मुक्तपीठ टीम
काहींना मायग्रेनचा अति त्रास असतो. यामुळे त्यांना डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवतात. वेळीच यावर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे आवश्यक आहे. तर काहींचे अधूनमधून डोके दुखते ते त्याकडे दुर्लक्ष करतात. पण जर सलग अनेक दिवस डोकेदुखी होत असेल, किंवा पहाटे-रात्री अपरात्री तीव्र डोकेदुखीने उठत असाल, चक्कर आल्यासारखे वाटले, डोकेदुखीने मळमळ होत असेल किंवा शिंका, खोकला येत असल्यास, त्याकडे दुर्लक्ष करू नये. ब्रेन ट्यूमरचे वेळेवर निदान आणि उपचारांचे महत्त्व लक्षात ठेवलं तर ब्रेन ट्यूमरशी सामना शक्य असतो.
वेळीच द्या लक्ष…
ज्यावेळी डोकेदुखीचे औषध घेतल्यानंतरही वेदना कमी होत नाहीत, तेव्हा हे ब्रेन ट्यूमर होण्याचे लक्षण असू शकते. याबाबत सावध होणे आणि ताबडतोब तपासणी करणे आवश्यक आहे. तपासणी आणि उपचार वेळेवर झाले तर बरे होण्याची दाट शक्यता असते.
ब्रेन ट्यूमरचे दोन प्रकार आहेत
- ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूतील पेशी किंवा असामान्य पेशींची वाढ. ब्रेन ट्यूमरचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात.
- कर्करोग असणारा ट्यूमर आणि कर्करोगमुक्त ट्यूमर.
- कर्करोगाच्या गाठी देखील त्यांच्या विकासाच्या पद्धतीनुसार दोन श्रेणींमध्ये विभागल्या जातात.
- मेंदूमध्ये थेट विकसित होणाऱ्या ट्यूमरला प्रायमरी ब्रेन ट्यूमरच्या गाठी म्हणतात आणि शरीराच्या इतर भागांतून मेंदूमध्ये पसरणाऱ्या ट्यूमरला सेकंडरी किंवा मेटास्टॅटिक ब्रेन ट्यूमर म्हणतात.
- मेंदूतील ट्यूमरमुळे मज्जासंस्थेच्या कार्यावर किती परिणाम होईल हे कर्करोग किती वेगाने विकसित होत आहे आणि तो कुठे आहे यावर अवलंबून आहे.
ब्रेन ट्यूमरची मुख्य लक्षणे
- सौम्य डोकेदुखी हळूहळू तीव्र होणे
- डोकेदुखीमुळे झोप न लागणे
- मळमळ किंवा उलट्या
- दृष्टीदोष जसे की अंधुक दृष्टी, अस्पष्ट दृष्टी.
- समतोल राखण्यात अडचण येणे
- बोलण्यात त्रास होतो
- चक्कर येणे, विशेषतः अशा व्यक्तीमध्ये ज्याला ही समस्या कधीच आली नाही.
- ऐकण्यास त्रास होतो
ब्रेन ट्यूमर उपचाराचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जे ट्यूमरच्या प्रकार, आकार आणि स्थितीच्या आधारावर निवडले जातात. शस्त्रक्रियेद्वारे, संपूर्ण गाठ किंवा ट्यूमरचा काही भाग काढून टाकला जातो. ब्रेन ट्यूमरचा काही भाग काढून टाकला तरी त्याची लक्षणे कमी होण्यास मदत होते. ब्रेन ट्यूमर काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रियेमध्ये संसर्ग आणि रक्तस्त्राव यासारखे अनेक धोके असतात. जर ट्यूमर अशा ठिकाणी असेल जेथे धोका जास्त असेल तर उपचारांच्या इतर पद्धतींचा अवलंब केला जातो. मायक्रो एन्डोस्कोपिक स्पाइन शस्त्रक्रियेमुळे मेंदूतील ट्यूमरवर उपचार करणे सोपे आणि अधिक कार्यक्षम बनले आहे.
रेडिएशन थेरपी
- रेडिएशन थेरपी ट्यूमर पेशी नष्ट करण्यासाठी एक्स-रे किंवा प्रोटॉन सारख्या हाय-एनर्जी बीमचा वापर करते.
- रेडिएशन थेरपी दोन प्रकारे दिली जाते; बाह्य बीम रेडिएशन आणि ब्रेकीथेरपी.
- रेडिएशन थेरपीचे दुष्परिणाम रेडिएशनच्या प्रकारावर आणि डोसवर अवलंबून असतात.
- सामान्य साइड इफेक्ट्समध्ये थकवा, डोकेदुखी, स्मृती कमी होणे आणि टाळू जळणे आणि खाज सुटणे यांचा समावेश होतो.
रेडिओ शस्त्रक्रिया
पारंपारिक स्वरूपात ही शस्त्रक्रिया नाही. यामध्ये कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी रेडिएशनच्या अनेक किरणांचा वापर केला जातो. रेडिओ शस्त्रक्रिया एकाच दिवशी केली जाते.
केमोथेरपी
- यामध्ये ट्यूमर पेशींना मारण्यासाठी औषधांचा वापर केला जातो. केमोथेरपीची औषधे गोळीच्या स्वरूपात किंवा शिरांमध्ये इंजेक्शनद्वारे घेतली जाऊ शकतात.
- किती डोस दिला जाईल हे ट्यूमरवर अवलंबून असते. यामुळे मळमळ, उलट्या किंवा केस गळणे होऊ शकते.
बरे झाल्यानंतरही कोणती खबरदारी बाळगावी
- नियमित व्यायाम करणे, पौष्टिक आणि संतुलित आहार घेणे आणि पुरेसे पाणी पिणे.
- फिटनेसची काळजी घ्या, वजन वाढू देऊ नका.
- दररोज ३० ते ४० मिनिटे योगा आणि व्यायाम करा.
- तंबाखूचे कोणत्याही स्वरूपात व्यसन करू नये.
- अल्कोहोल आणि लाल मांसाचा वापर कमी करा.
- जास्त चरबीयुक्त पदार्थ, साखरयुक्त पेये आणि जंक फूडचे सेवन टाळा.
- आपल्या आहारात अधिकाधिक फळे आणि भाज्यांचा समावेश करा.
- मन शांत ठेवा; मानसिक शांतीसाठी ध्यान करा, संगीत ऐका, पुस्तके वाचा किंवा तुमच्या आवडीचे कोणतेही काम करा.
स्वतःची काळजी घ्या आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधे योग्य वेळी घ्या आणि डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय ती घेणे थांबवू नका. आवश्यक ती खबरदारी घेतल्यास पुन्हा ब्रेन ट्युमर होण्याचा धोका खूप कमी होईल.