मुक्तपीठ टीम
स्टील स्लॅग म्हणजे पोलाद निर्मिती प्रक्रियेतील टाकाऊ उत्पादन. त्याच्यापासून तयार केलेल्या पहिला सहापदरी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. गुजरातमध्ये सूरत येथे हा टाकाऊतून टिकाऊ महामार्ग बांधण्यात आला आहे. केंद्रीय पोलाद मंत्री रामचंद्र प्रसाद सिंह यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण नुकतेच झाले. गुजरातमधील सुरत येथील बंदराला शहराशी जोडणारा हा महामार्ग आहे.
उत्पादन प्रक्रियेत वाया जाणाऱ्या घटकांमध्ये नैसर्गिक समुच्चय घटकापेक्षा चांगले गुणधर्म असतात.त्यामुळे रस्ते बांधणीत अशा सामग्रीचा वापर केल्याने टिकाऊपणा तर वाढेलच शिवाय बांधकामाचा खर्च कमी होण्यासही मदत होईल. या रस्त्यापासून मिळालेल्या अनुभवाचा उपयोग बांधकामात या स्टील स्लॅगचा (पोलादाच्या भुकटीचा) मोठ्या प्रमाणात वापर करण्याच्या दृष्टीने तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यासाठी केला जाईल,असे मंत्र्यांनी सांगितले.
सर्व प्रकारच्या कचऱ्याचे संपत्तीमध्ये रूपांतर करून चक्रीय अर्थव्यवस्था आणि संसाधन कार्यक्षमतेला चालना देण्याची गरज आहे. पोलाद मंत्र्यांनी या रस्त्याचे लोकार्पण करताना ती गरज व्यक्त केली. प्रक्रिया केलेल्या पोलादाचा १००% वापर करून तयार केलेला हा रस्ता हे कचऱ्याचे संपत्तीत रूपांतर करण्याचे आणि पोलाद संयंत्रांची शाश्वतता सुधारण्याचे एक प्रत्यक्ष उदाहरण आहे, असेही ते म्हणाले.
रस्ते बांधणीसाठी, शेतीसाठी मातीची पोषक द्रव्ये आणि खतांना पर्याय म्हणून, रेल्वेसाठी खडी आणि हरित सिमेंट तयार करण्यासाठी अशा सामग्रीचा वापर करण्याच्या दृष्टीने पोलाद मंत्रालय इतर सर्व पर्यायांचा शोध घेत आहे, असे पोलाद मंत्र्यांनी सांगितले. पोलाद मंत्रालयाने पोलादाच्या उत्पादना दरम्यान निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या उप उत्पादनांच्या वापरासाठी अनेक संशोधन आणि विकास प्रकल्प आधीच मंजूर केले आहेत आणि त्यापैकी बहुतेकांना उत्तरदायी म्हणून मानले जात आहे. स्टील स्लॅग वापरून तयार केलेला रस्ता देखील इतर प्रमुख पोलाद कंपन्यांसह मंत्रालयाने प्रायोजित केलेल्या संशोधन आणि विकास प्रकल्पाचा भाग आहे.
देशात विविध प्रक्रिया मार्गांच्या माध्यमातून स्टील स्लॅगचे उत्पादन २०३० पर्यंत वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे रस्ते बांधणीत स्टील स्लॅगचा वापर हा देशातील नैसर्गिक समुच्चय घटकांची कमतरता भरून काढेल.