मुक्तपीठ टीम
पंजाबमधील रोपारमधील आयआयटीने नाशिवंत उत्पादने, लस, रक्त आणि अवयव यांची ने-आण करताना तापमानाची नोंद ठेवणारे उपकरण तयार केले आहे. ‘अंबीटॅग’ नावाचे हे उपकरण प्रत्यक्ष वाहतूक करताना तिथल्या तापमानाची नोंद करते. हे भारतीय बनावटीचे अशा प्रकारचे पहिले माहिती तंत्रज्ञान उपकरण आहे. जगभरातून आणलेल्या विशिष्ट वस्तू वापरण्यासाठी योग्य आहेत की तापमानातल्या फरकामुळे खराब झाल्या आहेत, हे समजण्यासाठी मदत होणार आहे. कोरोना लसीसह रक्त आणि अवयव यांच्या वाहतुकीच्या दृष्टीने ही माहिती अतिशय महत्वाची आहे.
आयआयटीचे अंबीटॅग आहे तरी कसे?
• युएसबी उपकरण म्हणून विकसित करण्यात आलेले अंबीटॅग एकदा चार्ज केल्यानंतर आपल्या लगतच्या भोवतालाचे उणे ४० ते + ८० डिग्री पर्यंतच्या तापमानाची ९० दिवस नोंद करते.
• आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध असलेली अशा प्रकारची उपकरणे ३०-६० दिवसांच्या डाटाची नोंद करतात अशी माहिती अवध (कृषी आणि जल तंत्रज्ञान विकास केंद्र) प्रकल्प समन्वयक डॉ सुमन कुमार यांनी दिली.
• आधीच सेट करून ठेवलेल्या तापमानापेक्षा जास्त तापमान झाल्यास हे उपकरण त्याबाबत इशाराही देते.
• कोणत्याही संगणकाशी युएसबी जोडून, नोंद केलेला डाटा प्राप्त करता येतो.तंत्रज्ञान नवोन्मेश केंद्र- अवध आणि त्याचे स्टार्ट अप स्क्रच नेस्ट यांनी हे उपकरण विकसित केले आहे.
• अवध हा भारत सरकारचा प्रकल्प आहे. या उपकरणाला ISO 13485:2016, EN 12830:2018, CE & ROHS प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची माहिती कुमार यांनी दिली आहे.
सध्या भारतात आतापर्यंत अशा प्रकारची उपकरणे सिंगापूर, हॉंगकॉंग, आयर्लंड आणि चीन मधून आयात करण्यात येत आहेत. अंबीटॅगच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी आयआयटी रोपार नवोन्मेश केंद्र सज्ज होत असल्याची माहिती अवध प्रकल्प संचालक प्राध्यापक पुष्पेंद्र पी सिंह यांनी दिली आहे., उत्पादन सुविधेपासून ते देशातल्या दूर दूरच्या लसीकरण केंद्रापर्यंत कोरोना लस वाहतूकीशी संलग्न असणाऱ्या सर्व कंपन्यांना ४०० रुपये या उत्पादन किमतीत हे उपकरण उपलब्ध करून देण्यात येईल. हे उपकरण म्हणजे या महामारी विरोधातल्या लढ्यात आणि आत्मनिर्भर भारत अभियानात छोटे योगदान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पाहा व्हिडीओ: