मुक्तपीठ टीम
“जगभरात बहुतेक ठिकाणी मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून, त्याचा विपरीत परिणाम एकूण आरोग्यावर होत आहे. अन्य गंभीर आजारांप्रमाणेच मौखिक आरोग्याशी संबंधित व्याधींवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार व्हावेत. मौखिक आरोग्य व प्रगत दंतोपचार लोकाभिमुख होण्यासाठी आरोग्य विभागामार्फत प्रयत्न करणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.
इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीच्या वतीने आयोजित ‘प्रगत दंतोपचार व दंतरोपण’ या विषयावरील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी दंतचिकित्सकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या हस्ते इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीच्या मोबाईल ऍपचे लोकार्पण झाले. हॉटेल ऑर्किड येथे झालेल्या सोहळ्यात इंडियन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पंकज चिवटे, सचिव डॉ. रत्नदीप जाधव, खजिनदार डॉ. विजय ताम्हाणे, सहसचिव डॉ. केतकी असनानी, सहखजिनदार डॉ. कौस्तुभ पाटील, डॉ. संजय असनानी, डॉ. सुरेश लुधवानी आदी उपस्थित होते.
डॉ. भारती पवार म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक उपचार पद्धती पोचवण्याचे उद्दिष्ट्य असून, आगामी पाच वर्षात सर्वांसाठी आरोग्य, या दृष्टीने केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक गाव खेड्यापर्यंत आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे भारतीयांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे.”
“दंतचिकित्सा क्षेत्रात नवतंत्रज्ञान, आधुनिक उपकरणे विकसित करण्यासाठी मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या अंतर्गत केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. नवनवीन संशोधने, स्टार्टअप आणि भारतीय बनावटीची उपकरणे निर्माण करून लोकांना दंतोपचार परवडणाऱ्या दरात उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. वैद्यकीय महाविद्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढवून आरोग्य सुविधा सक्षम करण्याचे काम सुरु आहे. दंतोपचारावर होत असलेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेतून अनेक पर्याय, सूचना पुढे येतील. त्याचा केंद्र सरकार विचार करेल,” असेही डॉ. भारती पवार यांनी सांगितले.
डॉ. पंकज चिवटे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. डॉ. रत्नदीप जाधव यांनी आभार मानले. दंतचिकित्सक, तंत्रज्ञान बनवणाऱ्या कंपन्या आणि संशोधक एकत्र येऊन डिजिटल डेंटिस्ट्रीवर चर्चा करत आहेत. भारतासह इतर बारा देशांतून ८०० पेक्षा अधिक दंतचिकित्सक, तंत्रज्ञ, कंपन्यांचे प्रतिनिधी, विद्यार्थी आदी सहभागी झाले आहेत.