मुक्तपीठ टीम
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अटल अभियान (अमृत) २.० अंतर्गत ‘इंडिया वॉटर पिच-पायलट-स्केल स्टार्ट-अप चॅलेंज’चा शुभारंभ झाला. ही स्पर्धा पाणी समस्यांबाबत प्रायोगिक तत्वावर उपाययोजना सुचवणाऱ्या स्टार्ट अप कंपन्यांसाठी आहे.
स्टार्टअप्सना ‘तंत्रज्ञान भागीदार’ म्हणून संलग्न करण्याच्या तंत्रज्ञान उप-अभियानाला मंत्रिमंडळाने अमृत २.० अंतर्गत मान्यता दिली आहे. शाश्वत आर्थिक विकासासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण होण्याच्या दृष्टीने, नवकल्पना आणि संरेखन विकसित करून पाणी/वापरलेले-पाणी प्रक्रिया क्षेत्रातील स्टार्टअप्सना सक्षम करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत मंत्रालय १०० स्टार्ट-अप्सची निवड करेल आणि त्यांना २० लाख रुपये पाठबळ तसेच मार्गदर्शनपर निधी म्हणून दिले जातील.
स्टार्टअप्स, तरुण नवोन्मेषी , उद्योग भागीदार, इनक्यूबेटर्स आणि राज्ये/शहरांना अशा प्रकारचा पहिला नेटवर्किंग मंच प्रदान करण्यासाठी, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने आज इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे ‘इंडिया वॉटर पिच-पायलट-स्केल स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह’ चे आयोजन केले होते.या परिषदेदरम्यान केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्र्यांनी माय जिओव्ही (MyGov ) मंचावर स्टार्टअप चॅलेंजचा प्रारंभ केला.
२.७७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाची अमृत २.० ही परिवर्तनकारी आणि अनोखी योजना आहे, असे पुरी यांनी यावेळी बोलताना सांगितले. ही योजना देशातील जलसुरक्षा सुनिश्चित करेल, पाण्याचा वाहतूक खर्च कमी करेल, भूजल प्रदूषण कमी करेल आणि पाणी वापर क्षमता वाढवेल, असे ते म्हणाले. हे अभियान यशस्वी होण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना, तंत्रज्ञान, नवी वितरण यंत्रणा इ.आणून स्टार्ट-अप्सना सार्थ भूमिका बजावावी लागेल असेही त्यांनी सांगितले.
१ ऑक्टोबर २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अमृत २.० चा औपचारिक प्रारंभ केल्यानंतर, ५ ऑक्टोबर २०२१ रोजी लखनौ येथे हितसंबंधितांशी सल्लामसलत करण्यात आली. आणि १२ ऑक्टोबर २०२१ रोजी या अभियानाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली.