-
डॉ. संजय शाह
-
डॉ. प्रदीप शाह
डोकेदुखी किंवा घसा खवखवणे किंवा अपचन अशा आजारांसंदर्भात तुम्ही निदानासाठी किती वेळा इंटरनेटचा आधार घेतला आहे? आजाराचे पहिले लक्षण दिसताच तुम्हाला इंटरनेटवर शोध घेण्याची सवय आहे का? असे करत असाल तर तुम्ही स्वत:ला धोक्यामध्ये टाकत आहात.
डिजिटल क्रांतीने आपल्या जीवनाचे अनेक पैलू, विशेषत: आपण आरोग्य-संबंधित घेत असलेल्या माहितीच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणला आहे. अशी माहिती सुलभपणे व मोफत उपलब्ध होते. यापूर्वी १० पैकी १ रूग्ण इंटरनेटवरून आरोग्यसंबंधित माहिती शोधत होता, पण आज या आकडेवारीमध्ये बदल झाला आहे. १० पैकी ९ रूग्ण डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी ऑनलाइन आरोग्यविषयक माहिती शोधत आहेत. अनेकांचा विश्वास आहे की, इंटरनेटवर त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांसाठी सर्व उत्तरे आहेत. खरोखर विचित्र! पण, लोक अशाप्रकारेच आरोग्यविषयक उपाय किंवा निदानासाठी वेब विश्वाचा आधार घेत आहेत.
धोकादायक विषयांवर सर्च
गतवर्षात भारतीयांनी कशाप्रकारे वेब सर्फ केले यासंदर्भात नुकतेच सादर करण्यात आलेल्या गुगल ट्रेण्ड अहवालामधून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. गुगल ट्रेण्ड्सच्या मते, यासंदर्भात भारतामध्ये इंटरनेटमध्ये सर्वाधिक सर्चेस् करण्यात आली.
- ”घरी कोरोनाविषाणू लस कशाप्रकारे बनवावी?
- कोविडविरोधात रोगप्रतिकार शक्ती कशाप्रकारे वाढवावी?”
- यानंतर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सेवन करावयाचे खाद्यपदार्थ,
- प्लाझ्मा थेरपी,
- कोविड लक्षणे,
- कोविडसाठी घरगुती उपाय इत्यादींसदर्भातील प्रश्नांचा इंटरनेटवर शोध घेण्यात आला.
यामधून निदर्शनास आले की, लोक स्वत:हून उपचार करण्याला आणि स्वयं-निदानाप्रती इच्छुक आहेत. पण हे योग्य आहे का?
इंटरनेटवरील आरोग्यविषयक सर्चमुळे होणारा धोका
- तुम्ही स्वत:चे चुकीचे निदान करू शकतात, वेगळेच निदान करू शकता किंवा निदानच होणार नाही:
- बहुतेकवेळा इंटरनेटवरील स्वयं-निदानामुळे काहीतरी धोकादायक होऊ शकते. यामुळे चुकीचे निदान होऊ शकते किंवा वेगळेच निदान होऊ शकते.
- उदाहरणार्थ, तुम्ही ‘डोकेदुखी’बाबत सर्च केले, तर तुम्हाला डोकेदुखीबाबत जवळपास २० वेगवेगळे उपाय मिळू शकतात आणि प्रत्येक उपाय दुस-यापेक्षा भितीदायक असेल.
- तुमची डोकेदुखी कदाचित कमी असेल पण, इंटरनेट सर्चमधून कर्करोगग्रस्त गाठी किंवा काही इतर न्यूरोलॉजिकल समस्या असल्याची चिन्हे सापडण्याची शक्यता आहे.
- यामुळे तुम्ही घाबरून जाऊन उच्च तणाव निर्माण होऊ शकतो.
- तसेच स्वत:हून केलेल्या निदानामध्ये फार्माकोलॉजिकल धोक्यांचा समावेश असतो, ज्यामधून विविध प्रतिकूल प्रतिक्रिया दिसून येऊ शकतात.
- कधी-कधी निदान होणारच नाही, ज्यामुळे जीवनाच्या दर्जावर दीर्घकाळपर्यंत परिणाम घडून येऊ शकतो किंवा स्थिती अधिक बिकट होत मृत्यू होऊ शकतो.
- वैद्यकीय लक्षणांसंदर्भात अधिक सर्चमुळे होणारा साबारकोन्ड्रायक: सायबरकोन्ड्रीया म्हणजे व्यक्तीला त्याच्या आरोग्याबाबत असलेली चिंता, जी वैद्यकीय माहितीच्या शोधसाठी इंटरनेटचा अधिक प्रमाणात वापर केल्यामुळे निर्माण होते.
- २००० च्या सुरूवातीला एका ब्रिटीश वर्तमानपत्राने या संज्ञेला हायपोकोन्ड्रिया असे नाव दिले. हायपोकोन्ड्रियाप्रमाणेच सायबरकोन्ड्रियामध्ये आरोग्याबाबत अधिक चिंतेचा समावेश आहे.
- तज्ञांच्या मते अलिकडील काळामध्ये सायबरकोन्ड्रिया झपाट्याने वाढत असलेली समस्या बनत आहे. लोक इंटरनेटवर त्यांचे आरोग्य व स्वास्थ्याबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
- सायबरकोन्ड्रियाने पीडित लोक गंभीर आजाराची चिन्हे म्हणून शरीरामधील सामान्य बदल आणि कमी शारीरिक लक्षणांबाबत चुकीचा अर्थ घेतात.
- आरोग्याबाबत चिंता असलेल्या अनेक लोकांच्या मनात भिती इतकी वाढू शकते की त्याचा परिणाम काम व नात्यांवर दिसून येतो.
वैद्यकीय व्यावसायिकाकडून मदत घेणे हाच योग्य मार्ग: अनेक वेळा लक्षणे व वैद्यकीय स्थितीबाबत अनेक शंका असलेले रूग्ण पाहायला मिळतात. काही रूग्ण इंटरनेटचा वापर करत त्यांना झालेल्या आजाराबाबतच निदान करतात. काहीजण प्रयोगशाळा अहवाल व वैद्यकीय चौकशी, तसेच ऑनलाइन शोध घेतल्याच्या परिणामांचा आधार घेऊन येतात. अर्थातच आपण त्यांना सक्षम रूग्ण म्हणतो, पण अनेकवेळा हे लोक डॉक्टरांनी दिलेल्या आरोग्यविषयक सल्ल्यावर कमी विश्वास दाखवतात. आपण समजून घेतले पाहिजे की, कोणतेही तंत्रज्ञान किंवा इंटरनेट सर्च व्यावसायिक वैद्यकीय सहाय्यतेची जागा घेऊ शकत नाही. असे करत तुम्ही स्वत:ला चिंता व अयोग्य निदानाच्या प्रतिकूल धोक्यामध्ये टाकत आहात आणि यामुळे आरोग्याची काळजी घेण्यावर अधिक खर्च होईल.
‘सर्च इट’चा योग्य मार्ग
- आरोग्यासंबंधित माहिती मिळवण्यासाठी सर्च इंजिन्सचा वापर करणे चुकीचे नाही, पण माहिती स्रोतची तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- या वेबसाइट्स व अॅप्सवरील माहिती बारकाईने पाहिली पाहिजे.
- त्यांना तुमचा वैद्यकीय इतिहास किंवा वास्तविक लक्षणांबाबत माहित नसते.
- त्यांनी दिलेले सल्ले खरेतर डॉक्टरांचे नसतात, पण की-वर्डवर आधारित असतात.
तर मग, पुढील वेळेस शंकांच्या निरसनासाठी इंटरनेट सर्फ करताना या गोष्टी लक्षात ठेवा:
इंटरनेट हेल्थ सर्चसाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन
- कोणीही ऑनलाइन कन्टेन्ट प्रकाशित करू शकतो.
- ऑनलाइन सर्चकडे फक्त सुरूवातीची माहिती मिळवण्यासाठी पाहा, ते अंतिम उपाय समजू नका.
- हेल्थ क्लिनिक्स, हॉस्पिटल वेबसाइट्स, प्रतिष्ठित आरोग्य मासिके व प्रकाशने अशा विश्वसनीय वेबसाइट्सकडून माहिती मिळवा.
- डॉक्टरांकडून उपचार घेण्याला विलंब करू नका.
- ऑनलाइन शोध घेतल्यानंतर तुमच्या शंका लिहून काढा, डॉक्टरांना किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा आणि आजारावर कशाप्रकारे उपचार घेता येऊ शकतो याबाबत कोणा व्यक्तीसोबत चर्चा करा.
- लक्षात घ्या, इंटरनेट हे फक्त एक माध्यम आहे, ज्यामधून तुम्ही माहिती मिळवू शकता, पण तुम्ही त्या माहितीचा उतावीळपणे न होता योग्यपणे वापर करणे शहाणपणाचे आहे.
(डॉ. संजय शाह, डॉ. प्रदीप शाह हे मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील जनरल फिजिशियन आहेत)