मुक्तपीठ टीम
आज जग गुगलवर चालतं असं म्हटलं तर आश्चर्य वाटू नये, उलट माझं गुगलवाचून काहीच अडत नाही, असं कुणी म्हटलं तरच आश्चर्य वाटेल. त्यामुळेच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना आजच्या काळात कोणी ओळखत नाही, असं नसावं. तंत्रज्ञानाच्या दुनियेतील या चमकणाऱ्या ताऱ्याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. प्रजासत्ताक दिनानिमित्त पद्मभूषण पुरस्कारासाठी त्यांचीही निवड झाली.
आज जरी सुंदर पिचाई जगविख्यात खूप मोठे नाव असले तरी त्यांना सारं काही सोन्याच्या ताटात, चांदीच्या पाटावर मिळालेले नाही. त्यांनाही संघर्ष करायला लागला. त्यांचा जन्म चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. मध्यम कुटुंबातील सुंदर हे अभ्यासात सुरुवातीपासूनच हुशार होते. त्यांनी आयआयटी खरगपूर येथून बीटेक केले. त्यांनी पुढील शिक्षण परदेशात केले. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमएस केल्यानंतर, सुंदर पिचाई यांनी व्हार्टन स्कूलमधून एमबीए केले. मात्र, अमेरिकेत जाण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागले. आपल्या वडिलांचा एक वर्षाचा पगार खर्च करावा लागला. त्यामुळेच गुणवत्तेला प्रामाणिकपणे परिश्रमांची जोड दिली, तर अशक्य काहीच नसतं हेच सुंदर पिचाईंच्या उदाहरणातून कळतं.
सुंदर पिचाई यांचा गुगलसोबतचा प्रवास २००४ मध्ये सुरू झाला. शिक्षण संपवून त्यांनी गुगल जॉईन केले. असे म्हणतात की प्रतिभेला परिचयाची गरज नसते. सुंदर पिचाई यांनीही याच म्हणीचा अनुवाद केला आहे. गुगलमध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी गुगल क्रोम आणि गुगल टूलबार विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गुगल क्रोम जगातील सर्वात प्रसिद्ध इंटरनेट ब्राउझर बनले आहे. यामुळे त्यांच्या प्रतिभेला शान आली.
यानंतर सुंदर पिचाई यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या आवडीमुळे आणि प्रगत मनामुळे, त्यांनी गुगलमध्ये प्रसिद्धी मिळवली. टूलबार आणि क्रोम व्यतिरिक्त, त्यांनी गुगलसाठी डेस्कटॉप शोध, गुगल पॅक, गॅझेट्स, फायरफॉक्स विस्तार इत्यादी अनेक लोकप्रिय उत्पादने लाँच केली. एक वेळ अशी आली की मोठे निर्णय घेण्यासाठी सुंदर पिचाई यांचे मतही घेतले गेले. २०१५ मध्ये त्यांना जगातील आघाडीची आयटी कंपनी गुगलचे सीईओ बनवण्यात आले.
आजही सुंदर पिचाई जगातील सर्वात मोठ्या आयटी कंपनी गुगलचे सीईओ आहेत. पण एक काळ असा होता की सुंदर पिचाई यांच्याकडे पैशांची तीव्र टंचाई होती. एकदा त्यांनी स्वतः सांगितले की, त्यांच्या वडिलांना त्यांना परदेशात पाठवण्यासाठी एक वर्षाचा संपूर्ण पगार खर्च करावा लागला. पण आपल्या मेहनतीने सुंदर पिचाई यांनी आज ते स्थान मिळवले आहे जे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.