Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

“जमिनीचा तो तुकडा भरतो आहे हळूहळू थडग्यांनी, उद्या कदाचित भरेल हे शहर आणि परवा सगळा देशही.”

March 4, 2022
in घडलं-बिघडलं, व्हा अभिव्यक्त!
0
ukraine

हरीश येरणे, नागपूर

दोन देशांच्या बाबतीत युद्धाची अपरिहार्यता याशिवाय दुर्दैवी बाब असूच शकणार नाही. युक्रेन आणि रशियाने युद्ध छेडलंय. कासावीस होऊन जग उभा तमाशा बघतोय. जगातली दुसरी महासत्ता म्हणून नावरूप असलेला रशिया छोट्याश्या युक्रेनला बेचिराख करायला निघालाय. मित्रांनी साथ सोडल्याचा आरोप करीत एकाकी पडलेल्या युक्रेनला स्वार्थी अमेरिका आणि युरोपियन देश आता उसने अवसान आणून मदत करायला निघाले आहेत. युक्रेन-रशिया वादाची कारणे वेगवेगळी असली तरी सरळ युद्ध करून विवाद संपवता येईल या निष्कर्षावर रशिया पोहचला आहे. स्वाभिमान दुखावलेला युक्रेनसुद्धा “प्रतिकार करण्यासाठी प्रतिबद्ध आहे” असल्या फिल्मी स्टाईलने प्रत्युत्तर देण्याचे धाडस करतोय. जगातली बहुतेक राष्ट्रे आता रशिया आणि पुतीनला खलनायकाच्या वरचष्म्यातून बघत आहे. पण युक्रेनसुद्धा काकणभरही कमी असेल तर शप्पथ. आपली जिद्द कायम ठेऊन चर्चेने विवाद सोडविण्याऐवजी सहानुभूती घेऊन युद्धाला तोंड देणारा युक्रेनही नायक नाहीच.

 

 

डोनेतस्क आणि लुहान्सक हे युक्रेनच्या पूर्वेकडील प्रांत रशियनबहुल आहेत. येथील सरकारेसुद्धा रशियाच्या राजकीय विचारधारेशी संलग्न होती. परिणामी रशियाच्या प्रभावाने दोन्ही प्रांतांनी स्वतःला युक्रेनपासून स्वतंत्र घोषित केल्यावर त्यांच्या विनंतीनुसार रशियन सैन्य पाठवून आक्रमण करण्यात आले. मुळात युद्धाची सुरुवातच इथून झालेली आहे. युक्रेनला नाटोचे ( North Atlantic Treaty Organization ) सदस्यत्व हवे आहे, पण रशियाला हे पसंत नाही. अमेरिकेचे वर्चस्व असलेली पण जास्तीत जास्त युरोपियन देश असलेली संघटना म्हणजे नाटो. संघटनेची उद्दिष्टे उदारमतवादी असली तरी रशियाला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठीच याची मदत होईल असे अमेरिकेला वाटते. युक्रेनला नाटोमध्ये सहभागी करून घेतल्यास रशियाच्या सीमेवर संघटनेचे लष्करी तळ उभारून रशियाला घेरता येणार आहे. रशिया हा जगातील दुसरा सर्वात मोठा नैसर्गिक वायू आणि तेलाचा उत्पादक देश. फ्रान्स, जर्मनी सोबत युरोपातील इतर देशांना ‘नॉर्ड स्ट्रीम २’ या पाईपलाईन द्वारे वायू आणि तेलाचा पुरवठा करता येणार होता. पण ही पाईपलाईन रोखून धरून रशियाची आर्थिक गळचेपी करण्याचा मानस अमेरिका आणि मित्र राष्ट्रांचा असू शकतो. या दोन्ही कारणास्तव स्वतःचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी रशिया कुणालाही न जुमानता युक्रेनशी दोन हात करीत आहे.

 

 

आता रशिया अधिकच आक्रमक होऊन युक्रेनच्या राजधानीपर्यंत पोहचलाय. रशियन फौजांनी चेर्नोबिल अनुप्रकल्प ताब्यात घेतलेला आहे. खारकीव शहरातील गॅस पाईपलाईनमध्ये बॉम्बचा स्फोट करण्यात आला. अनेक इमारती जमीनदोस्त होत आहेत. युक्रेनमधील नागरिक शेजारी देशांत स्थलांतर करीत आहेत. हे सर्व घडत असताना युक्रेनची मित्रराष्ट्रे मात्र आतापर्यंत बघ्याच्या भूमिकेत होती. अमेरिका आणि युरोपियन प्रगत राष्ट्रांनी यात सहभाग घेतलेला नाही. पण समोरची परिस्थिती बघता रशियाशी थेट लष्करी संघर्ष करण्याची वेळ आल्यास तिसरे महायुद्ध अटळ असेल यात शंका नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील शक्ती संतुलनात बरेच बदल झाले होते. पराभवानंतर जर्मनी, इटली, जपान महान शक्तीच्या श्रेणीतून बाहेर पडले. सततच्या युद्धामुळे फ्रान्स, इंग्लंड सुद्धा अधिकच कमकुवत झाले. मात्र चलाखीने अर्थकारण करून अमेरिका मात्र महासत्ता म्हणून उदयास आली. तोडीस तोड देणारी दुसरी महासत्ता फक्त सोव्हिएत युनियन म्हणजे आताची रशिया हीच होती. या दोन महासत्तांचे अनेक वर्षे चाललेले शीतयुद्ध आता पुन्हा एकदा उभारी घेऊ पाहत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकीय सामर्थ्य दाखवणे व अधिक प्रमाणात अर्थार्जन करणे या लालसेपोटी सद्ययुगात अमेरिका, चीन आणि रशिया हे स्वतःला प्रगत म्हणवून घेणारे देश संपूर्ण जगाचा नायनाट करायला निघालेले आहेत. क्षेत्रविस्तार आणि आर्थिक फायद्यासाठी हे देश एकमेकांच्या विरोधात कुरघोडी करण्यास मागेपुढे सुद्धा बघत नाहीत. युक्रेन हा शह-मातच्या या खेळातील प्यादाच ठरावा. अप्रत्यक्षरित्या खरे युद्ध अमेरिका, मित्र राष्ट्र विरुद्ध रशिया, चीन असेच आहे. जर यांस प्रत्यक्ष स्वरूप लाभले तर मात्र विध्वंसाशिवाय जगाच्या हाती काहीएक लागणार नाही. “आम्हीच महासत्ता आहोत” हा फुकाचा आव आणून ते फालतूपद भोगण्यासाठी माणुसकी आणि मानवाधिकाराला काळिमा फासण्याचे काळेधंदे या राष्ट्रांकडून सुरू आहेत.

 

 

मूठभर व्हिएतनामला युद्धात हरणाऱ्या महासत्ताधीश अमेरिकेने आताच काही महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानला विनाशाच्या गर्तेत लोटले होते. संपूर्ण जगावर कोरोनारुपी जैविक आक्रमण करणाऱ्या चीनने आपला हेतू साध्य करून घेतलाय. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तान तालिबानला फुकट पोसण्यामागे कोणता उद्देश असू शकतो ? आता रशियासुद्धा आपल्या विस्तारवादी धोरणाचे पाय बाहेर काढून महासत्तेची वाट चालू लागलाय. रशियाला डीवचणारी आणि युक्रेनवर युद्ध थोपवणारी अमेरिकाच होती हे कधीतरी खरे ठरेलच. पण या युद्धात सर्वस्व गमावणाऱ्यांचं काय ? देशादेशांतील कलहावर फक्त चर्चा घडवून आणणारी यु.एन.ओ. (United Nation’s Organization) संघर्ष कधीच मिटवू शकणार नाही का ? एकविसाव्या शतकाच्या मध्यबिंदूला स्पर्श करू पाहणारे हे जग, आपल्या पुढच्या पिढीला मानवी संस्कृतीची समृद्ध जडणघडण देण्याऐवजी आपल्या उत्कर्षाची राष्ट्राराष्ट्रांतील कटुता वारसा म्हणून देत आहे. महासागरातील वाढत जाणारी पाण्याची पातळी, घटलेल्या शेतजमिनी, परिणामी अन्नधान्याची कमतरता, इंधनाची कमतरता, वाढते प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग, धार्मिक कट्टरतावाद या प्रश्नांवर उपाय शोधण्याऐवजी आपसांत युद्ध करून पृथ्वीचं ‘टेन्शन’ अधिक वाढविल्या जात आहे. युद्धामूळे फक्त सहभागी देशांचेच नुकसान होईल असे मुळीच नाही. या युद्धाचा प्रभाव सर्व जनमानसांवर, देशांच्या अर्थव्यवस्थेवर आणि राहणीमानावर वर्षानुवर्षे पडत राहील.

 

 

महासत्ता बनण्याच्या नादात एका रात्रीत बेचिराख झालेला जपान आजही युद्धाने मिळालेले घाव गोजारत असेल. माणुसकी सोडून कट्टरतेलाच धर्म मानणारे सीरिया, अफगाणिस्तान, इराक, पाकिस्तान या देशातील नागरिकांची स्थिती कशी आहे  हे जाणून घेतल्यास युद्धाच्या झळा कशा असतात याचा उलगडा होईल. आधीच दोन महायुद्धामुळे उध्वस्त झालेलं अर्धेअधिक जग पुन्हा एकदा या युक्रेन प्रकरणाने दोन ध्रुवात विभागला जाईल ही चिंता आहे. ‘माझा देश’ ही भावना अभिमानाचीच, त्यासाठी प्राणही त्यागायची तयारी असणे ही त्या राष्ट्राची खरी ताकद. पण राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी थोपवल्या गेलेल्या युद्धात राष्ट्राध्यक्षाचे नाही तर सामान्य सैनिक, नागरिक आणि निर्वासितांचे प्राण जात असतात. वीतभर पोट भरण्यासाठी आणि मूठभर आनंद उपभोगण्यासाठी जगत असलेल्या मनुष्याचे जीवन युद्धाने कायमचे उध्वस्त होत असते. आजची परिस्थिती बघता प्रेम, सहिष्णुता, सलोखा या संकल्पना निव्वळ खोट्या ठराव्यात. आपल्या देशाचा नकाशा, भूभाग बदलू नये. त्यावरील नद्या, पर्वत, जंगले आणि प्राणीपक्षी तशीच शाबूत राहावीत या प्रयत्नांत सैनिक आणि माणसे संपत आहेत. शत्रू राष्ट्राची विमाने पाडली, त्यांचे शेकडो सैनिक मारले, त्यांना धडा शिकवला या गोष्टींना कुठला अर्थ असावा ? माणसं तिकडेही तशीच जशी इकडे आहेत. जगण्याचा अधिकार देताना निसर्गाने कुठलीही अट घातलेली नाही. अंतराळातलं माहिती नाही, पण पृथ्वीवर जन्माला आलेल्या मानव प्राण्याला विचार करायला डोकं मिळालं, प्रेम करायला मन दिलं, वाटून घ्यायला भावना दिल्या, मग हे युद्ध कशाला ?

 

 

काश्मीर आणि कारगिल घडवणाऱ्या पाकिस्तानातही शोककळा पसरली होती. युद्धामुळे काय प्राप्त होते? प्रश्न सहजच विचारून बघा एकदा स्वतःला. बॉम्बच्या वर्षावात बेचिराख झालेल्या इमारती, जळत असलेली घराची छपरे, बंदुकीच्या गोळ्यांनी भिंतीला पडलेली भोके, रणगाड्यांचे नकोसे असलेले कर्णकर्कश आवाज, अस्ताव्यस्त पडलेल्या सैनिकांचे शव, लुळ्यापांगळ्या – शरीराचा एखादा अवयव गमावलेल्या मनुष्याचा आकांत, सर्वस्व हारलेल्या सीमावर्ती गावातील नागरिकांचे काळवंडलेले चेहरे, विनाशाची साक्ष देत वरपर्यंत उडालेला काळा धूर, निर्जन रस्ते आणि सर्वत्र पसरलेली शोककळा. हवं तर इतिहासाची पाने पुन्हा एकदा चाळून बघावीत. आजतागायत लढल्या गेलेल्या कोणत्याही युद्धाने मानवाचे कल्याण झालेले नाही. धर्मयुद्ध म्हणून महाभारत घडलं पण गांधारीला शेवटी शंभर पोरांच्या कलेवरलाच कवटाळावं लागलं होतं. युद्ध जिंकूनही पांडवांनी काहीच कमावलं नाही. हिंसा आणि द्वेषाच्या भरवशावर जग जिंकायला निघालेल्या सिकंदाराला रिकाम्या हातानेच जावं लागलं. कलिंगचा संहार करणाऱ्या सम्राट अशोकालाही शेवटी पश्चात्ताप करावा लागला. दशकांपासून विस्कटलेली काश्मीरची घडी अजूनही बसलेली नाही.

 

 

स्वतःच्या सामर्थ्याची जाण करून देण्यासाठी सत्ताधीश युद्ध पुकारतात. सैनिक, शरणार्थी आणि नागरिकांची घरे मात्र भयकंपाने खचून जातात. देशाभिमान आणि कर्तव्याच्या ओझ्याखाली कुठेतरी स्वातंत्र्य हरवले जाते. युध्दाशिवाय दुसरा पर्याय नसतोच का ? मुळात युद्धाची वेळच का यावी ? प्रेम आणि सदभावना माणसाला नव्याने शिकण्याची गरज निर्माण झाली आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरून संरक्षणासाठी अनेक आयुधे मानवाने निर्माण केली, ती शस्त्रे टाकून माणुसकी, करुणा आणि सलोख्यालाच शस्त्रे बनवावी लागणार आहेत. नुसतीच दृष्टी बदलून चालणार नाही, दृष्टीकोन सुद्धा बदलायला हवा. अन्यथा जे जग आपण बघतोय ते बघायला पुढची पिढी जन्माला येणार नाही. जाता जाता ‘नीरजा’ यांच्या शब्दात,

 

 

“श्वास घेणं कठीण होतं माणसांना तेव्हा फुंकाव लागतं रणशिंग, काळ्या मातीला तगून राहण्यासाठी नांगराव लागतं स्वतःलाच. पाऊस पडल्यावर कदाचित दूर होतील काजळी चढलेले ढग आणि होईल स्वच्छ हवा, माणसं घेतील श्वास खुल्या आकाशात. असा दिवस उगवू शकतो का युद्धाच्या ढगा आडून ?”

 

युद्ध संपण्याची वाट बघतोय मी.


Tags: RussiaRussia-Ukraine WarUkraineयुक्रेनरशियारशिया-युक्रेन युद्ध
Previous Post

युद्धावर पडलं प्रेम भारी…रशियन प्रियकर – युक्रेनियन प्रेयसी सीमा ओलांडून हंगेरीत!

Next Post

कूपरेज बँडस्टँड येथे रंगणार एनसीपीए अॅट दी पार्क संगीत व कला महोत्सव

Next Post
NCPA at the park

कूपरेज बँडस्टँड येथे रंगणार एनसीपीए अॅट दी पार्क संगीत व कला महोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!