मुक्तपीठ टीम
जागतिक अन्न प्रक्रिया उद्योगासाठी पसंतीचा सोर्सिंग भागीदार बनण्याचा भारताचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी दुबईतील एक्स्पो २०२०च्या माध्यमही उपयोगात आणले जात आहे. दुबईतील या प्रदर्शनात त्यासाठी चर्चासत्र, प्रदर्शनं यामाध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. खास बाब म्हणजे दुबई एक्स्पोत भारत सरकार बाजरी खाद्य महोत्सव आयोजित करणार आहे.
भरड धान्य या मुख्य संकल्पनेचा एक भाग म्हणून – ‘या पंधरवड्यामध्ये बाजरी खाद्य महोत्सव , मिलेट्स बुकचे उदघाटन आणि त्याचे आरोग्य आणि पौष्टिक फायदे यावर केंद्रित विविध चर्चासत्रे पहायला मिळतील. २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ म्हणून घोषित करण्याबाबत भारताने पुरस्कृत केलेला आणि ७० हून अधिक देशांचे समर्थन लाभलेला प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या आम सभेने अलीकडेच मंजूर केला आहे.
कृषी हे त्याच्या संलग्न क्षेत्रांसह देशातील सर्वात मोठे उपजीविका प्रदान करणारे क्षेत्र आहे. एकूण सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) या क्षेत्राचे योगदान सुमारे २१% आहे. आर्थिक वर्ष २१ मध्ये कृषी आणि संबंधित उत्पादनांची एकूण निर्यात ४१.२५ अब्ज डॉलर्स इतकी झाली असून, भारत हा जगातील कृषी उत्पादनांच्या १५ प्रमुख निर्यातदारांपैकी एक आहे.
या क्षेत्राच्या दुर्लक्षित क्षमतेचा उपयोग करण्यासाठी, सरकारने अन्न उत्पादने आणि खाद्य पदार्थांच्या ई-कॉमर्सच्या विपणनामध्ये स्वयंचलित मार्गाने १००% थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेंतर्गत अन्न प्रक्रिया क्षेत्रासाठी १०,९०० कोटी रुपये ( १,४८४ दशलक्ष डॉलर्स ) प्रोत्साहनपर खर्च देखील मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय, भारताची कृषी निर्यात २०२१-२२ पर्यंत ६० अब्ज डॉलर्स आणि पुढील काही वर्षात १०० अब्ज डॉलर्स पर्यंत वाढवण्यासाठी सर्वसमावेशक कृषी निर्यात धोरण लागू करण्यात आले आहे.
हे क्षेत्र सिंचन सुविधा, गोदाम आणि शीतगृह साखळी सारख्या कृषी पायाभूत सुविधांमध्ये वाढीव गुंतवणुकीसाठी सज्ज असून जागतिक खप महामारीपूर्व पातळीपर्यंत पोहोचला आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. अभिलाक्ष लेखी यांनी १७ फेब्रुवारी २०२२ रोजी एक्स्पो २०२० दुबई येथील इंडिया पॅव्हेलियनमध्ये ‘अन्न, कृषी आणि उपजीविका’ पंधरवड्याचे उद्घाटन केले. हा पंधरवडा अन्न प्रक्रिया, फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय आणि सेंद्रिय शेती यांसारख्या क्षेत्रातील भारताचे सामर्थ्य आणि यातील गुंतवणुकीच्या अफाट संधी दाखवून देईल.
भारताचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही १७ फेब्रुवारी २०२२ रोजी दुबई मधील एक्स्पो २०२० मध्ये इंडिया पॅव्हेलियनमध्ये ‘अन्न, कृषी आणि उपजीविका’ पंधरवड्याचे उद्घाटन केले. या पंधरवडा आयोजनाच्या विविध सत्रांमध्ये देशातील अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी देखील सहभागी होणार आहेत. ‘अन्न, शेती आणि उपजीविका’ पंधरवड्याचा २ मार्च रोजी समारोप होणार आहे.