मुक्तपीठ टीम
जिद्द, परिश्रम आणि प्रामाणिकपणा असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. अशी अनेक उदाहरणे आपल्या देशात आणि जगात वेळोवेळी पाहायला मिळतात. सर्व प्रकारच्या समस्या असूनही, काही लोक त्यांची स्वप्ने सत्यात उतरवतात. अशीच एक गोष्ट बिहारच्या जमुई जिल्ह्यातून देशभर व्हायरल होत आहे. अवघ्या दहा वर्षांची दिव्यांग विद्यार्थिनी सीमा ही सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली आहे. तसेच आता मदतीचे हातही पुढे सरसावत आहेत.
सीमाला दोन वर्षांपूर्वी रस्ता अपघातात एक पाय गमवावा लागला होता. ट्रॅक्टरची धडक बसल्याने तिच्या एका पायाला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयात डॉक्टरांना तिचा पाय कापावा लागला. मात्र, ही घटना सीमाने आपली कमजोरी बनू दिली नाही. इतर मुलांना शाळेत जाताना पाहून सीमानेही त्यासाठी हट्ट केला. यानंतर सीमाच्या पालकांनी तिचे नाव शाळेत नोंदवले. पाय नसतानाही सीमा शाळेत जाते आणि मेहनतीने अभ्यास करते. मोठी झाल्यावर शिक्षिका होण्याचे सीमाचे स्वप्न आहे. तिला अभ्यास आणि लेखनात सक्षम व्हायचे आहे जेणेकरून ती कुटुंबाला मदत करू शकेल.
दहा वर्षांच्या सीमाचा खडतर प्रवास
- आपल्या उत्साहामुळे लोकांमध्ये चर्चेचा विषय बनलेली सीमा जमुई जिल्ह्यातील फतेहपूर गावातील सरकारी शाळेत शिकते.
- १० वर्षांची सीमा ही चौथीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी आहे.
- तिच्या कुटुंबांमध्ये तिचे आई-वडील दोघेही अशिक्षित आहेत.
- सीमाचे वडील खीरण मांझी, जे महादलित वर्गातून येतात, बाहेर मजूर म्हणून काम करतात, तर आई बेबी देवी वीटभट्टीवर काम करते.
- सीमाला पाय नसतानाही ती घर ते शाळेपर्यंत दररोज ५०० मीटर पायी प्रवास करते.
- रस्ता नसतानाही ती फूटपाथच्या सहाय्याने शाळेत पोहोचते. कोणावरही ओझे न बनता ती तिची सर्व कामे स्वतः पूर्ण करते.
सीमाला जिल्हा प्रशासनाकडून ट्रायसायकल भेट
- जिल्हा दंडाधिकारी अवनीश कुमार यांनी सीमाला एक ट्रायसिकल भेट केली आहे.
- जिल्हा दंडाधिकारी, जमुईचे पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकारी सीमाच्या घरी पोहोचले आणि तिला ट्रायसायकल दिली.
- सीमा ज्या शाळेत शिकते ती शाळा महिनाभरात स्मार्ट बनवण्याचे आश्वासनही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
प्रोस्थेटिक लेग इम्प्लांट लवकरच करण्यात येणार
आयपीएस अधिकारी सुकृती माधव मिश्रा यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. मिश्रा या उत्तर प्रदेश कॅडरच्या २०१५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी लिहिले की, “सीमाला ट्रायसायकल मिळाली आहे. कृत्रिम पायाचेही माप घेण्यात आले आहे. स्वप्नांच्या उड्डाणाला मर्यादा नसावी. सीमाच्या सायकल आणि कृत्रिम अवयवाबाबत चर्चा सुरू आहे. प्रोस्थेटिक लेग इम्प्लांट देखील लवकरच केले जाईल.”
शिक्षकांकडून भरभरून सीमाचे कौतुक
- सीमाचे शाळेतील शिक्षक तिच्या जिद्दीचे कौतुक करतात.
- ते सांगतात की, सीमा अपंग असूनही पायवाटेवरून फक्त एक पाय ठेवून शाळेत येते. ती तिची सगळी कामं आणि शाळेचा गृहपाठही वेळेवर करते.
- सीमाची आई सांगते की, सीमासाठी वह्या, पुस्तकं विकत घेण्याइतके पैसे त्यांच्याकडे नाहीत.
- सीमाचे धाडस पाहून हे सर्व शाळेतील शिक्षकांनी दिले आहे. प्रत्येकाला सीमाचा अभिमान आहे आणि ती नाव उज्वल करेल असा विश्वास आहे.