मुक्तपीठ टीम
पतंजलीच्या कोरोनावरील औषधावरुन मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनावरील औषधाचे लॉन्चिंग करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि नितीन गडकरी यांनी उपस्थिती लावली होती. तसेच या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमाणपत्र मिळाल्याचेही म्हटले जात होते. मात्र, डब्लूएचओने आपण अशा कोणत्याही आयुर्वेदीक औषधाची तपासणी केलेली नाही आणि कोणते प्रमाणपत्र ही दिलेले नाही, असे स्पष्ट केले आहे. ‘पतंजलीचे औषध कोरोनापासून संरक्षण करत असेल तर मग कोरोना लसीकरणावर ३५ हजार कोटी रुपयांचा खर्च कशासाठी’ असा प्रश्न विचारण्यात आला आहे. तसेच “आरोग्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमात जाऊन डॉक्टरांशी संबंधित आचारसंहितेचा भंग केला आहे, असे एका स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे.
“भारताचे आरोग्यमंत्री म्हणून अशाप्रकारे खोटे सांगणे किती योग्य आहे. अशाप्रकारच्या अवैज्ञानिक औषधाचे लान्चिंग करणे कितपत बरोबर आहे. आरोग्यमंत्री स्वतः एक डॉक्टर आहेत तरीही ते अशाप्रकारच्या औषधाला प्रोत्साहन देत आहेत हे किती नैतिक आहे. हे औषध म्हणजे लोकांची फसवणूक असून पतंजलीचा दावा थेट जागतिक आरोग्य संघटनेने नाकारल्याने देशाचीही जागतिक पातळीवर नाचक्की झाली आहे”, असे आयएमएने म्हटले आहे.
आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष जॉनरोस ऑस्टिन जयलाल यांनी प्रश्न विचारला की, “आम्ही विचारतो आहोत, आरोग्य मंत्री तेथे का गेले?” याचवेळी संस्थेचे सरचिटणीस जयेश लेले यांनी विचारले की, “आम्ही कोरोना साथीच्या मध्यावर आहोत. जर लोकांनी हा कार्यक्रम मंत्र्यांसमवेत टीव्हीवर पाहीला आणि औषधे खरेदी करतील तर काय?” तसेच डब्ल्यूएचओ आणि खासदारांचे नाव ज्याप्रमाणे बॅनरवर झळकवले गेले होते. त्यातून डब्ल्यूएचओने त्यांच्या औषधाला प्रमाणित केले आहे अशी खोटी धारणा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, असेही जयलाल आणि लेले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, १९ फेब्रुवारीला नवी दिल्ली मध्ये रामदेव बाबांनी कोरोनाच्या उपचारांसाठी कथित औषध कोरोनिलसंबंधित एक पत्रकारपरिषद बोलवली होती. त्यावेळी त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांनी औषधासंबंधित काही कागदपत्रही प्रसिद्ध केले. हे औषध १५८ देशांमध्ये पाठविण्यास तयार आहे, असे म्हटले होते.
वादानंतर पतंजलीचे स्पष्टीकरण
कोरोनीलवरुन झालेला वाद वाढताना पाहून पतंजलीने यावर स्पष्टीकरण दिले. पतंजलीचे आचार्य बालक्रिष्ण म्हणाले, “आम्ही काही गोष्टी स्पष्ट करु इच्छितो. आमच्या औषधाला मिळालेले प्रमाणपत्र जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले नाही. हे प्रमाणपत्र भारत सरकारच्या विभागाने दिलं आहे. डब्ल्यूएचओने आमच्या औषधाला मंजूरी दिलेली नाही किंवा नाकारलेलं देखील नाही”.
हमें यह बताते हुए अपार हर्ष एवं गर्व है कि कोरोनिल को WHO GMP के गुणवत्ता अनुमोदन के अनुरूप, DCGI द्वारा CoPP लाइसेंस प्रदान किया गया है @moayush @nitin_gadkari @MoHFW_INDIA @ani_digital @yogrishiramdev @vaidyakotecha @drharshvardhan pic.twitter.com/aDiaojfeRp
— Acharya Balkrishna (@Ach_Balkrishna) February 19, 2021