मुक्तपीठ टीम
देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावल्यानंतर त्यातील एक आरोपी जान महंमद हा मुंबईतील धारावीचा असल्याचे समोर आले. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांना याबद्दल काहीच माहिती का नव्हते, असा आक्षेप घेतला गेला. महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी त्याबद्दल बाजू स्पष्ट केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जान महंमद अली महंमद शेखचे पाकिस्तानातील डी कंपनीशी संबंध आहेत. हा आरोपी पाकिस्तानातील डी कंपनीच्या संपर्कात असल्याचे वीस वर्षांपूर्वीचेही अनेक रेकॉर्ड आहेत. पण यावेळी केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून कटाची माहिती दिल्ली पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे त्यांनी कारवाई केली. जान महंमदबद्दल महाराष्ट्र एटीएसने दिल्ली पोलिसांना माहिती कळवली आहे.
महाराष्ट्र एटीएसचं काय म्हणणं?
- महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अगरवाल यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईतील अटक मुंबईतील आरोपीबद्दल माहिती उघड केली आहे.
- दिल्ली पोलिसांनी सहा लोकांना अटक केली आहे. त्यापैकी एक हा मुंबईच्या धारावीतला आहे.
- त्याचं नाव जान महंमद अली मोहम्मद शेख असं आहे.
- त्याचं पाकिस्तानातील डी कंपनीसोबत संबंध असल्याबद्दलचे अनेक रेकॉर्ड आहेत.
- जवळपास २० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड आहे.
- आमच्या नजरेत तो होताच.
- पण दहशतवाद्याच्या कटबाबतची माहिती आमच्याकडे नव्हती.
- ती सेंट्रल एजन्सीकडे होती.
- त्यांच्याकडून ती माहिती दिल्ली पोलिसांना दिली गेली होती.
जानचा मुंबई ते कोटा प्रवास
-
- जान महंमद शेखने ९ सप्टेंबरला जाण्याचं ठरवलं होतं.
- त्यानुसार त्याने १० तारखेला पैसे ट्रान्सफर केले. त्याचं तिकीट कन्फॉर्म होत नव्हतं.
- तर त्याने १३ तारखेचं वेटिंग लिस्ट सहामध्ये नाव नोंद करत गोल्डन टेम्पल एक्सप्रेस ट्रेनचं तिकीट मिळवलं.
- त्यानंतर संध्याकाळपर्यंत त्याचं तिकीट कन्फर्म झालं. तो मुंबई सेंट्रलहून एकटा दिल्लीतील निजामुद्दीनच्या दिशेला रवाना झाला.
- प्रवासादरम्यान तो राजस्थानातील कोटा येथे जेव्हा पोहोचला तेव्हा त्याला अटक करण्यात आलं. त्याच्याजवळ शस्त्र किंवा स्फोटकं मिळाली नाही.
- महाराष्ट्र एटीएसची एक टीम दिल्लीला जाणार आहे.
मुक्तपीठ भूमिका – तुळशीदास भोईटे
- दहशतवादी कटाबद्दल केंद्रीय यंत्रणाच पुरवतात माहिती
- देशात घडणाऱ्या दहशतवादी घातपाती कारवायांवर लक्ष ठेवण्याची खास जबाबदारी ही आयबी, रॉ, मिलिटरी इंटलिजन्स या केंद्रीय यंत्रणांवर असते.
- त्यातही आयबी ही जास्त महत्वाची भूमिका पार पाडते.
- त्यासाठी या यंत्रणा जगभरातील नेटवर्क तसेच इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्स वापरतात.
- जगभरातील मित्र देशांच्या एजेंसीही त्यांच्याकडे येणारे इनपुट हे या सेंट्रल एजेंसींला पुरवतात.
- त्यानंतर आवश्यकतेनुसार ते राज्य पोलिसांना पुरवले जाते.
- बहुतांश दहशतवादी प्रकरणांमध्ये कारवाई करणारे हात हे स्थानिक पोलिसांचे असले तरी माहिती देणारे डोके मात्र केंद्रीय यंत्रणांचेच असते.
- अनेकदा दिली गेलेली माहिती ही खूपच अस्पष्ट असल्याने नेमकं लक्ष्य कळत नसल्याने स्थानिक पोलिसांची कारवाई फसते किंवा घातपात घडवण्यात दहशतवादी यशस्वी होतात. अशावेळी खापर मात्र अस्पष्ट माहिती देणाऱ्यांवर न फुटता त्या-त्या राज्यातील स्थानिक पोलिसांवर फोडले जाते.
- पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन आलेल्या दहशतवादी प्रशिक्षणासाठीच जाऊच कसे शकले, असा प्रश्न केंद्र सरकारला विचारणे अपरिपक्वतेचे ठरेल तसेच मुंबईच्या धारावीतील आरोपी महाराष्ट्र किंवा मुंबई पोलिसांना कसा पकडता आला नाही, किंवा उत्तरप्रदेशातील आरोपी उत्तर प्रदेश पोलिसांना का पकडता आले नाहीत, असे विचारणेही अपरिपक्वतेचे ठरेल.