मुक्तपीठ टीम
देशात सर्वत्र फास्टॅग अनिवार्य केल्यानंतरही हजारो वाहनचालकांनी अद्याप ही सुविधा घेतलेली नाही. त्यामुळे सध्या सरकार अद्याप फास्टॅग वापरत नसलेल्यांकडून दुप्पट दंड वसूल करत आहे. त्यांना आर्थिक भुर्दंडाचा फटका बसत असतानाच टोल नाक्यांवरील रांगेत रोखोल भरण्यासाठी वेळही वाया घालवावा लागत आहे. त्यामुळे त्यांनी आता तरी सावधान व्हावं आणि फास्टॅगचा वापर करावा, यासाठी टोल नाक्यांवरच फास्टॅग सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
आतापर्यंत किमान दहा टक्के वाहनचालकांनी फास्टॅग लावलेला नाही. त्यामुळे या वाहनचालकांकडून दुप्पट टोलची वसुली करण्यात येत आहे. मुंबई, नागपूर विभागांतर्गत जवळपास ५० लाख रुपये टोल दुप्पट दंडापोटी वसूल करण्यात आले आहेत.
का फास्टॅग अनिवार्य?
- टोल भरण्यासाठी होणारी वाहनांची गर्दी टाळणे
- वाहनचालकांचे रांगेत असताना इंधनही वाया जात असे, ते वाचवणे
- वाहनचालक आणि प्रवाशांचा टोल रांगेतील वेळ वाचवणे
रस्ते वाहतूक मंत्रालयाने वाहनांसाठी ‘वन नेशन वन फास्टॅग’ धोरण १६ फेब्रुवारीपासून अनिवार्य केले. १ जानेवारी २०२१ पासून त्याची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्याला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. अखेरीस १६ फेब्रुवारीपासून धोरणाची कठोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. तरीही हजारो वाहनं फास्टॅगविना असल्याने काही प्रमाणात समस्या तशीच आहे.
उलट दुप्पट टोल दंडामुळे भांडणे करण्यात येत आहेत. अशांना आवरण्यासाठी टोल नाक्यांवर टोल मार्शलही नेमण्यात आले आहेत.
काय आहे फास्टॅग?
- फास्टॅग हा टॅग किंवा स्टिकरचा एक प्रकार आहे.
- त्याच्यावर वाहनाची सर्व माहिती बारकोडमध्ये नोंदवलेली असते.
- हे स्टिकर वाहनाच्या विंडस्क्रीनवर म्हणजे समोरच्या काचेवर लावले जाते.
- या तंत्रज्ञानाद्वारे टोल प्लाझावरील कॅमेरे स्टिकर्सचा बार कोड स्कॅन करतात.
- स्टिकरवरील बारकोडमध्ये नोंदवलेल्या माहितीसह वाहनधारकाचे खाते जोडलेले असते.
- टोलचे शुल्क फास्टॅगच्या खात्यामधून आपोआप वजा केले जातात.
- टोल प्लाझावरील खर्च कमी, दिरंगाई दूर आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी हे उपयोगी ठरते.