मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण म्हणजेट एनएफएचएसच्या पाचव्या अहवालात एक घटना उघडकीस आली आहे. भारतीयांच्या मनोरंजनाच्या सवयी म्हणजेच वर्तमानपत्र वाचन, रेडिओ ऐकणे, टेलिव्हिजन आणि चित्रपट पाहणे या आकड्यांमध्ये मोठी घट झाली आहे.
२०१९ ते २०२१ या वर्षात केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे एनएफएचएसने यावर्षी मे महिन्यात पाचवा अहवाल जारी केला आहे. ज्यामध्ये वृत्तपत्र-नियतकालिक वाचन, टीव्ही पाहणे आणि रेडिओ ऐकणे यामध्ये बदल झाला आहे. अहवालात म्हटले आहे की, भारतातील लोकांच्या मनोरंजनाच्या पद्धतीत बदल झाल्यामुळे २०१५ च्या तुलनेत देशातील वर्तमानपत्र-मासिक वाचणे, टेलिव्हिजन पाहणे आणि रेडिओ ऐकण्याच्या सवयींमध्ये दुहेरी आकडी घट झाली आहे.
डिजिटल मीडियाचा अति वापर
- २०१५-२०१६ च्या सर्वेक्षण अहवालात, २५ टक्के महिला आणि १४ टक्के पुरुषांनी असा दावा केला आहे की, ते वृत्तपत्रं, टीव्ही, मासिके, रेडिओ आणि सिनेमा यांच्या संपर्कात नाही आहेत.
- तर, २०१९ मध्ये , ४१ टक्के महिला आणि ३२ टक्के पुरुषांचे म्हणणे आहे की मनोरंजनासाठी ते वर्तमानपत्र, टीव्ही, मासिके, रेडिओ आणि सिनेमा यांच्या संपर्कात नाहीत.
- पारंपारिक मास मीडियाच्या या घसरणीवर, काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एनएफएचएसचा हा अहवाल सर्वसमावेशक नाही आणि डिजिटल माध्यमांद्वारे कंटेंट प्रदान केल्याचा उल्लेख नाही.
पुरुष वर्तमानपत्रापासून तर महिला टीव्हीपासून दूर
- २००५-०६ आणि २०१५-१६ या वर्षांमध्ये पुरुष तसेच महिलांमध्ये टीव्ही, मासिके आणि वर्तमानपत्रांच्या प्रसारात वाढ झाली आहे.
- पण २०१९-२०२१ या कालावधीत हा ट्रेंड पूर्णपणे उलटला आहे.
- पुरुषांचे वर्तमानपत्र किंवा मासिक वाचन सर्वात कमी झाले, तर महिलांनी स्वतःला टीव्हीपासून सर्वात जास्त दूर ठेवले.
डिजिटल प्लॅटफॉर्मवर बातम्या वाचल्या जातात
इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे अध्यक्ष मोहित जैन यांच्या मते, डिजिटल प्लॅटफॉर्मवर बातम्या उपलब्ध झाल्यामुळे बातम्या वाचणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत बातम्यांचे माध्यम म्हणजे फक्त वर्तमानपत्रे आणि टीव्ही असेच होते, पण आता लोक प्रत्यक्ष नव्हे तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाऊन बातम्या वाचतात आणि ऐकतात. प्रिंट आणि टीव्ही न्यूज इंडस्ट्रीद्वारे दिल्या जाणाऱ्या बातम्यांबाबत लोकांची उदासीनता वाढत आहे आणि लोक या बातम्यांशी स्वतःला जोडू शकत नाहीत.