मुक्तपीठ टीम
जगातले सातवे आश्चर्य असलेल्या ताजमहाल हा प्रेमाचं प्रतिक मानला जातो. बादशहा शहाजहांने त्याची एक बेगम मुमताजसाठी तो बांधला. त्याचे आकर्षण सर्वांनाच असते. परंतु त्यापासून प्रेरणा घेऊन एका पतीने आपल्या पत्नीसाठी तशीच प्रतिकृती उभारल्याचं पुढे आलंय. मध्य प्रदेशातील आनंद प्रकाश चोकसे या रहिवाशाने आपल्या पत्नीला म्हणजेच मंजुषा चोकसे यांना एक अनोखी भेट दिली आहे. त्यांनी जगप्रसिध्द ताजमहालची प्रतिकृती असलेले घर बांधून ते घर त्यांच्या बायकोला भेट दिले आहे.
शाहजहानने पत्नी मुमताजच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून हे प्रसिद्ध स्मारक बांधले होते. जगातील सात आश्चर्यानंपैकी एक असलेले आग्रा येथील ताजमहाल प्रेमाचे प्रतीक मानले जाते. आनंद चौकसे यांनी पत्नीला ताजमहालची प्रतिकृती असलेले घर भेट देऊन आश्चर्यचकित केले आहे. मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील रहिवाशी असलेल्या आनंद यांनी आपल्या पत्नीला भेट म्हणून चार बेडरुमचे आलिशान ताजमहालसारखे घर बांधले आहे. जसे शाहजहानने पत्नी मुमताजच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध स्मारक बांधले होते, त्याप्रमाणेच हे घर देखील आनंद यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणु शकतो.
शिक्षणतज्ज्ञ आनंद प्रकाश चोकसे यांनी पत्नी मंजुषा चोकसे यांच्यासाठी चार बेडरूमची इमारत बांधली होती. हे जोडपे ताजमहाल पाहण्यासाठी आग्रा येथे गेले होते. त्यांनी इमारतीच्या वास्तूचे बारकाईने निरीक्षण केले आणि अभियंत्यांना संरचनात्मक घटकांकडे लक्ष देण्यास सांगितले. सुरुवातीला त्यांना ८० फूट उंचीची रचना तयार करायची होती. मात्र, अशा बांधकामांना परवानगी नाकारण्यात आली. नकार मिळाल्यानंतर त्यांनी ताजमहाल शैलीची इमारत बांधण्याचा संकल्प केला.
आतील कोरीव कामासाठी त्यांनी बंगाल आणि इंदूरमधील तज्ञ कलाकारांना आमंत्रित केले. घराचा घुमट २९ फूट उंचीवर आहे. त्यात ताजमहाल शैलीतील टॉवर्सचा समावेश आहे आणि घराचा मजला राजस्थानच्या ‘मकराना’पासून बनवला आहे, तर फर्निचर मुंबईतील कारागिरांनी बनवले आहे. हे अनोखे घर बांधण्यासाठी तीन वर्षे लागली. अभियंत्यांनी ताजमहालच्या ३D प्रतिमेवर आधारित रचना तयार केली आहे. सल्लागार अभियंता प्रवीण चौकसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घराचा आकार ९० चौरस मीटर असून त्यात मिनार आहेत. मूळ रचना ६० चौरस मीटर आकाराची आहे. घुमट २९ फूट उंचीवर आहे. यात एक मोठा हॉल, पहिल्या मजल्यावर दोन बेडरूम आणि दुसऱ्या मजल्यावर दोन बेडरूम, एक लायब्ररी आणि एक ध्यान कक्ष आहे. इतकेच नाही तर घराच्या आतील आणि बाहेरील प्रकाश व्यवस्था अशा प्रकारे डिझाइन केली आहे की ते वास्तविक ताजमहालाप्रमाणे अंधारात देखील चमकते.