मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात सध्या अनलॉक प्रक्रिया टप्प्या टप्प्याने सुरु असली तरी मुंबईतील लोकल प्रवासावर लॉकडाऊनसारखेच निर्बंध कायम आहेत. मुंबई लोकलने सामान्यांना प्रवास करण्याची अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. केवळ अत्यावश्यक सेवांशी संबंधित लोकांना परवानगी आहे. मात्र निर्बंध कायम असतानाही तब्बल ३५ लाख प्रवासी लोकलने प्रवास करत आहेत. यातील बहुसंख्य हे बनावट ओळखपत्रांवर प्रवास करत असल्याचा संशय आहे
.
सध्या लोकल ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये नेहमीसारखी गर्दीच्या वेळी असते तशी गर्दी दिसू लागली आहे. कोरोना नियमांनुसार सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले गेले नाही तर पुन्हा तिसऱ्या लाटेचा धोका काही आठवड्यात उद्भवण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर ही गर्दी धडकी भरवणारी आहे.
लोकल ट्रेनमध्ये अशी वाढली गर्दी
- लॉकडाऊन दरम्यान रेल्वेने आवश्यक सेवांशी संबंधित लोकांसाठी १५ जून २०२० पासून लोकल गाड्या सुरू केल्या.
- सुरुवातीला केवळ ३०,००० लोक दररोज प्रवास करत होते.
- २९ जानेवारी २०२१ पर्यंत प्रवाशांची संख्या १९ लाखांवर पोहोचली.
- १ फेब्रुवारीनंतर सुमारे ३६-३७ लाख प्रवाशांनी दररोज प्रवास सुरू केला.
- १ एप्रिल रोजी लॉकडाउन २.० नंतर प्रवाशांच्या संख्येत घट झाली.
- त्यानंतर ७ जून २०२१पासून सुमारे दहा लाख लोक दररोज प्रवास करु लागले.
- आता ही संख्या वाढून ३० ते ३५ लाखांवर पोहचली आहे.
लोकल ट्रेनमध्ये गर्दी का वाढली?
- रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक सरकारी संस्थांमध्ये कर्मचार्यांची उपस्थिती वाढविण्यात आली आहे.
- याशिवाय पावसाळ्यासंदर्भातील कामे करण्यासाठी कंत्राटी कामगारांची गर्दीही वाढली आहे.
- त्यामुळे गाड्यांमध्ये तुलनेने जास्त गर्दी दिसून येते.
- तरीही होणारी गर्दी ही त्यांच्या संख्येपेक्षा कैकपट जास्त आहे.
बनावट ओळखपत्रांवर प्रवास
- गर्दीचे खरे कारण हे बनावट ओळखपत्रांचा वापर करून होणारा बेकायदा प्रवास आहे.
- दक्षिण मुंबईतील बाजारांच्या ठिकाणी मुंबईच्या दुसऱ्या भागातून येणारे फेरीवाले, कामगार, कर्मचारी यांच्यापैकी अनेक अधिकार नसतानाही बनावट ओळखपत्रांवर प्रवास करीत आहेत.
- वैद्यकीय, सुरक्षा रक्षक इत्यादींची बनावट ओळखपत्रे ३०० ते ५०० रुपयात तयार केले जाते.
छायाचित्र सौजन्य @sp_subhash