मुक्तपीठ टीम
भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला कशी मजबुती द्यावी यासाठी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एक खास सल्ला दिला आहे. सुंदर पिचाईंनी भारताला बुस्टर टेक डोस दिला आहे. भारताला एक प्रमुख निर्यात अर्थव्यवस्था म्हणून वर्णन करताना, सुंदर पिचाई म्हणाले की, “गुगल १०० हून अधिक भारतीय भाषांसाठी इंटरनेट सर्च मॉडेल विकसित करत असून भारतीय महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप कंपन्यांना ७.५ कोटींची मदत करेल.” गुगल फॉर इंडिया या कार्यक्रमात त्यांनी हे म्हटलं आहे.
भारत दौऱ्यावर आलेल्या सुंदर पिचाईंनी ‘गुगल फॉर इंडिया’ कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले की, गुगल भारतातून व्यवसाय करणाऱ्या स्टार्टअप्सवर भर देत आहे. या नवीन स्टार्टअप्ससाठी ३० कोटी डॉलर राखून ठेवलेल्या रकमेपैकी एक चतुर्थांश रक्कम महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपमध्ये गुंतवेल.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तंत्रज्ञानातील बदल पाहणे प्रेरणादायी”- गुगल सीईओ सुंदर पिचाई
- सुंदर पिचाईंनी भारत दौऱ्यावर असताना पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
- तसेच, दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत एका कार्यक्रमाला हजेरी लावली.
- मोदींची भेट घेतल्यानंतर पिचाई यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, अद्भूत भेटीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार.
- तुमच्या नेतृत्वाखाली तंत्रज्ञानातील बदलाचा वेग पाहणे प्रेरणादायी आहे.
- कनेक्टेड इंटरनेटच्या दिशेने आमची मजबूत भागीदारी आणि भारताच्या G20 अध्यक्षपदासाठी आमचा पाठिंबा सुरू ठेवण्यास उत्सुक आहोत.
सुंदर पिचाई यांनी त्यांच्या दौऱ्याच्या सुरुवातीला लिहिलेल्या ब्लॉगमध्ये म्हटले होते की, ते भारतातील लहान व्यवसाय, स्टार्टअपला सायबर सुरक्षेमध्ये गुगलची गुंतवणूक यासारख्या मुद्द्यांवर पंतप्रधानांशी चर्चा करणार आहे. याशिवाय, शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण आणि कृषी आणि आरोग्य सेवा यांसारख्या क्षेत्रात एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी गुगलच्या पुढाकारावर देखील चर्चा केली जाईल.
पिचाईंनी भारताला दिलेला ‘बुस्टर टेक डोस’ कोणता?
- ‘गुगल फॉर इंडिया’ कार्यक्रमाला संबोधित करताना पिचाई म्हणाले की, तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर काम करत आहे आणि जगभरातील लोकांच्या जीवनावर परिणाम करत आहे.
- मी माझ्या १० वर्षांच्या इंडिया डिजिटायझेशन फंडमधून १० अब्ज डॉलर्सची प्रगती पाहण्यासाठी आणि नवीन कल्पना सामायिक करण्यासाठी येथे आलो आहे. भारताच्या डिजिटल भविष्यासाठी आम्ही मदत करत आहोत.
- एआयवर आधारित एकल, एकात्मिक मॉडेलचा विकास हा आमच्या समर्थनाचा भाग आहे.
- हे लिखित शब्द आणि आवाजाद्वारे १००हून अधिक भारतीय भाषा चालवण्यास सक्षम असेल.
- हे मॉडेल जगातील सर्वाधिक बोलल्या जाणार्या १ हजार भाषांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आणण्याच्या आमच्या उपक्रमाचा एक भाग आहे.
- यासह, गुगल आयआयटी मद्रासच्या सहकार्याने रिस्पॉन्सिव्ह एआयसाठी नवीन, बहु-अनुशासनात्मक केंद्रास देखील समर्थन देत आहे.
- एआयच्या दिशेने गुगलच्या जागतिक उपक्रमाचा हा एक भाग आहे.