. डेमचोक येथील रिलायन्स जिओच्या नवीन मोबाइल टॉवरने परिसरात 4G मोबाइल कनेक्टिव्हिटी आणली आहे. अनेक दशकांपासून हा परिसर कनेक्टिव्हिटीच्या प्रतीक्षेत होता. तेथील रहिवाशी प्रथमच 4G व्हॉईस आणि डेटा मोबाईल नेटवर्कशी कनेक्ट झाले आहेत. लेहचे खासदार जम्यांग त्सेरिंग नामग्याल यांनी जिओ मोबाइल टॉवरचे उद्घाटन केले आणि सीमावर्ती गावातील लोक, लष्कर आणि ITBP कर्मचारी आणि प्रवाशांना 4G सेवा समर्पित केली.
मोबाईल टॉवरचे काम वेळेत पूर्ण केल्याबद्दल खासदारांनी रिलायन्स जिओच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि हा टॉवर या क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल असे सांगितले. या भागात प्रचंड बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे वर्षभरात केवळ ६ ते ७ महिनेच काम होते. डेमचोक व्यतिरिक्त, लडाखमधील चुशूल, न्योमा थरुक आणि दुरबुक या सीमावर्ती गावांमध्ये 4G सेवांचे उद्घाटन करण्यात आले.
रिलायन्स जिओचे लडाखमध्ये १६८ मोबाइल टॉवर कार्यरत आहेत. सियाचीन बेस कॅम्प आणि झांस्कर प्रदेशात जिओ हे एकमेव टेलिकॉम नेटवर्क ऑपरेटर आहे. सांकू, तैफसुरू, शारगोल, नुब्रा, खालसी, खारू, द्रास, पनामिक या दूरदूरच्या ब्लॉकमधील विविध गावे आधीच जिओ नेटवर्कने कव्हर केली आहेत. रिलायन्स जिओ इतर अनेक दुर्गम खेड्यांमध्ये नेटवर्क कव्हरेज विस्तारण्यासाठी काम करत आहे. जिओला सरकारी USOF अंतर्गत ६२ टॉवर्स बसवण्याची जबाबदारी मिळाली आहे, त्यापैकी ४४ टॉवर्सचे काम सुरू केले आहे.
अत्यंत कठीण परिस्थितीत या भागात नेटवर्क कायम ठेवण्यासाठी जिओने लडाखला तीन वेगवेगळ्या फायबर मार्गांनी जोडले आहे. लेह-श्रीनगर, लेह-मनाली (हिमाचल प्रदेश) आणि लेह-गुरेझ हे फायबर केबल मार्ग आहेत. दोन मार्ग सध्या कार्यरत आहेत तर लेह गुरेझ फायबर मार्ग लवकरच कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
डेमचोकमध्ये जिओ 4G सेवा सुरू करणे हे केंद्रशासित प्रदेशातील समुदाय आणि पर्यटन उद्योगासाठी वरदान आहे. दूरसंचार सेवा सुरू केल्याने आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात सीमावर्ती रहिवाशांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडून येतील अशी अपेक्षा आहे. 4G सेवा केवळ रहिवाशांच्या सामाजिक स्थितीवर परिणाम करणार नाही तर त्या प्रदेशाच्या आर्थिक विकासात एक टर्निंग पॉइंट देखील सिद्ध होईल कारण यामुळे स्थानिक तरुण आणि व्यावसायिकांसाठी उत्पन्नाच्या संधी निर्माण होतील.