मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बुधवारी पहिला दसरा पार पडला. यावेळचा विशेष म्हणजे दसऱ्याला दोन शिवसेनांचे दोन मेळावे होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्क तर एकनाथ शिंदे यांचा बीकेसीत दसरा मेळावा पार पडला. बीकेसीवर सुरु असलेल्या दसऱ्या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे उपस्थित होते. त्यांनी भाषणही केले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंसारखा धडाडीचा माणूस महाराष्ट्राला हवाय, म्हणून मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. त्याच सभेत त्यांच्या घटस्फोटित पत्नी स्मिता आणि बिंदूमाधव ठाकरेंचे पुत्र निहाल ठाकरेही आले होते. त्यांनी भाषण केले नसले तरी त्यांची उपस्थितीही चर्चेचा विषय ठरली. अनेकांसाठी ठाकरेंकडून शिवसेना ओढून घेऊ पाहणाऱ्या एकनाथ शिंदे गटाच्या मेळाव्याला उपस्थिती लावणाऱ्या या तीन ठाकरेंबद्दल तेवढीशी माहिती नाही. त्यामुळे ती माहिती देण्याचा हा प्रयत्न.
जयदेव ठाकरेंबद्दल इतर माहिती देण्याआधी ते काय म्हणालेत ते जाणून घेऊया.
- हा एकटा नाथ होऊ नका… – जयदेव ठाकरे
- आम्ही ठाकरे काही लिखीत घेऊन येत नाही.
- एकनाथ माझ्या खूप आवडीचा आहे.
- आता मुख्यमंत्री झालाय, मला एकनाथराव बोलावं लागेल.
- पाच सहा दिवस झाले.
- मला अनेक फोन येत आहेत.
- अहो, तुम्ही शिंदे गटात गेला आहात का? हा ठाकरे कुणाच्या गोटात बांधला जात नाही.
- शिंदे यांनी दोन चार भूमिका घेतल्या, त्या मला आवडल्या. असा धडाडीचा माणून महाराष्ट्राला हवा आहे.
- त्यामुळे मी म्हणून शिंदेंच्या प्रेमासाठी मी इथं आलो आहे.
- आपला एक इतिहास आहे.
- चिपळ्या वाजवणारा एकनाथ आणि मध्यंतरीचा एकनाथ… त्यांना जवळच्यांनीच संपवलं.
- यांना एकटं पाडू नका.
- हा एकटा नाथ होऊ नका… हा एकनाथचं राहू द्या… ही तुम्हा सर्वांना विनंती आहे.
- सर्व बरखास्त करा, राज्यात पुन्हा निवडणुका घ्या… राज्यात पुन्हा शिंदेंचं राज्य येऊ द्या.
जयदेव ठाकरे यांनी तिथं केलेलं भाषण हे त्यांच्या स्वभावाप्रमाणे काहीसे स्वैर शैलीतीलच होते. म्हणजे राज्यातील सध्याचं सर्व बरखास्त करून पुन्हा निवडणुका घेण्याची त्यांची सूचना शिंदे गटालाच नाही तर भाजपालाही किती रुचेल हा प्रश्नच आहे. जयदेव ठाकरे यांना ओळखणारे सांगतात, ते तसेच आहेत. जिथे असतात, तिकडच्यांसाठी फायद्याचेच ठरतील असे नाही. त्यांच्या हिताचेच बोलतील वागतील असेही नक्की नाही.
- मुळात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा असल्यामुळे जरी जयदेव ठाकरे यांना महत्व मिळत असलं तरी ते हयात असताना त्यांचं आणि वडिलांचं चांगलं नव्हतं, अशी चर्चा असे.
- खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी त्याबद्दल अनेकदा नाराजी व्यक्त केल्याचं त्यांच्या जवळच्या वर्तुळातील काहींचं म्हणणं असे.
- दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा मुलगा बिंदू माधव यांचे १९९६ मध्ये अपघाती निधन झाले.
बाळासाहेबांना तीन मुलगे. - ज्येष्ठ पुत्र बिंदू माधव. यानंतर मधला मुलगा जयदेव ठाकरे आणि धाकटा मुलगा उद्धव ठाकरे.
- मोठा मुलगा बिंदू माधव आणि धाकटा मुलगा उद्धव ठाकरे यांच्याशी बाळासाहेबांचे सलोख्याचे संबंध होते, पण मधल्या मुलाशी म्हणजेच जयदेव ठाकरे यांच्याशी त्यांचे संबंध चांगले नव्हते अशी नेहमीच चर्चा असे.
- जयदेव ठाकरे यांच्या वागण्याचा बाळासाहेबांना त्रास होत असल्याचा उल्लेख ते अनेकदा उद्वेगाने करत असत.
पिता-पुत्रात दुरावा का आला? त्याविषयीही माहिती महत्वाची आहे.
- जयदेव यांनी पहिलं लग्न जयश्री कालेलकर यांच्यासोबत केलं होतं.
- पण त्या लग्नामुळे ते खुश नसल्याचं वागण्यातून दाखवत.
- त्यांच्या वागण्यामुळं कुटुंबात तणावाचं वातावरण होतं.
- याच दरम्यान जयदेव यांनी मोठं पाऊल उचललं. त्यांनी जयश्रींसोबत घटस्फोट घेतला.
- बाळासाहेब बाहेर जेवढे कडक होते, तेवढेच जवळच्या कुटुंबीयांसाठी हळवे होते. त्यांचं ते आपुलकीचं नातं वडिलकीच्या भूमिकेतून जबाबदारीचं असायचं. ते घरातील सर्वांचीच काळजी घेत असत. त्यामुळे बाळासाहेबांना जयदेवचं वागणं पटलं नाही.
- जयदेव विभक्त झाल्यामुळं बाळासाहेब आणि त्यांच्यातल्या नात्यात आलेला कडवटपणा कायम तसाच राहिला.
- यानंतर जयदेव ठाकरे यांनी स्मिता ठाकरे यांच्याशी दुसरं लग्न केलं.
- यामुळे बाळासाहेब आणि जयदेव यांच्यातली कटूता आणखी वाढली.
- स्मिता ठाकरेंपासून वेगळं होण्याचा निर्णयही जयदेव यांनी काही वर्षांनी घेतला.
- १९९५ला बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई यांचं निधन झालं.
- त्यानंतर जयदेव यांनी घर सोडलं आणि तिसरं लग्न केलं.
- २०१२मध्ये बाळासाहेबांचं निधन झालं.
- त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूपत्रात जयदेव यांच्यासाठी काहीच नसल्याचं उघड झालं.
- त्यावरूनही जयदेव आणि उद्धव ठाकरेंमध्ये न्यायालयीन लढाई झाली.
स्मिता ठाकरेंची नाराजी का? हाही महत्वाचा मु्द्दा आहे.
खरंतर जयदेव यांनी घटस्फोट दिल्यानंतरही स्मिता ठाकरेंसाठी मातोश्रीचे दरवाजे बंद झाले नाहीत. ठाकरे असल्यामुळे जो प्रभाव असतो, त्याचा फायदा घेत स्मिता ठाकरे यांनी बॉलिवूडमध्येही व्यावसायिक प्रवेश केला. त्यांनी एड्सबाधितांसाठी एक एनजीओ स्थापन करून समाजकार्यही केले. शिवसेना सत्तेत असताना त्यांना अंधेरी पश्चिममध्ये मोक्याच्या जागी एक सरकारी भूखंडही मिळाला. मनोहर जोशींना घालवून नारायण राणेंना मुख्यमंत्रीपदी आणण्यात त्यांचीही भूमिका असल्याची चर्चा होती. मात्र, किणी प्रकरणानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरेंना दूर करत उद्धव ठाकरे यांना सक्रिय करण्यास सुरुवात केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि ठाकरे कुटुंबापासून छोडीही वादग्रस्त प्रतिमा असणाऱ्यांना दूर करण्यास सुरुवात केली. त्यात स्मिता ठाकरेंचे महत्वही कमी करण्यात आले. त्यातून त्यांचं उद्धव ठाकरेंशी कायमचं वितुष्ट निर्माण झालं. त्यामुळे त्यांच्याविरोधातील घडामोडीत स्मिता ठाकरेंचं अस्तित्व दिसून येतं. आताही त्या त्यांचे भूतपूर्व पती जयदेव ठाकरे असलेल्या शिंदे गटाच्या मेळाव्यात उपस्थित होत्या. मात्र, त्यांनी तिथं भाषण केलं नाही.
निहाल ठाकरे मेळाव्यात कसे? हा अनेकांना प्रश्न पडू शकतो.
निहाल ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे ज्येष्ठ बंधू दिवंगत बिंदूमाधव ठाकरे यांचे सुपुत्र. ते व्यवसायाने वकील आहेत. एकनाथ शिंदेंची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडणाऱ्या वकिलांच्या टीममध्येही ते आहेत. त्यामुळे त्यांची शिंदेंच्या मेळाव्यातील उपस्थिती आश्चर्यकारक मानली गेली नाही. तसेही त्यांचे दिवंगत पिता बिंदूमाधव हे राजकारणात सक्रिय नव्हते. ते व्यवसाय क्षेत्रात होते. व्हिडीओ कॅसेटच्या काळात त्यांनी समुद्रा व्हिडीओ नावाची कंपनीही चालवली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी माधवी या मातोश्रीबाहेर आपल्या मुलासोबत राहत आहेत.
तीन ठाकरेंचे राजकीय महत्व किती? हेही आपण समजून घेऊया.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आपल्याकडेच आहे, असे दाखवण्यासाठी शिंदे गटानं या तीन ठाकरेंना आपल्या मेळाव्यात स्थान दिलं. आवर्जून बोलवल्याचं सांगितलं जातं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणाच्यावेळीही बाळासाहेबांचा सेवक चंपा थापाला काही वेळ जवळ उभं केलं गेलं. पण यांच्यापैकी एकाचाही तसा थेट राजकीय प्रभाव नाही. ठाकरे आडनाव आहे, बाळासाहेबांच्या कुटुंबातील आहेत, त्यामुळे त्यांना महत्व असल्याने माध्यमांमध्ये ब्रेकिंग मिळवण्यात शिंदे गट यशस्वी ठरला असला, तरी या तिघांच्या मेळाव्यातील उपस्थितीमुळे बाळासाहेबांना मानणारा वर्ग शिंदेंकडे वळेल, असं नाही, असं जाणकारांचं मत आहे. कायद्याच्या क्षेत्रातील निहाल ठाकरेंनी भविष्यात राजकारणात थेट प्रवेश करून आपलं स्थान निर्माण करण्याची संधी आहे. पण सध्यातरी ठाकरे आपल्यासोबतही हे दाखवण्याच्या एकनाथ शिंदेंना संधी देण्यापलीकडे या तीन ठाकरेंचे फार वेगळे महत्व आहे, असे दिसत नाही.