मुक्तपीठ टीम
ठाणे पश्चिम येथील सरस्वती सेकंडरी स्कुलच्या अवघ्या १५ वर्षीय ‘दिव्या’ पवळेने १० वीच्या परिक्षेत तब्बल ८१. ६० टक्के गुण मिळवलेत. तिचं हे यश इतरांपेक्षा वेगळं आहे. कारण तिने कर्करोगाशी लढताना जिद्दीने अभ्यासही केला आणि त्या परिस्थितीत गुणांचा हा टप्पा गाठला आहे.
तिच्या या संघर्षातून तिने एकप्रकारे कोणतेही भयाण संकट आले तरी खचून न जाता स्वत: पुढे पुढे जात राहा. आयुष्य चांगले आहे ते मनापासून जगा, अशी प्रेरणा सर्वांना दिली आहे, असं मानलं जातं. तिला ८१.६० टक्के गुण मिळाले म्हणून तिचे पालक, भाऊ आणि सर्व हितचिंतकांना झालेला आनंद हा शब्दात वर्णन करण्यापलीकडचा!.
कर्करोगावर जालीम उपाय म्हणजे केमोथेरपी. या थेरपीची अनेक सत्र ही तिच्या उपचारातील एक भाग होता. तिला १४ वेळा रक्त संक्रमण आणि १५वेळा प्लेटलेट्स बदलाव्या लागल्या आहेत, असे शिक्षक असलेले तिचे वडील एकनाथ आणि परिचारिका असलेली आई विजया यांनी सांगितले.
कोरोनाच्या चाचण्या झाल्यानंतर वारंवार सर्दी-खोकला आल्याने परत चाचण्या घेण्यात आल्या होत्या. कोरोना शिखरावर असताना व्हायरसच्या चाचण्या घेताना तिला कर्करोग झाल्याचे आढळून आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या १० वीच्या परीक्षेला मी नक्कीच बसणार आहे. मात्र शाळेत न जाता मी घरीच अभ्यास करणार आहे, असे तिने आई आणि वडिलांना स्पष्ट सांगितले आणि सुरुवातही केली. काही दिवस तिने क्लासचाही अभ्यास केला. त्यानंतर ती शाळेत गेलीच नाही. अभ्यास करत असतानाही तिला केमोथेरपी घेण्यासाठी परळच्या कर्करोग रुग्णालयात दर तीन-चार दिवसांनी जावे लागत होते. तरीदेखील ती मागे हटली नाही. गेल्या वर्षी मे मध्ये तिला टेन्शन आले होते. कारण तिला टाटा रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी नऊ महिन्यांत वारंवार यावे लागत होते. हे उपाय सुरु असतानाा तिला ‘नागिण’ झाली होती. ती कबड्डीपटू असल्याने ती मागे हटली नाही, अशी माहिती तिच्या शिक्षिका अमिता भागवत यांनी दिली.
परीक्षेला मी बसणारच असा ध्यास दिव्याने धरला होता. परीक्षा जवळ येत असताना तिने जास्त भर दिला होता तो ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांवर … या प्रश्नांची उत्तरे मुखोद्गत केल्यामुळेच तिने इंग्रजीमध्ये ८८ आणि गणितात ७५ टक्के गुण पटकावले, असे आई विजया म्हणाल्या.
तिच्या पालकांनी तिला खरंतर यावर्षी एसएससी परीक्षा वगळण्यास सांगितले परंतु ठाणे शहरातील सरस्वती माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी दिव्या पवळे, या उद्भवलेल्या त्रासावर मात करेल आणि बरी होईलच, असा विश्वास आणि आत्मविश्वास तिच्या पालकांना आणि शाळेचे मुख्याध्यापक सुरेश जंगले व तिच्या वर्गशिक्षिका अमिता भागवत यांना होता आणि तिने तो सिद्ध करुन दाखवला.
दिव्याचं शिक्षकांना कौतुक
“हार मानायची नाही, प्रयत्न सोडायचे नाहीत!” यावर ठाम विश्वास असलेली आणि त्यानुसार कृती करणारी , दिव्या अभ्यासात ‘दिव्य’ आहेच, तसेच ती सगळ्यांत प्रामाणिक व चांगली कबड्डीपटू असल्याने राज्य स्तरांवरील स्पर्धांमध्ये तिने प्राविण्य दाखवले आहे. या खेळात ‘फायटर’आहे. त्यामुळे अभ्यास करताना तिने कोणाचीही मदत घेतली नाही, अशी प्रतिक्रिया शाळेचे मुख्याध्यापक कैलास रावते, उपमुख्याध्यापक सुरेश जंगले आणि वर्गशिक्षिका अमिता भागवत यांनी व्यक्त केले.