रोहिणी ठोंबरे/मुक्तपीठ टीम
ही प्रेरणादायी सत्यकथा आहे काश्मीरमधील २४ वर्षीय इन्शाह बशीरची. ही तरुणी बडगाम जिल्ह्यातील बिरवाह भागातील रहिवाशी आहे. २००८ मध्ये इन्शाह स्वत: च्या अर्ध्या तयार असलेल्या घरातून ४० फूट उंचीवरून खाली पडली. त्या अपघातात तिने चालण्याची क्षमता गमावली. तेव्हा ती बारावीत होती. त्यानंतर तिने जीवन जसे आहे तसे आव्हान म्हणून स्वीकारले. तिला बास्केटबॉलमध्ये रस होता. तिने व्हीलचेअरवरूनच खेळण्याचा सराव सुरु केला. सोपं नव्हतंच. पण अवघड असलं तरी अशक्यही नव्हते, हे तिने सिद्ध करून दाखवले. अखेर २०१७ मध्ये हैदराबादमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरली. इन्शाह ही दिव्यांग खेळाडूंसाठीच्या विशेष प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षण घेत आहे. त्यानंतर तिने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. नाव मिळवलं. जम्मू काश्मीर या आपल्या राज्यातील ती पहिली व्हीलचेअरवरून बास्केटबॉल खेळणारी खेळाडू ठरली. इतर हजारोंसाठी प्रेरणादायी!
असंख्य मुलींची रोल मॉडेल!
तिचा आत्मविश्वास कसा परत आला याबद्दल तिने आपले अनुभव सांगितले आहेत. “वास्तविक, मुलींसाठी कोणताही विशेष संघ नव्हता. बास्केटबॉलमध्ये रस दाखवणारी मी मुलींपैकी पहिली होती. मी मुलांच्या टीमबरोबर खेळले आणि नंतर २०१७ मध्ये राष्ट्रीय पातळीवर “रेस्ट ऑफ इंडिया” म्हणून माझी निवड एका संघामध्ये करण्यात आली. आता तर ती असंख्य मुलींसाठी रोल म़ॉडेल ठरत आहे.
४० फूटांवरून कोसळली…व्हीलचेअरवर खिळली!
जेव्हा इन्शाहचा अपघात झाला तेव्हा ती फक्त १५ वर्षांची होती, बारावीत शिकत होती. तिच्या अर्ध्या तयार झालेल्या घरातून ती ४० फूट उंचीवरून खाली पडली. त्यानंतर तिचे आयुष्य बदललं. तिच्या पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया झाली पण ती यशस्वी झाली नाही आणि व्हीलचेअर हा तिचा एकमेव आधार बनला.
निर्धारानं खेळून दाखवलं!
काश्मिरच्या खोऱ्यात एक पुनर्वसन केंद्र आहे. शफाकत पुनर्वसन केंद्र. इन्शाहने तेथे काही लोकांना तिच्यासारख्या अवस्थेत, काहींना तिच्याहीपेक्षा वाईट अवस्थेत पाहिले. त्यांनी तिला त्यांच्यात सहभागी होण्याची सूचना केली. सुरुवातीला तिला वाटले की कदाचित हे ती करू शकणार नाही. परंतु नंतर तिने निर्धार केला. परिश्रम घेतले. त्रासही काढला. खेळून दाखवलं. आणि आता तर तिला वाटते व्हीलचेयरवर खेळणे हे मनोरंजक आणि सोयीस्कर आहे.
धैर्यानं आघातातून मुक्त
आघातातून मुक्त होण्यासाठी तिला खूप धैर्याची गरज होती. तिच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी तिला या लढाईसाठी पाठिंबा दिला आणि गमावलेली इच्छाशक्ती शोधण्यासाठी प्रोत्साहित केले. तिने बास्केटबॉलमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेतला. आताही तिला राष्ट्रीय परिषदेत भाग घेण्याची संधी लाभली. हे सारं तिच्यासाठी निश्चितपणे नवीन भरारी घेणारंच असतं.
परिश्रमातून यश
जम्मू-काश्मीरमधील मुलांच्या व्हीलचेयर बास्केटबॉल संघात खेळून तिला प्रेरणा मिळाली. तिने तिची आठ वर्षे एका खोलीत घालविली. या अपघातामुळे तिला खेळात आवड निर्माण झाली. अखेर, पुनर्वसन केंद्रात तिला संधी मिळाली तेव्हा तिचे खेळांकडे लक्ष आकर्षित झाले. तिच्यासाठी ती एक जीवन-बदलणारी गोष्ट आहे कारण यामुळे ती व्यग्र राहिली आणि तिला मानसिक शांतीही मिळाली. ती दररोज जिममध्ये जाते आणि नियमित दिनचर्या पाळते. ती तिच्या कोचने ठरविलेला डाएट चार्ट पाळते. याव्यतिरिक्त, दररोज खेळाचा सराव करते.
इन्शाह भविष्य घडवणार!
जम्मू-काश्मीरमध्ये अशी कोणतीही अकॅडमी नाही जिथे खेळाडू प्रशिक्षण घेऊ शकतात. तिला माध्यमांमध्ये मिळालेल्या प्रसिद्धीमुळे आता बर्याच मुली प्रेरीत होऊन या खेळाकडे वळल्या आहेत. भविष्यातही अशा मुलींसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल, कदाचित तिच अशा मुलींना खेळाडू म्हणून घडवेलही!
निराशेवर मात करण्याचा ‘इन्शाह’ मंत्र!
निराशा इन्शाहलाही ग्रासत असते. अशाच एका वेळी तिने निराशेवर मात कशी करावी ते सांगणारे आपले विचार मांडलेत:
“मला वेगवेगळ्या लोकांकडून नैराश्याविषयी आणि बर्याच महिन्यांपासून त्याचे निराकरण कसे करावे किंवा त्यास कसे सामोरे जाता येईल आणि सुख आणि शांतीपूर्ण जीवन जगण्यासंबंधी अनेक संदेश येत आहेत. म्हणून, मी नैराश्य आणि त्यावरील उपायांबद्दल लिहित आहे. मी माझा मृत्यू दाराशी आलेला पाहिला आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमच्यापेक्षा बलवान नाही. मी तुम्हाला सांगते की, नैराश्यावर मात करण्यासाठी कोणतीही युक्ती नाही आहे. तुम्हीच एकमेव आहात जे स्वत:च्या समस्येचे निराकरण करू शकता. आपल्याला वाटते की, आपल्या जवळ दृढ आणि धैर्य नाही तरीही आपण त्याची निवड करून तसे बनू शकतो. अखेर, आपल्या लक्षात येईल की आपल्यात ते सामर्थ्य आणि धैर्य आहे. हे अवघड आहे पण अशक्य नाही. तुमच्या आयुष्यातील सर्वात बळकट व्यक्तीचा विचार करा. तुमच्या रोल मॉडेलचा विचार करा. तुमच्या तुलनेत त्यांच्यात इतके वेगळे काय आहे? निश्चितच, आपल्याकडे वेगवेगळ्या वातावरणात भिन्न व्यक्तिमत्व वैशिष्ट्य असतात. पण याचा अर्थ असा आहे की, आपल्यातील काहींमध्येच सामर्थ्यवान, धैर्यवान आणि काहीतरी चांगले करण्याची इच्छा क्षमता आहे? आपल्या सर्वांमध्ये काहीतरी चांगले करण्याची क्षमता आहे. आपल्या सर्वांमध्ये सामर्थ्यवान बनण्याची क्षमता आहे. काही लोक तुम्हाला प्रोत्साहन देत नाहीत, काही तुम्हाला परावृत्त करतात पण तुम्ही खचू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. तम्ही सर्व करू शकता. कधीही प्रयत्न करणे थांबवू नका, तुमचाही दिवस येईल.
हे पडणे ठीक आहे, रडणे ठीक आहे, किंचाळणे ठीक आहे पण आशा सोडणे ठीक नाही.
पाहा व्हिडीओ: