मुक्तपीठ टीम
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील ११ आमदारांपैकी ८ आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ४० सदस्यांच्या गोवा विधानसभेत आता काँग्रेसचे केवळ तीन आमदार उरले आहेत. विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे भाजपामध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर या आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचीही भेट घेतली. अशा परिस्थितीत गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडणे आणि त्यानंतर ८ आमदारांनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
या आमदारांनी केला भाजपात प्रवेश!!
काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या आमदारांमध्ये दिगंबर कामत, मायकल लोबो, डी लोबो, राजेश फळदेसाई, केदार नायक, संकल्प आमोणकर, अलेक्सो सिक्वेरा आणि रुडॉल्फ फर्नांडिस यांचा समावेश आहे.
याआधीही केला होता बंडखोरीचा प्रयत्न!!
- दिगंबर कामत आणि मायकल लोबो हे बऱ्याच दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचं सांगितलं जात होतं आणि जुलैमध्येही त्यांनी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, पण काही आमदार सोबत नव्हते.
- अशा स्थितीत पक्षांतरविरोधी कायदा लागू होण्याच्या भीतीने भाजपामध्ये जाण्याची योजना पुढे ढकलण्यात आली.
- भाजपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी काँग्रेस आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली.
- इतकेच नाही तर मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांनीही यापूर्वी दिल्लीला भेट दिली होती.
या काळात या नेत्यांची भाजपाच्या सर्वोच्च नेतृत्वाशी बैठक झाल्याचे समजते. त्यानंतरच भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. ८ आमदारांनी भाजपात प्रवेश केल्याने गोव्यातील काँग्रेसला हा धक्का बसला आहे. काँग्रेस भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशातील १२ राज्यांमध्ये पदयात्रा काढत आहे. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल आणि लोकांमधील संपर्कही वाढेल, अशी त्यांना आशा आहे. मात्र या संकटाने त्यांची चिंता वाढवली आहे.
काँग्रेसकडे आता केवळ तीन आमदार
- ४० जागांच्या गोवा विधानसभेत भाजपाचे २० आमदार होते.
- तर काँग्रेसकडे ११ जागा होत्या.
- याशिवाय महाराष्ट्रवादी गोमंतककडे दोन आणि गोवा फॉरवर्ड पक्षाला एक जागा आहे.
- तर इतरांच्या खात्यात सहा जागा आहेत.
- काँग्रेसचे आठ आमदार भाजपामध्ये दाखल झाल्याने काँग्रेसकडे विधानसभेच्या केवळ तीन जागा उरल्या आहेत.
त्याचवेळी भाजपची संख्या २८ झाली.