हेरंबकुलकर्णी
सदा डुंबरे गेले.
सदा यांच्यामुळे ‘साप्ताहिक सकाळ’ मध्ये अनेक रिपोर्ताज लिहिता आले. अनेक सामाजिक मुद्दे पुढे नेता आले हे त्यांचे माझ्यातील लेखकाला घडवणारे योगदान विसरता येत नाही. २००६ मध्ये मी आदिवासी भागातील २०० शाळांना भेटी देऊन त्या शाळेतील गुणवत्तेची भीषण स्थिती शिक्षणाची दैना यावर लोकसत्ता त २ लेख लिहीले (पुढे त्यावर ‘शाळा आहे शिक्षण नाही’ हे पुस्तक लिहिलं . शिक्षक समुदायात त्या पुस्तकाची तीव्र प्रतिक्रिया उमटली. काही ठिकाणी त्या पुस्तकाची होळी झाली.) त्यावर टीका झाली.या टीकेने मीही खूप हादरून गेलो होतो परंतु अशावेळी सदा डुंबरे यांनी मला ‘ तू बघितलेलं सगळं वास्तव लिहून काढ.. त्याची मी कव्हर स्टोरी करतो असे सांगितले व त्याच बरोबर केवळ प्रश्न न मांडता अनेक तज्ज्ञांशी बोलून उपाययोजनाही मांड असे सांगितले. मी अनेकांशी बोलून ती कव्हरस्टोरी केली व ती सदा यांनी शिक्षक समुदायात प्रचंड नाराजी असतानाही छापली कारण हे वास्तव पुढे येणे आवश्यक होते असे त्यांचे मत होते….
त्यानंतर ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या CEOप्राजक्ता लवंगारे यांनी १२० हंगामी वसतीगृह सुरु केले. अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी ट्रक मध्ये बसलेली मुले उतरवून घेतली व सांभाळली.. अतिशय ऐतिहासिक असा तो प्रयोग होता. हजारो विद्यार्थी आई-वडिलांसोबत न जाता थांबवून त्यांच्या शिक्षणाची गावकरी काळजी करत होते. सदा डुंबरे व संध्या टाकसाळे यांना हा विषय मी सांगितला. त्यांनी त्याची कव्हर स्टोरी करू असे सांगितले व माझ्याकडून अनेक ठिकाणी भेटी देऊन लिहिलेला वृत्तांत फोटोसह छापला. ग्रामीण भागातील घडणारी घटना राज्यस्तरावर त्यांनी नेली. त्यानंतर अनेक सामाजिक विषय त्यांना सांगायचे व त्यांनी ते छापायचे यातून लेखक म्हणून आत्मविश्वास वाढला
जिनन नावाच्या केरळमधल्या कलावंताला मी केरळमध्ये भेटलो. त्याच्यासोबत दहा तास वेळ घालवला व त्याच्या अफलातून जगण्याविषयी दीर्घ लेख लिहून सदा डुंबरे यांना पाठवला स्विकारणे किंवा नाकारणे इतकीच संपादकीय भूमिका अनेक ठिकाणी असते परंतु सदा डुंबरे यांनी मला फोन करून तू जो विषय निवडला आहे तो अफलातून आहे परंतु ते व्यक्तिचित्र उतरत नाही हे सांगून ते थाम्बले नाही तर तेव्हा त्यांनी शोभा भागवत यांनी अरविंद गुप्ता यांचे लिहिलेले व्यक्तिचित्र झेरॉक्स करून मला वाचायला पाठवले आणि हे वाचून लिही असे सांगितले.. मी पुन्हा प्रयत्न केला तरीही ते त्यांच्या पसंतीला उतरले नाही.. तो लेख छापला गेला नाही पण एखादा लेखक घडवण्यासाठी स्वतः झेरॉक्स लेख वाचायला पाठवून प्रोत्साहन देणे तेही माझ्या सारख्या ग्रामीण भागात राहणाऱ्या एका अप्रसिद्ध लेखकाला यातून लेखक घडवण्याची तळमळ दिसते हे मला विसरता येत नाही.. आपण लेखक म्हणून वाचकांसमोर येतो परंतु त्यामागे अनेक संपादकांची प्रेरणा आणि प्रेम असते हे आज सदा यांना आठवताना आठवते
‘साप्ताहिक सकाळ’ ने त्याच्या दिवाळी अंकातून अनेक लेखक पुढे आणले व सर्वात महत्त्वाचे दिवाळी अंकांची परंपरा अधिक गंभीर केली। अनिल अवचट यांचे काही रिपोर्ताज साप्ताहिक सकाळ मधून आले आहेत. त्याच प्रमाणे अनेक महत्वाचे प्रश्न सविस्तरपणे मांडण्याची सवय वाचकांना आणि लेखकांना त्यांनी लावली. शब्द संख्येची भीती काढून तो विषय सविस्तर पणे पोहोचवण्यासाठी रिपोर्ट शैलीला महत्त्व मिळवून देणे हे सदा डुंबरे यांचे मराठी साहित्य व सामाजिक प्रश्नांना महत्वाचे योगदान राहील..चळवळीचे आणि कार्यकर्त्यांचे पाठीराखे आणि माझ्यासारख्या ग्रामीण नव्या लेखकांना प्रोत्साहन देणारे संपादक म्हणून ते लक्षात राहतील